१ करिंथकर ८:१-१३
८ आता, मूर्तींना दाखवलेल्या नैवेद्याविषयी: या बाबतीत, अर्थातच आपल्या सर्वांनाच ज्ञान आहे. ज्ञानामुळे गर्व येतो, पण प्रेम उन्नती करते.
२ आपल्याला ज्ञान आहे असे जर कोणाला वाटत असेल, तर त्याला त्या गोष्टीविषयी अजूनही म्हणावे तसे ज्ञान नाही.
३ पण जर कोणी देवावर प्रेम करत असेल, तर देव त्याला ओळखतो.
४ आता, मूर्तींना दाखवलेले नैवेद्य खाण्याविषयी, आपल्याला हे माहीत आहे की या जगात मूर्ती काहीही नाही आणि देव केवळ एकच आहे.
५ कारण ज्यांना देव समजले जाते, अशी स्वर्गात व पृथ्वीवर दैवते असली, आणि अशी पुष्कळ “दैवते” व पुष्कळ “प्रभू” आहेतही,
६ तरी आपल्यासाठी खरेतर फक्त एकच देव, म्हणजे पिता आहे. त्याच्यापासूनच सर्व गोष्टी आहेत आणि आपण त्याच्यासाठी आहोत; आणि केवळ एकच प्रभू आहे, अर्थात येशू ख्रिस्त. त्याच्याचद्वारे सर्व गोष्टी आहेत आणि आपणही त्याच्याद्वारे आहोत.
७ पण, सर्वांनाच हे ज्ञान आहे असे नाही. कारण, काही जण पूर्वी मूर्तींशी संबंध असल्यामुळे आजदेखील अन्न खाताना ते मूर्तीला वाहिलेले नैवेद्य आहे, असे मानतात आणि त्यांचा विवेक कमजोर असल्यामुळे दूषित होतो.
८ पण, अन्न आपल्याला देवाच्या जवळ आणू शकत नाही; ते खाल्ले नाही तर आपले काही नुकसान होत नाही, आणि खाल्ले तरी काही फायदा होत नाही.
९ पण, निवड करण्याचा तुमचा अधिकार, कमजोर विवेक असलेल्या लोकांसाठी एक अडखळण बनणार नाही याची नेहमी काळजी घ्या.
१० कारण, ज्ञान असलेल्या तुझ्यासारख्या व्यक्तीला जर एखाद्याने मूर्तीच्या मंदिरात जेवताना पाहिले, तर कमजोर विवेक असलेल्या त्या व्यक्तीलाही मूर्तींना दाखवलेले नैवेद्य खाण्याचे धाडस होणार नाही का?
११ अशा रीतीने, तुझ्या ज्ञानामुळे कमजोर विवेक असलेल्या मनुष्याचा नाश होईल, अर्थात तुझ्या भावाचा, ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला.
१२ आपल्या बांधवांविरुद्ध अशा प्रकारे पाप करून तुम्ही त्यांच्या कमजोर विवेकाला दुखावता, तेव्हा तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करत असता.
१३ म्हणून, मी जे खातो त्यामुळे जर माझ्या भावाला अडखळण होत असेल, तर मी पुन्हा कधीच मांस खाणार नाही. म्हणजे, माझ्यामुळे माझ्या भावाला अडखळण होणार नाही.