१ तीमथ्य ५:१-२५
५ वयस्कर माणसाची कठोर शब्दांत टीका करू नको. उलट, त्याला आपल्या वडिलांसारखे समजून प्रेमाने सल्ला दे. तरुणांना भाऊ समजून,
२ वयस्कर स्त्रियांना आईसारखे समजून आणि तरुण स्त्रियांना अगदी शुद्ध मनाने आपल्या बहिणी समजून सल्ला दे.
३ ज्या विधवा खरोखरच विधवा* आहेत, त्यांच्याकडे लक्ष दे.*
४ पण, जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील, तर त्यांनी आधी आपल्या स्वतःच्या कुटुंबात सुभक्तीने वागायला आणि आपल्या आईवडिलांच्या व आजीआजोबांच्या उपकारांची परतफेड करायला शिकावे, कारण देवाच्या दृष्टीत हे योग्य आहे.
५ जी खरोखरच विधवा असून पूर्णपणे निराधार असते, ती देवावर आशा ठेवते आणि रात्रंदिवस त्याला प्रार्थना व याचना करत राहते.
६ पण जी ऐशआरामाच्या मागे लागते ती जिवंत असूनही मेलेली आहे.
७ त्यामुळे, कोणी त्यांच्याकडे बोट दाखवू नये म्हणून त्यांना या सूचना* देत जा.
८ जो स्वतःच्या माणसांच्या, आणि विशेषतः आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या गरजा पुरवत नाही, त्याने विश्वास नाकारला आहे, आणि विश्वास नसलेल्या मनुष्यापेक्षाही तो वाईट आहे.
९ साहाय्यासाठी असलेल्या यादीत अशाच विधवेचा समावेश करावा, जी कमीतकमी साठ वर्षांची आहे, जी एकाच पतीची पत्नी होती,
१० जी चांगली कामे केल्याबद्दल नावाजलेली आहे, जिने मुलांचे संगोपन केले असेल, जिने आदरातिथ्य केले असेल, जिने पवित्र जनांचे पाय धुतले असतील, जिने दुःखीकष्टी लोकांना मदत केली असेल, आणि जिने प्रत्येक चांगल्या कामासाठी स्वतःला वाहून घेतले असेल.
११ दुसरीकडे पाहता, तरुण विधवांचा यादीत समावेश करू नको, कारण जेव्हा त्यांच्या लैंगिक इच्छा त्यांच्या व ख्रिस्ताच्या आड येतात तेव्हा त्यांना लग्न करावेसे वाटू लागते.
१२ आणि सुरुवातीला घेतलेल्या निर्णयाच्या* विरोधात गेल्यामुळे त्या स्वतःवर न्यायदंड ओढावून घेतील.
१३ त्याच वेळी, त्यांना रिकामपणाची आणि घरोघरी फिरण्याची सवय लागते; रिकामपणासोबतच त्यांना गप्पा मारण्याचीही सवय लागते आणि त्या दुसऱ्यांच्या कामांत लुडबुड करू लागतात, तसेच, ज्यांविषयी त्यांनी बोलायला नको अशा गोष्टींविषयी त्या बोलू लागतात.
१४ म्हणून, माझी अशी इच्छा आहे की तरुण विधवांनी लग्न करावे, मुलांना जन्म द्यावा, आपले घरदार सांभाळावे आणि विरोधकांना टीका करण्याची संधी देऊ नये.
१५ काही तर आधीच भरकटून सैतानाच्या मागे गेल्या आहेत.
१६ जर विश्वासात असलेल्या एखाद्या स्त्रीच्या नातेवाइकांमध्ये विधवा असतील, तर तिने या विधवांना साहाय्य करावे. यामुळे, मंडळीवर भार पडणार नाही आणि मंडळी अशा विधवांना मदत करू शकेल, ज्या खरोखरच विधवा आहेत.*
१७ जे वडील मंडळीचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात, खासकरून जे बोलण्याच्या व शिकवण्याच्या बाबतीत मेहनत घेतात, त्यांना दुप्पट मान देण्यास योग्य समजले जावे.
१८ कारण शास्त्रात असे म्हटले आहे, “धान्याची मळणी करणाऱ्या बैलाचे तोंड बांधू नये,” तसेच, “कामकऱ्याला त्याची मजुरी मिळण्याचा हक्क आहे.”
१९ दोन किंवा तीन साक्षीदारांनी पुरावा दिल्याशिवाय कोणत्याही वयस्कर माणसाविरुद्ध* केलेला आरोप मान्य करू नकोस.
२० जे पाप करत राहतात त्यांची सर्वांच्या देखत कानउघाडणी कर, म्हणजे बाकीच्या सर्वांना इशारा मिळेल.*
२१ मी देवासमोर, ख्रिस्त येशूसमोर आणि निवडलेल्या देवदूतांसमोर तुला ही आज्ञा देतो, की तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता आणि कोणताही पक्षपात न करता या सूचनांचे पालन करावे.
२२ कोणत्याही मनुष्यावर आपले हात ठेवण्याची घाई करू नकोस;* तसेच, इतरांच्या पापांत भागीदार होऊ नकोस; स्वतःला शुद्ध ठेव.
२३ यापुढे पाणी पिऊ नकोस,* तर आपल्या पोटाच्या दुखण्यासाठी आणि तू वारंवार आजारी पडत असल्यामुळे, थोडा द्राक्षारस घेत जा.
२४ काही माणसांची पापे जाहीर होतात आणि त्यांचा लगेचच न्याय होतो, तर इतर माणसांची पापे नंतर उघड होतात.
२५ त्याच प्रकारे, चांगली कामेसुद्धा जाहीर होतात आणि जी होत नाहीत, तीसुद्धा फार काळ लपून राहत नाहीत.
तळटीपा
^ किंवा “खरोखरच गरजू आहेत”; अर्थात, ज्यांना कोणाचाही आधार नाही.
^ शब्दशः “त्यांचा सन्मान कर.”
^ किंवा “आज्ञा.”
^ किंवा “पूर्वी घेतलेल्या शपथेच्या.”
^ किंवा “खरोखरच गरजू आहेत”; अर्थात, ज्यांना कोणाचाही आधार नाही.
^ किंवा “मंडळीतील वडिलाविरुद्ध.”
^ शब्दशः “बाकीच्या सर्वांना धाक बसेल.”
^ अर्थात, कोणत्याही मनुष्याला नियुक्त करण्याची घाई करू नकोस.
^ किंवा “नुसतेच पाणी पिण्याचे सोडून दे.”