१ तीमथ्य १:१-२०

  • नमस्कार (१, २)

  • खोट्या शिक्षकांविषयी इशारा (३-११)

  • पौलला अपार कृपा दाखवण्यात आली (१२-१६)

  • सर्वकाळाचा राजा (१७)

  • एका चांगल्या उद्देशासाठी असलेली लढाई लढ (१८-२०)

 आपल्या तारणकर्त्या देवाच्या आणि आपली आशा असलेल्या ख्रिस्त येशूच्या आज्ञेनुसार, ख्रिस्त येशूचा एक प्रेषित, पौल याच्याकडून, २  विश्‍वासात माझा निष्ठावान मुलगा असलेल्या तीमथ्यला:* देव जो पिता, आणि आपला प्रभू ख्रिस्त येशू यांच्याकडून तुला अपार कृपा, दया व शांती मिळो. ३  मी मासेदोनियाला जायला निघालो होतो तेव्हा जसे मी तुला इफिसमध्ये राहण्याचे प्रोत्साहन दिले होते, तसेच आताही देतो; यासाठी की तिथे असलेल्या काही जणांना, वेगळे सिद्धान्त न शिकवण्याची, ४  तसेच, काल्पनिक कथांकडे व वंशावळ्यांकडे लक्ष न देण्याची तू आज्ञा द्यावी. अशा गोष्टींमुळे उपयोगाचे असे काहीही साध्य होत नाही. आणि विश्‍वास वाढू शकेल अशी कोणतीही गोष्ट देवाकडून मिळण्याऐवजी, केवळ शंकाकुशंका उत्पन्‍न होतात. ५  या सूचना* देण्याचा उद्देश इतकाच आहे, की आपण शुद्ध मनाने व चांगल्या विवेकाने आणि निष्कपट विश्‍वासातून उत्पन्‍न होणारे प्रेम व्यक्‍त करावे. ६  या गोष्टींपासून बहकून काही जण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत. ७  त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक होण्याची इच्छा आहे, पण ते ज्या गोष्टी बोलतात किंवा ज्या गोष्टींचा इतका अट्टहास करतात, त्या त्यांनाच समजत नाहीत. ८  योग्य प्रकारे* पालन केल्यास, नियमशास्त्र चांगलेच आहे, हे आपल्याला माहीत आहे. ९  शिवाय, नियमशास्त्र हे नीतिमान मनुष्यासाठी देण्यात आलेले नाही. तर, जे अनीतिमान, बंडखोर, अधार्मिक, पापी, बेइमान,* अपवित्र, आईवडिलांची व इतरांची हत्या करणारे, १०  अनैतिक लैंगिक कृत्ये* करणारे, समलैंगिक कृत्ये करणारे पुरुष,* अपहरण करणारे, खोटे बोलणारे, खोटी शपथ घेणारे आणि हितकारक* शिकवणीच्या विरोधात असलेली दुसरी कोणतीही गोष्ट करणारे आहेत, त्यांच्यासाठी नियमशास्त्र देण्यात आले आहे. ११  ही शिकवण, आनंदी देवाने मला सोपवलेल्या त्याच्या गौरवी आनंदाच्या संदेशानुसार आहे. १२  मला सामर्थ्य देणाऱ्‍या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचा मी आभारी आहे, कारण त्याने मला विश्‍वासू समजून माझ्यावर एक सेवा सोपवली आहे, १३  खरेतर, मी पूर्वी देवाची निंदा करणारा, त्याच्या लोकांचा छळ करणारा आणि एक उद्धट मनुष्य होतो. तरीसुद्धा, मला दया दाखवण्यात आली कारण मी अजाणतेत आणि विश्‍वास नसल्यामुळे तसे वागलो. १४  पण, मला विश्‍वास आणि ख्रिस्त येशूमध्ये असलेले प्रेम, यांसोबतच आपल्या प्रभूची अपार कृपा भरपूर प्रमाणात मिळाली. १५  ही गोष्ट विश्‍वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारण्यालायक आहे, की ख्रिस्त येशू पापी लोकांना वाचवण्यासाठी* जगात आला. त्यांच्यापैकी मी सर्वात मोठा पापी आहे. १६  तरीसुद्धा, मला दया दाखवण्यात आली, यासाठी की मी जो सर्वात मोठा पापी, त्या माझ्याद्वारे ख्रिस्त येशूने त्याची सगळी सहनशीलता दाखवावी आणि सर्वकाळाचे जीवन मिळवण्याकरता जे त्याच्यावर विश्‍वास ठेवतील, अशा सर्वांसमोर माझे उदाहरण ठेवावे. १७  सर्वकाळाचा राजा, अविनाशी, अदृश्‍य, जो एकच देव त्याला सदासर्वकाळ सन्मान व गौरव मिळो. आमेन. १८  तीमथ्य, माझ्या मुला, तुझ्याविषयी करण्यात आलेल्या भविष्यवाण्यांनुसार मी या सूचना* तुला सोपवून देत आहे, यासाठी की त्यांच्या साहाय्याने तू एका चांगल्या उद्देशासाठी असलेली ही लढाई लढत राहावी. १९  तसेच, तू आपला विश्‍वास व एक चांगला विवेक टिकवून ठेवावा, कारण काहींनी तो नाकारल्यामुळे त्यांच्या विश्‍वासाचे जहाज फुटून उद्‌ध्वस्त झाले आहे. २०  हुमनाय व आलेक्सांद्र हे त्यांच्यापैकी आहेत आणि मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे, यासाठी की ताडन मिळाल्यामुळे त्यांनी देवाची निंदा न करण्याचा धडा शिकावा.

तळटीपा

म्हणजे “जो देवाचा सन्मान करतो.”
किंवा “हुकूम; आदेश.”
शब्दशः “कायद्यानुसार.”
किंवा “एकनिष्ठ प्रेम नसलेले.”
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “पुरुषांसोबत संभोग करणारे पुरुष.” शब्दशः “पुरुषांसोबत झोपणारे पुरुष.”
किंवा “उपयोगी.”
किंवा “लोकांचे तारण करण्यासाठी.”
किंवा “हुकूम; आदेश.”