१ करिंथकर ६:१-२०
६ तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्यासोबत काही वाद होतो, तेव्हा तो सोडवण्यासाठी पवित्र जनांसमोर न जाता तुम्ही न्यायालयात अनीतिमान माणसांसमोर जाण्याचे कसे काय धाडस करता?
२ पवित्र जन जगाचा न्याय करतील हे तुम्हाला माहीत नाही का? आणि जर तुम्ही जगाचा न्याय करणार आहात, तर मग अगदी लहानसहान गोष्टींविषयी न्यायनिवाडा करण्याची योग्यता तुमच्यात नाही का?
३ आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही का? मग सध्याच्या जीवनातल्या सर्वसाधारण समस्या आपण का सोडवू शकत नाही?
४ आणि सध्याच्या जीवनातले प्रश्न सोडवायचे असतात, तेव्हा मंडळी ज्यांचा आदर करत नाही, अशांना तुम्ही न्यायाधीश म्हणून का निवडता?
५ तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे बोलत आहे. आपल्या बांधवांमध्ये न्याय करू शकेल असा एकही बुद्धिमान माणूस तुमच्यात नाही का?
६ त्याऐवजी एक भाऊ दुसऱ्याला न्यायालयात ओढतो, आणि तेसुद्धा विश्वास न ठेवणाऱ्यांपुढे!
७ तुम्ही एकमेकांविरुद्ध खटले भरता याचा अर्थ खरेतर तुम्ही पूर्णपणे हरला आहात. त्याऐवजी, तुम्ही स्वतःचे नुकसान का होऊ देत नाही? त्याऐवजी, तुम्ही स्वतःची फसवणूक का होऊ देत नाही?
८ उलट, तुम्ही स्वतःच दुसऱ्याचे नुकसान व फसवणूक करता, आणि तीसुद्धा आपल्याच भावांची!
९ अनीतिमान माणसे देवाच्या राज्याचे वारसदार होणार नाहीत हे तुम्हाला माहीत नाही का? फसू नका. अनैतिक लैंगिक कृत्ये* करणारे, मूर्तिपूजक, व्यभिचारी, पुरुषवेश्या,* समलैंगिक कृत्ये करणारे पुरुष,*
१० चोर, लोभी, दारुडे, शिव्याशाप देणारे आणि इतरांना लुबाडणारे देवाच्या राज्याचे वारसदार होणार नाहीत.
११ तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते. पण तुम्हाला धुऊन शुद्ध करण्यात आले आहे; तुम्हाला पवित्र करण्यात आले आहे; प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे व आपल्या देवाच्या आत्म्याद्वारे तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आले आहे.
१२ माझ्यासाठी सर्व गोष्टी कायदेशीर आहेत,* पण सर्वच गोष्टी हिताच्या नाहीत. माझ्यासाठी सर्व गोष्टी कायदेशीर असल्या, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.*
१३ अन्न पोटासाठी आणि पोट अन्नासाठी आहे, पण देव या दोन्ही गोष्टी नाहीशा करेल. शरीर हे अनैतिक लैंगिक कृत्यांसाठी* नाही, तर प्रभूसाठी आहे आणि प्रभू शरीरासाठी आहे.
१४ पण देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याद्वारे आपल्यालाही मरणातून उठवेल.
१५ तुमची शरीरे ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत हे तुम्हाला माहीत नाही का? मग मी ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव एका वेश्येच्या शरीराशी जोडावेत का? मुळीच नाही!
१६ जो कोणी वेश्येशी संबंध ठेवतो तो तिच्यासोबत एकदेह होतो, हे तुम्हाला माहीत नाही का? कारण “ती दोघे एकदेह होतील,” असे देव म्हणतो.
१७ पण जो कोणी प्रभूसोबत ऐक्यात असतो, त्याची मनोवृत्ती प्रभूसारखीच होते.*
१८ अनैतिक लैंगिक कृत्यांपासून* दूर पळा! मनुष्याने दुसरे कोणतेही पाप केल्यास ते तो आपल्या शरीराबाहेर करतो, पण जो कोणी अनैतिक लैंगिक कृत्ये करत राहतो, तो स्वतःच्याच शरीराच्या विरोधात पाप करत असतो.
१९ तुमचे शरीर हे तुमच्यामध्ये राहणाऱ्या देवाकडील पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? तसेच, तुमची स्वतःवर मालकी नाही,
२० कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेण्यात आले आहे. म्हणून आपल्या शरीराद्वारे सर्व प्रकारे देवाचा गौरव करा.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा, “अनैतिक लैंगिक कृत्ये.”
^ हे समलैंगिक संबंधात स्त्रीसारखा संभोग देणाऱ्या पुरुषांना सूचित करते.
^ किंवा “पुरुषांसोबत संभोग करणारे पुरुष.”
^ किंवा “मला सर्व गोष्टींची परवानगी आहे.”
^ किंवा “गोष्टीचा स्वतःवर अधिकार चालू देणार नाही.”
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “तो त्याच्यासोबत आत्म्यात एक आहे.”
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.