१ थेस्सलनीकाकर ४:१-१८
४ बांधवांनो, शेवटी प्रभू येशूद्वारे आम्ही तुम्हाला विनंती व आग्रह करतो, की देवाचे मन आनंदित करण्यासाठी तुम्ही कसे वागावे याविषयी आम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे मार्गदर्शन दिले आणि ज्याप्रमाणे तुम्ही करतही आहात, त्याचप्रमाणे आणखी पूर्णपणे करत राहा.
२ कारण, प्रभू येशूद्वारे आम्ही तुम्हाला ज्या सूचना* दिल्या, त्या तुम्हाला माहीतच आहेत.
३ देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही पवित्र असावे आणि अनैतिक लैंगिक कृत्यांपासून* स्वतःला दूर ठेवावे.
४ तुमच्यापैकी प्रत्येकाला स्वतःच्या शरीरावर,* पवित्रतेने व आदराने नियंत्रण ठेवता आले पाहिजे.
५ देवाला न ओळखणाऱ्या विदेश्यांसारखे लोभीपणाने, अनियंत्रित लैंगिक वासनेच्या आहारी जाऊ नका.
६ कोणीही या बाबतीत उचित मर्यादा ओलांडून आपल्या भावाचा गैरफायदा घेऊ नये, कारण या सर्व गोष्टींबद्दल यहोवा* शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. याविषयी आम्ही तुम्हाला पूर्वीच सांगितले होते आणि कडक ताकीदही दिली होती.
७ कारण देवाने आपल्याला अशुद्धतेसाठी नाही, तर पवित्रतेसाठी बोलावले आहे.
८ त्यामुळे, जो कोणी या शिकवणीचा अनादर करतो तो माणसांचा नाही, तर तुम्हाला आपला पवित्र आत्मा देणाऱ्या देवाचा अनादर करतो.
९ पण बंधुप्रेमाविषयी बोलायचे झाले, तर या बाबतीत आम्ही तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण देवाने स्वतः तुम्हाला एकमेकांवर प्रेम करायला शिकवले आहे.
१० खरेतर, सबंध मासेदोनियाच्या सर्व बांधवांवर तुम्ही अशा प्रकारचे प्रेम करतही आहात. पण बांधवांनो, आम्ही तुम्हाला ते अधिकाधिक करण्याचे प्रोत्साहन देतो.
११ आम्ही शिकवल्याप्रमाणे, तुम्ही दुसऱ्याच्या कारभारात लुडबुड न करता शांतीने राहण्याचा व आपल्या हातांनी कष्ट करण्याचा नेहमी प्रयत्न करा.
१२ यासाठी की, बाहेरच्या लोकांच्या दृष्टीत तुम्ही नेहमी सभ्यपणे चालावे आणि तुमच्यात कोणतीही कमी असू नये.
१३ शिवाय बांधवांनो, जे मरण पावले आहेत* त्यांच्याविषयी तुम्ही अंधारात* असावे अशी आमची इच्छा नाही, यासाठी की ज्यांना कोणतीही आशा नाही अशा लोकांप्रमाणे तुम्ही शोक करू नये.
१४ कारण येशू मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला या गोष्टीवर जर आपला विश्वास असेल, तर मग जे येशूद्वारे मरण पावले आहेत, त्यांनाही देव त्याच्यासोबत असण्याकरता जिवंत करेल.
१५ यहोवाच्या* वचनाने आम्ही तुम्हाला हे सांगतो, की जिवंत असलेल्यांपैकी जे आपण प्रभूच्या उपस्थितीपर्यंत हयात असू, ते मरण पावलेल्यांच्या* पुढे जाणारच नाही;
१६ कारण, प्रभू स्वतः देवाचा कर्णा घेऊन आद्यदेवदूताच्या* वाणीने आज्ञा देत स्वर्गातून उतरेल, आणि ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्यांपैकी जे मेले आहेत ते आधी जिवंत होतील.
१७ त्यानंतर, जिवंत असलेल्यांपैकी जे आपण हयात असू त्यांना आकाशात प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये उचलून घेतले जाईल आणि अशा रीतीने आपण सदासर्वदा प्रभूसोबत राहू.
१८ तेव्हा, या गोष्टींनी एकमेकांना सांत्वन देत जा.
तळटीपा
^ किंवा “आदेश.”
^ ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “भांड्यावर.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “झोपी गेले आहेत.”
^ किंवा “अजाण.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “झोपी गेलेल्यांच्या.”
^ शब्दार्थसूची पाहा.