१ तीमथ्य ६:१-२१
६ जे दास* आहेत त्यांनी आपल्या मालकांना पूर्ण सन्मानास पात्र समजावे, म्हणजे देवाच्या नावाची व त्याच्या शिकवणीची कधीच बदनामी होणार नाही.
२ तसेच, ज्यांचे मालक विश्वासात आहेत त्यांनी ते केवळ आपले भाऊ आहेत म्हणून त्यांचा अनादर करू नये. याउलट, त्यांनी आणखीनच आनंदाने सेवा करावी, कारण ज्यांना त्यांच्या चांगल्या सेवेचा लाभ होतो ते मुळात विश्वासात असलेले व प्रिय आहेत.
या गोष्टी त्यांना शिकवत जा व त्यांचे पालन करण्याचा त्यांना सल्ला देत राहा.
३ जर कोणी वेगळे सिद्धान्त शिकवत असेल आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हितकारक* शिकवणीशी किंवा सुभक्तीनुसार असलेल्या शिकवणीशी सहमत नसेल, तर
४ तो गर्वाने फुगलेला आहे आणि त्याला काहीच समजत नाही. त्याला वाद घालण्याचे आणि शब्दांवरून भांडणे करण्याचे वेड आहे.* अशा गोष्टींमुळे ईर्ष्या, भांडणतंटा, निंदा* व दुष्ट संशय निर्माण होतात;
५ अशा माणसांची मने दूषित झाल्यामुळे आणि ते सत्यापासून दुरावल्यामुळे त्यांचे छोट्याछोट्या गोष्टींवरून सतत वादविवाद होत राहतात. सुभक्ती ही फायदा मिळवण्याचे साधन आहे असे त्यांना वाटते.
६ अर्थात, समाधानी वृत्ती असल्यास सुभक्ती नक्कीच खूप फायदेकारक आहे.
७ कारण आपण जगात काहीही आणलेले नाही, आणि आपण काही घेऊनही जाऊ शकत नाही.
८ त्यामुळे, आपल्याजवळ अन्न आणि वस्त्र* असल्यास आपण त्यांत समाधानी राहू या.
९ पण, ज्यांना कसेही करून श्रीमंत व्हायचे आहे, ते परीक्षेत व पाशात सापडतात आणि अनेक मूर्खपणाच्या व घातक इच्छांना बळी पडतात, ज्या त्यांना सर्वनाशाच्या दरीत लोटून देतात.
१० कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे आणि या प्रेमाच्या नादी लागून काही जण विश्वासापासून भरकटले आहेत आणि त्यांनी स्वतःला अनेक दुःखांनी भोसकून घेतले आहे.
११ पण, हे देवाच्या माणसा! तू मात्र अशा गोष्टींपासून दूर पळ. त्याऐवजी न्याय, सुभक्ती, विश्वास, प्रेम, धीर आणि सौम्यता हे गुण उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत राहा.
१२ विश्वासाची चांगली लढाई लढ; ज्यासाठी तुला बोलावण्यात आले होते आणि ज्याविषयी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर अगदी चांगल्या प्रकारे जाहीर कबुली दिली होती, त्या सर्वकाळाच्या जीवनाला घट्ट धरून ठेव.
१३ जो सर्वांना जिवंत ठेवतो त्या देवाला, आणि ज्याने पंतय पिलातपुढे चांगल्या प्रकारे जाहीर कबुली दिली, त्या ख्रिस्त येशूला समोर ठेवून मी तुला आदेश देतो, की
१४ आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत, मी दिलेल्या आज्ञेचे निष्कलंक व निर्दोष राहून पालन करत राहा;
१५ जो आशीर्वादित व एकमेव सामर्थ्यशाली अधिपती आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त नियुक्त वेळ आल्यावर स्वतःला प्रकट करेल. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे.
१६ तो एकटाच अमर आहे आणि जिथे कोणीही पोहचू शकत नाही अशा दिव्य, तेजस्वी प्रकाशात तो राहतो; कोणत्याही मनुष्याने त्याला पाहिलेले नाही आणि पाहूही शकत नाही. त्यालाच सन्मान व अनंत सामर्थ्य मिळो. आमेन.
१७ जे सध्याच्या जगाच्या व्यवस्थेत* श्रीमंत आहेत अशांना आज्ञा* दे, की त्यांनी गर्विष्ठ* होऊ नये; तसेच, त्यांनी नाशवंत धनावर नाही, तर आपण उपभोगत असलेल्या सर्व गोष्टी भरपूर प्रमाणात पुरवणाऱ्या देवावर आशा ठेवावी.
१८ त्यांना अशीही आज्ञा दे, की त्यांनी नेहमी भले करत राहावे, चांगली कामे करण्याच्या बाबतीत श्रीमंत, मोठ्या मनाचे* व उदार असावे.
१९ अशाने ते स्वतःकरता असे धन साठवतील जे एका सुरक्षित भवितव्याचा भक्कम आधार बनू शकेल, यासाठी की त्यांना खरे जीवन घट्ट धरून ठेवता यावे.
२० तीमथ्य, जो ठेवा तुझ्या स्वाधीन करण्यात आला आहे तो जपून ठेव; आणि पवित्र गोष्टींचा अनादर करणाऱ्या पोकळ संभाषणांपासून व ज्याला “ज्ञान” असे चुकीने नाव देण्यात आले आहे, त्याच्या विरोधी मतांपासून दूर राहा.
२१ अशा ज्ञानाचा दिखावा करून काही जण विश्वासापासून भरकटले आहेत.
देवाची अपार कृपा तुझ्यावर असो.
तळटीपा
^ किंवा “गुलामगिरीच्या जोखडाखाली असलेले दास.”
^ किंवा “उपयोगी.”
^ किंवा “करण्याची विकृत आवड आहे.”
^ किंवा “शिवीगाळ.”
^ किंवा “निवारा.” शब्दशः “पांघरूण.”
^ किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “सूचना.”
^ किंवा “बढाईखोर.”
^ किंवा “दानशूर.”