१ थेस्सलनीकाकर १:१-१०

  • नमस्कार ()

  • थेस्सलनीकाकरांच्या विश्‍वासाबद्दल देवाचे आभार (२-१०)

 पौल, सिल्वान* व तीमथ्य यांच्याकडून, देव जो पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यासोबत ऐक्यात असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला: तुम्हाला अपार कृपा व शांती मिळो. २  आम्ही आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हा सर्वांचा उल्लेख करून नेहमी देवाचे आभार मानतो, ३  कारण तुम्ही विश्‍वासूपणे जे कार्य केले आणि प्रेमळपणे जे परिश्रम घेतले; तसेच, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या तुमच्या आशेमुळे तुम्ही जो धीर धरला, त्याची आम्ही सतत आपला देव व पिता याच्यासमोर आठवण करतो. ४  देवाला प्रिय असलेल्या आमच्या बांधवांनो, त्याने तुम्हाला निवडले आहे हे आम्हाला माहीत आहे, ५  कारण आम्ही घोषित करत असलेला आनंदाचा संदेश हा तुम्हाला केवळ शब्दांनीच देण्यात आला नाही, तर सामर्थ्याने व पवित्र आत्म्याने* आणि पूर्ण खातरीसहित देण्यात आला; आणि तुमच्यामध्ये असताना आम्ही तुमच्यासाठी कशा प्रकारे काम केले हे तर तुम्हाला माहीतच आहे. ६  आणि तुम्ही आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला, कारण बऱ्‍याच संकटांत असतानाही तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे* मिळणाऱ्‍या आनंदाने वचन स्वीकारले ७  आणि असे केल्यामुळे तुम्ही मासेदोनिया व अखया इथे विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांसाठी उदाहरण बनला. ८  खरेतर, तुमच्यामुळे सबंध मासेदोनिया व अखयात लोकांना यहोवाचे* वचन ऐकायला मिळाले; पण त्यासोबतच तुमच्या विश्‍वासाविषयी सर्व ठिकाणी चर्चा होत आहे, आणि यामुळे आम्ही काही वेगळे सांगायची गरज नाही. ९  कारण तिथले लोक स्वतःच हे सांगतात, की कशा प्रकारे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा भेटलो आणि कशा प्रकारे तुम्ही आपल्या मूर्तींना सोडून देवाकडे वळला, यासाठी की तुम्ही एका जिवंत व खऱ्‍या देवाची सेवा करावी; १०  आणि त्याचा पुत्र, अर्थात येशू, ज्याला त्याने मेलेल्यांतून उठवले आणि जो येणाऱ्‍या क्रोधापासून आपल्याला वाचवेल, तो स्वर्गातून येण्याची वाट पाहावी.

तळटीपा

ज्याला सीला असेही म्हणतात.
किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीने.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीद्वारे.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.