१ तीमथ्य ३:१-१६

  • देखरेख करणाऱ्‍यांच्या पात्रता (१-७)

  • सहायक सेवकांच्या पात्रता (८-१३)

  • सुभक्‍तीचे पवित्र रहस्य (१४-१६)

 मंडळीत देखरेख करण्यास पात्र ठरण्यासाठी जर एखादा मनुष्य प्रयत्न करत असेल, तर तो चांगल्या कामाची इच्छा बाळगतो, हे वाक्य भरवशालायक आहे. २  त्यामुळे देखरेख करणारा हा, ज्याच्याकडे बोट दाखवता येणार नाही असा असावा; तो एकाच स्त्रीचा पती, संयमी, समंजस,* सुव्यवस्थित, पाहुणचार करण्याची आवड असलेला, शिकवण्याची योग्यता असलेला असावा. ३  तो दारुडा, किंवा मारामारी करणारा* नसावा, तर समजूतदार असावा; तो भांडखोर आणि पैशाचा लोभी नसावा. ४  तो आपल्या कुटुंबाचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारा* आणि आपल्या मुलांना पूर्ण गांभीर्याने अधीनतेत ठेवणारा असावा, ५  (कारण जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाचे नेतृत्व करता* येत नसेल, तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?), ६  तो विश्‍वासात नवीन नसावा,* नाहीतर तो गर्वाने फुगून, सैतानाला* देण्यात आलेला न्यायदंड स्वतःवर ओढवून घेईल. ७  तसेच, त्याची बदनामी* होऊ नये व तो सैतानाच्या पाशाला बळी पडू नये, म्हणून बाहेरच्यांनीही त्याच्याविषयी चांगली साक्ष* दिलेली असावी. ८  त्याच प्रकारे, सहायक सेवकही गंभीर असावेत. ते दुतोंडे,* खूप जास्त पिणारे, बेइमानीच्या कमाईचा लोभ धरणारे असू नयेत. ९  शुद्ध विवेक टिकवून ठेवण्यासोबतच, ते पवित्र रहस्याला म्हणजेच विश्‍वासाला जडून राहणारे असे असावेत. १०  तसेच, आधी त्यांच्या योग्यतेची* पारख केली जावी, आणि मग निर्दोष आढळल्यास त्यांनी सेवक म्हणून कार्य करावे. ११  त्याच प्रकारे स्त्रियांनी गंभीर असावे. त्या दुसऱ्‍यांची निंदा करणाऱ्‍या असू नयेत, तर संयमी आणि सर्व बाबतींत विश्‍वासू असाव्यात. १२  सहायक सेवक एकाच स्त्रीचा पती, आणि आपल्या मुलांचे व कुटुंबाचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारा असावा. १३  कारण जे पुरुष चांगल्या प्रकारे सेवा करतात, ते आपल्यासाठी चांगले नाव कमावतात आणि ख्रिस्त येशूवर असलेल्या विश्‍वासासंबंधी अगदी मोकळेपणाने बोलू शकतात. १४  मला आशा आहे, की मी लवकरच तुझ्याकडे येईन. तरीसुद्धा, मी तुला या गोष्टी लिहीत आहे, १५  कारण जरी मला उशीर लागला, तरी जिवंत देवाची मंडळी आणि सत्याचा स्तंभ व आधार असलेल्या देवाच्या घराण्यात, तू कसे वागावे हे तुला माहीत असावे. १६  खरोखर, या सुभक्‍तीचे पवित्र रहस्य निश्‍चितच महान आहे: ‘त्याला शरीरात प्रकट करण्यात आले, आत्म्यात नीतिमान ठरवण्यात आले, तो देवदूतांसमोर प्रकट झाला, विदेश्‍यांमध्ये त्याच्याविषयी घोषणा करण्यात आली, जगात त्याच्यावर विश्‍वास ठेवण्यात आला, आणि त्याला गौरवात वर घेण्यात आले.’

तळटीपा

शब्दशः “निरोगी मनाचा.”
किंवा “हिंसक वृत्तीचा.”
किंवा “व्यवस्था चालवणारा.”
किंवा “व्यवस्था चालवता.”
किंवा “अलीकडेच परिवर्तन झालेला नसावा.”
शब्दशः “दियाबलाला.” म्हणजे, निंदा करणारा.
किंवा “निंदा.”
किंवा “चांगले नाव.”
किंवा “कपटीपणे बोलणारे.”
किंवा “ते पात्र आहेत की नाही याची.”