१ करिंथकर ३:१-२३

  • करिंथच्या बांधवांमध्ये अजूनही जगाची विचारसरणी (१-४)

  • देव वाढवतो (५-९)

    • देवाचे सहकारी ()

  • अग्नीरोधक साहित्य वापरून बांधकाम (१०-१५)

  • तुम्ही देवाचे मंदिर आहात (१६, १७)

  • जगाची बुद्धी देवाच्या दृष्टीने मूर्खपणा (१८-२३)

 म्हणून बांधवांनो, आध्यात्मिक विचारसरणीच्या मनुष्यांशी बोलावे तसे मी तुमच्याशी बोलू शकलो नाही, तर जगाच्या विचारसरणीच्या* माणसांशी, ख्रिस्तामध्ये तान्ह्या मुलांशी बोलावे तसे मला तुमच्याशी बोलावे लागले. २  मी तुम्हाला जड अन्‍न दिले नाही, तर दूध पाजले कारण जड अन्‍न पचवण्याइतकी तुमच्यामध्ये शक्‍ती नव्हती. खरेतर अजूनही नाही, ३  कारण अजूनही तुमच्यामध्ये जगाची विचारसरणी आहे. तुमच्यात हेवेदावे व भांडणतंटे आहेत, त्याअर्थी तुमच्यामध्ये जगाची विचारसरणी नाही का, आणि तुम्ही माणसांप्रमाणेच चालत आहात की नाही? ४  कारण तुमच्यापैकी एक जण म्हणतो, “मी पौलचा” तर दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोचा.” याचाच अर्थ तुम्ही सर्वसाधारण माणसांसारखे वागत आहात की नाही? ५  शेवटी, अपुल्लो कोण आहे? आणि पौल तरी कोण आहे? प्रभूने प्रत्येकाला सोपवलेले कार्य करणारे हे सेवक आहेत, ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्‍वास ठेवला. ६  मी लावले, अपुल्लोने पाणी घातले, पण देव वाढवत राहिला, ७  त्यामुळे, लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देवच सर्वकाही आहे. ८  आता, लावणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहेत,* पण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे प्रतिफळ मिळेल. ९  कारण आपण देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात, ज्याची तो मशागत करत आहे आणि देवाची इमारत आहात. १०  माझ्यावर झालेल्या देवाच्या अपार कृपेनुसार मी बांधकाम करणाऱ्‍या एका कुशल कारागिराप्रमाणे पाया घातला; त्यावर बांधकाम मात्र दुसरा कोणीतरी करत आहे. पण, आपण पायावर कसे बांधकाम करत आहोत याकडे प्रत्येकाने सतत लक्ष द्यावे. ११  कारण जो पाया आधीच घालण्यात आला आहे, अर्थात येशू ख्रिस्त याच्याशिवाय दुसरा पाया कोणीही घालू शकत नाही. १२  यावर कोणी सोने, चांदी व रत्ने वापरून, तर कोणी लाकूड, सुकलेले गवत किंवा भुसा वापरून बांधकाम करतो. १३  पण प्रत्येकाने कशा प्रकारचे काम केले आहे हे परीक्षेच्या दिवशी उघड होईल, कारण अग्नीद्वारे हे प्रकट केले जाईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे हे सिद्ध होईल. १४  एखाद्याने पायावर केलेले बांधकाम टिकून राहिल्यास, त्याला प्रतिफळ मिळेल; १५  पण एखाद्याने केलेले बांधकाम जळून गेल्यास, त्याचे नुकसान होईल; त्याचा स्वतःचा तर बचाव होईल, पण असे झाल्यास, ते आगीतून कसेबसे बचावण्यासारखे ठरेल. १६  तुम्ही स्वतः देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हाला माहीत नाही का? १७  जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश केला, तर देव त्याचा नाश करेल; कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्हीच ते मंदिर आहात. १८  कोणीही स्वतःची फसवणूक करून घेऊ नये: या जगाच्या व्यवस्थेत* आपण बुद्धिमान आहोत असे जर कोणाला वाटत असेल तर त्याने मूर्ख व्हावे, म्हणजे तो बुद्धिमान होईल. १९  कारण या जगाची बुद्धी ही देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे; असे लिहिले आहे: “तो बुद्धिमानांना त्यांच्याच चलाखीत पकडतो.” २०  आणि असेही लिहिले आहे: “बुद्धिवंतांचे तर्क व्यर्थ आहेत हे यहोवाला* माहीत आहे.” २१  म्हणून कोणीही माणसांविषयी बढाई मारू नये; कारण सर्व तुमचेच आहे, २२  पौल असो, अपुल्लो असो किंवा केफा* असो, किंवा हे जग, जीवन किंवा मृत्यू किंवा सध्याच्या गोष्टी किंवा भविष्यातल्या गोष्टी असोत, त्या सर्व तुमच्याच आहेत; २३  आणि तुम्ही ख्रिस्ताचे, तर ख्रिस्त देवाचा आहे.

तळटीपा

शब्दशः “शारीरिक.”
किंवा “यांचा हेतू एकच आहे.”
किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
ज्याला पेत्र असेही म्हणतात.