१ करिंथकर ५:१-१३
५ खरेतर, मला असे सांगण्यात आले आहे की तुमच्यामध्ये एक जण अनैतिक लैंगिक कृत्यांबद्दल* दोषी आहे, आणि तीसुद्धा अशी अनैतिकता* जी विदेश्यांमध्येही केली जात नाही. त्याचे आपल्याच वडिलाच्या पत्नीसोबत संबंध आहेत.*
२ आणि तरी तुम्ही गर्व करता? खरेतर तुम्ही याबद्दल शोक करायला नको का, आणि ज्या मनुष्याने हे कृत्य केले, त्याला तुम्ही आपल्यातून काढून टाकायला नको का?
३ मी शरीराने तुमच्यात नसलो, तरी मनाने* तिथेच आहे आणि मी प्रत्यक्ष तुमच्यासोबत असल्याप्रमाणेच, हे कृत्य करणाऱ्या त्या माणसाचा आधीच न्याय केला आहे.
४ आपल्या प्रभू येशूच्या नावाने तुम्ही एकत्र येता, तेव्हा मीसुद्धा प्रभू येशूच्या सामर्थ्यासोबत मनाने तुमच्याबरोबर आहे हे ओळखून,
५ तुम्ही अशा या माणसाला शरीराचा नाश होण्याकरता सैतानाच्या स्वाधीन करावे, जेणेकरून प्रभूच्या दिवसादरम्यान मंडळीची आध्यात्मिकता टिकून राहील.
६ तुमची बढाई मारणे योग्य नाही. तुम्हाला माहीत नाही का, की थोडेसे खमीरसुद्धा* पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवते?*
७ जुने खमीर टाकून द्या, यासाठी की तुम्ही पिठाचा नवीन गोळा व्हावे कारण तुमच्यामध्ये खमीर नाही.* कारण आपल्या वल्हांडणाचा कोकरा ख्रिस्त याचे बलिदान देण्यात आले आहे.
८ म्हणून आपण जुन्या खमीराने, किंवा वाईटपणाच्या व दुष्टपणाच्या खमीराने नाही, तर प्रामाणिकपणाच्या व सत्याच्या बेखमीर भाकरीने हा सण पाळू या.
९ माझ्या पत्रात मी तुम्हाला अनैतिक लैंगिक कृत्ये* करणाऱ्या लोकांची संगत सोडून द्या* असे लिहिले होते.
१० पण, या जगातील अनैतिक लैंगिक कृत्ये* करणाऱ्या, लोभी, इतरांना लुबाडणाऱ्या व मूर्तिपूजा करणाऱ्या लोकांची अजिबातच संगत धरू नका, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. कारण तसे केल्यास तुम्हाला जगातून बाहेर जावे लागेल.
११ पण आता मी तुम्हाला असे लिहीत आहे, की बंधू म्हटलेला कोणताही मनुष्य अनैतिक लैंगिक कृत्ये* करणारा, लोभी, मूर्तिपूजक, शिव्याशाप देणारा, दारुडा, किंवा इतरांना लुबाडणारा असेल, तर अशा मनुष्याची संगत सोडून द्या,* त्याच्यासोबत जेवायलाही बसू नका.
१२ कारण बाहेरच्या लोकांचा न्याय करणारा मी कोण? पण जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करायला नको का?
१३ बाहेरच्यांचा न्याय तर देव करतो. “त्या दुष्टाला आपल्यामधून काढून टाका.”
तळटीपा
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “पत्नीला ठेवून घेतले आहे.”
^ शब्दशः “आत्म्यात.”
^ अर्थात, पीठ फुगवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ, यीस्ट. शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “आंबवते.”
^ शब्दशः “तुम्ही बेखमीर आहात.”
^ शब्दार्थसूची पाहा, “अनैतिक लैंगिक कृत्ये.”
^ किंवा “सहवास राखण्याचे बंद करा.”
^ शब्दार्थसूची पाहा, “अनैतिक लैंगिक कृत्ये.”
^ शब्दार्थसूची पाहा, “अनैतिक लैंगिक कृत्ये.”
^ किंवा “सहवास राखण्याचे बंद करा.”