१ थेस्सलनीकाकर ३:१-१३
३ त्यामुळे आमच्याने आणखी राहावले नाही, तेव्हा आम्ही एकटेच अथेन्समध्ये राहणे योग्य ठरेल असे आम्हाला वाटले;
२ आणि तुमच्या विश्वासासंबंधी तुम्हाला स्थिर करावे* व सांत्वन द्यावे, म्हणून आम्ही आमचा भाऊ आणि ख्रिस्ताविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करणारा देवाचा सेवक* तीमथ्य, याला तुमच्याकडे पाठवले,
३ यासाठी की, या संकटांमुळे तुमच्यापैकी कोणाचाही विश्वास डळमळू* नये. या गोष्टी आपल्याला सोसाव्याच लागतील* हे तुम्हाला स्वतःला माहीत आहे.
४ कारण, आपल्याला संकटे सोसावी लागतील हे तुमच्यासोबत असताना आम्ही तुम्हाला आधीच सांगत होतो आणि अगदी तसेच घडले हे तुम्हाला माहीत आहे.
५ त्यामुळे, मला अगदीच राहावले नाही तेव्हा तुमच्या विश्वासूपणाबद्दल जाणून घेण्यासाठी मी तीमथ्यला पाठवले; कारण कदाचित मोहात पाडणाऱ्याने तुम्हाला मोहात पाडले असेल आणि तुमच्यासाठी केलेले आमचे परिश्रम व्यर्थ गेले असतील, असे आम्हाला वाटले.
६ पण इतक्यातच तीमथ्य तुमच्याकडून परत आला आहे आणि त्याने आम्हाला तुमच्या विश्वासूपणाविषयी व प्रेमाविषयी चांगली बातमी दिली आहे; म्हणजे, हेच की तुम्ही अजूनही आमची प्रेमाने आठवण काढत असता, आणि जसे आम्ही तुम्हाला पाहायला उत्सुक आहोत तसेच तुम्हीही आम्हाला पाहायला उत्सुक आहात.
७ म्हणून बांधवांनो, आमच्या सर्व दुःखात* आणि संकटातही आम्हाला तुमच्यामुळे व तुम्ही दाखवत असलेल्या विश्वासूपणामुळे सांत्वन मिळाले आहे.
८ कारण तुम्ही प्रभूमध्ये स्थिर उभे आहात हे जाणून आम्हाला नवी उमेद मिळाली आहे.*
९ तुमच्यामुळे आम्हाला देवासमोर जो मनस्वी आनंद झाला आहे, त्याबद्दल आम्ही त्याचे आभार कसे व्यक्त करावेत?
१० आम्ही रात्रंदिवस अतिशय प्रामाणिकपणे देवाला याचना करतो, की तुम्हाला प्रत्यक्ष पाहणे* आणि तुमच्या विश्वासात जी काही कमी असेल ती भरून काढणे आम्हाला शक्य व्हावे.
११ आता स्वतः देव व पिता याने व आपल्या प्रभू येशूने तुमच्याकडे येण्याचा मार्ग आमच्यासाठी मोकळा करावा.
१२ शिवाय, आम्ही प्रभूला अशीही विनंती करतो, की आम्हाला तुमच्यासाठी वाटत असलेल्या प्रेमाप्रमाणेच, तुम्हाला एकमेकांबद्दल व सर्वांबद्दल वाटणारे प्रेम वाढावे आणि ओसंडून वाहावे.
१३ यासाठी की, प्रभू येशू त्याच्या सर्व पवित्र जनांसोबत उपस्थित होईल तेव्हा, त्याने आपला देव व पिता याच्यासमोर तुमची अंतःकरणे स्थिर करावीत आणि तुम्हाला पवित्र व निर्दोष ठरवावे.
तळटीपा
^ किंवा “तुम्हाला विश्वासात मजबूत करावे.”
^ किंवा कदाचित, “देवाचा सहकारी.”
^ शब्दशः “बहकू.”
^ किंवा “या गोष्टी आपल्यासाठी ठरलेल्या आहेत.”
^ शब्दशः “गरजेत.”
^ शब्दशः “आम्ही जगतो.”
^ शब्दशः “तुमचे तोंड पाहणे.”