१ करिंथकर १६:१-२४
१६ आता पवित्र जनांसाठी दान गोळा करण्याच्या बाबतीत, मी गलतीयातील मंडळ्यांना ज्या सूचना दिल्या होत्या त्याच तुम्हीही पाळाव्यात.
२ दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी, प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे काही रक्कम बाजूला काढून ठेवावी, म्हणजे मी तिथे आल्यानंतर दान गोळा करण्याची गरज पडणार नाही.
३ पण ज्या माणसांची तुम्ही तुमच्या पत्रांत शिफारस केली, त्यांना मी आल्यावर तुमची उदार देणगी घेऊन यरुशलेमला पाठवीन.
४ पण, माझेही तिथे जाणे आवश्यक असेल, तर मी त्यांच्यासोबत जाईन.
५ मासेदोनियाचा दौरा पूर्ण केल्यावर मी तुमच्याकडे येईन, कारण मी मासेदोनियातून जाणार आहे;
६ आणि कदाचित मी तुमच्याकडे राहीन किंवा तुमच्या इथे हिवाळाही घालवीन. मग, मी पुढच्या प्रवासाला निघेन तेव्हा तुम्हाला काही अंतरापर्यंत माझ्यासोबत येऊन मला निरोप देता येईल.
७ कारण या वेळी तुम्हाला केवळ धावती भेट देण्याची माझी इच्छा नाही; उलट, यहोवाची* इच्छा असल्यास तुमच्याकडे काही काळ राहण्याची मी आशा करतो.
८ पण, पेन्टेकॉस्टच्या सणापर्यंत मी इफिसमध्येच राहणार आहे.
९ कारण, प्रभूची अधिक प्रमाणात सेवा करता यावी म्हणून संधीचे एक मोठे दार माझ्यासाठी उघडण्यात आले आहे; पण, विरोध करणारे बरेच आहेत.
१० आता तीमथ्य तिथे आला तर त्याला निश्चिंतपणे सेवा करता यावी म्हणून त्याला सहकार्य करा, कारण माझ्याप्रमाणेच तोही यहोवाची* सेवा करतो.
११ तेव्हा, कोणीही त्याला कमी लेखू नये. त्याला शांतीने निरोप द्या म्हणजे तो माझ्याकडे येऊ शकेल; कारण मी इतर बांधवांसोबत त्याची वाट पाहत आहे.
१२ आता आपला भाऊ अपुल्लो याला मी इतर बांधवांसोबत तुमच्याकडे येण्याची गळ घातली. खरेतर, सध्याच तुमच्याकडे येण्याचा त्याचा विचार नव्हता; पण, संधी मिळताच तो तुमच्याकडे येईल.
१३ जागे राहा, विश्वासात स्थिर राहा आणि धैर्यवान* व सामर्थ्यशाली व्हा.
१४ तुम्ही जे काही करता ते सर्व प्रेमाने करा.
१५ आता बांधवांनो, मी तुम्हाला एक विनंती करतो: तुम्हाला माहीत आहे, की स्तेफना याचे घराणे हे अखयाचे प्रथमफळ आहे आणि पवित्र जनांची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.
१६ तुम्हीसुद्धा, अशा लोकांच्या आणि सहकार्य व मेहनत करणाऱ्या सर्वांच्याच अधीन राहा.
१७ स्तेफना, फर्तूनात आणि अखायिक इथे असल्यामुळे मला आनंद होतो, कारण तुम्ही इथे नसल्याची कमी त्यांनी भरून काढली आहे.
१८ त्यांनी माझे व तुमचेही मनोबल वाढवले आहे. तेव्हा, अशा माणसांची नेहमी कदर करा.
१९ आशियातील मंडळ्या तुम्हाला नमस्कार सांगतात. तसेच, अक्विल्ला व प्रिस्का आणि त्यांच्या घरात जमणारी मंडळी हे सर्व तुम्हाला सप्रेम नमस्कार सांगतात.
२० सर्व बांधवांचा तुम्हाला नमस्कार. एकमेकांना भेटताना बंधुप्रेमाचे चुंबन घ्या.
२१ आता मी पौल, माझ्या स्वतःच्या अक्षरांत तुम्हाला माझा नमस्कार सांगतो.
२२ जर कोणी प्रभूवर प्रेम करत नसेल, तर तो शापित असो. हे आमच्या प्रभू, ये!
२३ प्रभू येशूची अपार कृपा तुमच्यावर असो.
२४ ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या तुम्हा सर्वांना माझे प्रेम.