१ करिंथकर ११:१-३४
११ जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो, तसे तुम्हीही माझे अनुकरण करा.
२ तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या* त्यांचे काटेकोरपणे पालन करता, याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.
३ पण, प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; प्रत्येक स्त्रीचे मस्तक पुरुष आहे; आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला माहीत असावे असे मला वाटते.
४ जो पुरुष आपले डोके झाकून प्रार्थना किंवा भविष्यवाणी करतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो;
५ पण, जी स्त्री डोके न झाकता प्रार्थना किंवा भविष्यवाणी करते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण अशी स्त्री मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच आहे.
६ एखादी स्त्री जर डोके झाकत नसेल, तर तिने आपले केस कापून टाकावे; पण, केस कापून टाकणे किंवा मुंडण करणे हे जर तिच्यासाठी लाजिरवाणे असेल, तर तिने आपले डोके झाकावे.
७ पुरुषाने आपले डोके झाकू नये कारण तो देवाचे प्रतिरूप आणि गौरव आहे; पण, स्त्री ही पुरुषाचा गौरव आहे.
८ कारण पुरुष स्त्रीपासून आला नाही, तर स्त्री पुरुषापासून आली.
९ इतकेच काय, पुरुषाला स्त्रीसाठी नाही, तर स्त्रीला पुरुषासाठी निर्माण करण्यात आले होते.
१० या कारणामुळे, तसेच देवदूतांमुळे स्त्रीच्या डोक्यावर अधीनतेचे चिन्ह असणे आवश्यक आहे.
११ तसेच, ख्रिस्ताच्या अनुयायांमध्ये, स्त्री ही पुरुषापेक्षा वेगळी नाही आणि पुरुषदेखील स्त्रीपेक्षा वेगळा नाही.
१२ कारण ज्याप्रमाणे स्त्री ही पुरुषापासून आहे, त्याचप्रमाणे पुरुषही स्त्रीपासून आहे; पण, सर्वकाही देवापासून आहे.
१३ तुम्हीच ठरवा: एखाद्या स्त्रीने डोके न झाकता देवाला प्रार्थना करणे योग्य आहे का?
१४ निसर्गच हे शिकवत नाही का, की पुरुषाचे लांब केस असणे ही त्याच्यासाठी अपमानाची गोष्ट आहे;
१५ पण, स्त्रीचे लांब केस ही तिची शोभा आहे? कारण केस तिला पदराऐवजी* देण्यात आले आहेत.
१६ पण, जर कोणी वाद घालून दुसऱ्या कोणत्या प्रथेचे समर्थन करत असेल, तर त्याने हे लक्षात घ्यावे, की आमच्यामध्ये किंवा देवाच्या मंडळ्यांमध्ये दुसरी कोणतीही प्रथा नाही.
१७ पण, तुम्हाला या सूचना देताना मी तुमची प्रशंसा करत नाही; कारण तुम्ही एकत्र येता तेव्हा तुमचे भले होण्याऐवजी, नुकसानच होते.
१८ पहिली गोष्ट म्हणजे, मंडळीत तुम्ही एकत्र येता तेव्हा तुमच्यामध्ये फुटी असतात असे माझ्या ऐकण्यात आले आहे; आणि काही प्रमाणात हे खरे असल्याचे मी मानतो.
१९ कारण, तुमच्यामध्ये वेगवेगळे पंथ* नक्कीच असतील; पण, यावरून देवाची मान्यता असलेले कोण आहेत हे स्पष्ट होईल.
२० तुम्ही एका ठिकाणी एकत्र येता, तेव्हा खरेतर प्रभूच्या सांजभोजनासाठी एकत्र येत नाही.
२१ कारण सांजभोजन करण्याआधीच प्रत्येकाने आपले संध्याकाळचे जेवण केलेले असते; त्यामुळे, एक उपाशी राहतो, तर दुसरा प्यायलेला असतो.
२२ तुम्हाला खायला-प्यायला घरे नाहीत का? की तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ लेखता आणि ज्यांच्याजवळ काहीच नाही त्यांना लज्जित करता? मी तुम्हाला काय म्हणावे? तुमची प्रशंसा करावी का? या बाबतीत तरी मी तुमची प्रशंसा करणार नाही.
२३ खरेतर, सांजभोजनासंबंधी मी तुम्हाला जे शिकवले ते मला प्रभूकडूनच मिळाले. कारण, ज्या रात्री प्रभू येशूला धरून दिले जाणार होते, त्या रात्री त्याने भाकर घेतली,
२४ आणि देवाला धन्यवाद देऊन ती मोडली व म्हटले: “ही माझ्या शरीराला सूचित करते, जे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणासाठी हे करत राहा.”
२५ मग, संध्याकाळचे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले. तो म्हणाला: “हा प्याला नव्या कराराला सूचित करतो, जो माझ्या रक्ताने स्थापित केला जाईल. जेव्हाही तुम्ही यातून प्याल तेव्हा माझ्या स्मरणासाठी हे करत राहा.”
२६ कारण प्रभू येईपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही ही भाकर खाल आणि या प्याल्यातून प्याल, तेव्हा तेव्हा तुम्ही त्याच्या मृत्यूची घोषणा कराल.
२७ त्यामुळे, जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खातो किंवा प्रभूच्या प्याल्यातून पितो तो प्रभूच्या शरीरासंबंधी व रक्तासंबंधी दोषी ठरेल.
२८ आपण योग्य आहोत की नाही हे प्रत्येकाने आधी स्वतःचे परीक्षण करून ठरवावे आणि मगच ती भाकर खावी व त्या प्याल्यातून प्यावे.
२९ कारण, प्रभूचे शरीर कशाला सूचित करते हे समजून न घेता जो कोणी खातो व पितो तो स्वतःवर न्यायदंड ओढवून घेतो.
३० म्हणूनच, तुमच्यापैकी अनेक जण अशक्त व आजारी आहेत आणि बरेच जण मरण पावले आहेत.*
३१ खरेतर, आपण योग्य आहोत की नाही याचे आपण स्वतःच परीक्षण केले, तर आपल्याला दोषी ठरवले जाणार नाही.
३२ पण, आपल्याला दोषी ठरवले जाते तेव्हा आपल्याला यहोवाकडून* ताडन मिळते, जेणेकरून आपण जगासोबत शिक्षेस पात्र ठरणार नाही.
३३ त्यामुळे बांधवांनो, तुम्ही प्रभूच्या सांजभोजनासाठी एकत्र येता तेव्हा एकमेकांसाठी थांबा.
३४ कोणाला भूक लागली असेल, तर त्याने घरी खावे, म्हणजे तुमचे एकत्र येणे न्यायदंडाचे कारण बनणार नाही. बाकीचे प्रश्न मी तिथे आल्यावर सोडवेन.
तळटीपा
^ किंवा “ज्या परंपरा तुम्हाला घालून दिल्या.”
^ किंवा “झाकण्याकरता.”
^ किंवा “तुमच्यामध्ये फुटी.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “मृत्यूची झोप घेत आहेत.” हे आध्यात्मिक झोपेला सूचित करते असे दिसते.
^ शब्दार्थसूची पाहा.