१ पेत्र १:१-२५
१ येशू ख्रिस्ताचा प्रेषित, पेत्र याच्याकडून पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रातांत विखुरलेल्या तात्पुरत्या रहिवाशांना आणि निवडलेल्यांना;
२ अर्थात देव जो पिता, याने ज्यांना त्याच्या आत्म्याद्वारे* शुद्ध करून आपल्या पूर्वज्ञानानुसार निवडले होते, यासाठी की त्यांनी आज्ञाधारक व्हावे आणि त्यांच्यावर येशू ख्रिस्ताचे रक्त शिंपडले जावे, अशांना:
तुमच्यावर देवाच्या अपार कृपेचा व शांतीचा वर्षाव होत राहो.
३ जो आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे, त्याची स्तुती असो कारण त्याच्या महान दयेनुसार त्याने येशू ख्रिस्ताचे मेलेल्यांतून पुनरुत्थान* करण्याद्वारे एका जिवंत आशेकरता आपल्याला नवा जन्म दिला आहे,
४ यासाठी की आपल्याला एक अविनाशी व निष्कलंक असा वारसा मिळावा, जो कधीही नाहीसा होणार नाही. हा वारसा तुमच्यासाठी स्वर्गात राखून ठेवला आहे.
५ तुमच्या विश्वासामुळे देव त्याच्या सामर्थ्याद्वारे तारणासाठी तुमचे रक्षण करत आहे, जे तारण काळाच्या शेवटी प्रकट केले जाईल.
६ याच कारणामुळे तुम्ही अतिशय आनंदित आहात. तरीसुद्धा, थोड्या काळासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख सोसणे आवश्यक आहे.
७ यासाठी की, तुमचा विश्वास पारखला जावा; आणि जे सोने, आगीत परीक्षा झालेले* असूनही नष्ट होते, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असलेल्या तुमच्या विश्वासामुळे, येशू ख्रिस्त प्रकट होण्याच्या वेळी तुम्हाला प्रशंसा, गौरव व सन्मान मिळावा.
८ तुम्ही ख्रिस्ताला कधीच पाहिलेले नसूनही तुमचे त्याच्यावर प्रेम आहे. आता जरी तुम्हाला तो दिसत नसला, तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि अतिशय आनंदित आहात. तुमचा हा आनंद अद्भुत आहे व त्याचे वर्णन करता येणार नाही.
९ कारण तुम्हाला खातरी आहे, की तुमच्या विश्वासामुळे तुम्हाला तारणाचे प्रतिफळ मिळेल.*
१० तुमच्यासाठी असलेल्या अपार कृपेबद्दल ज्या संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केली होती, त्यांनी या तारणाविषयी कसून चौकशी व बारकाईने शोध केला.
११ त्यांच्यामध्ये असलेला देवाचा आत्मा ख्रिस्ताविषयी कोणत्या विशिष्ट काळाकडे किंवा समयाकडे संकेत करत आहे, याविषयी ते तपासून पाहत राहिले; कारण, ख्रिस्ताला कोणकोणती दुःखे सहन करावी लागतील आणि त्यानंतर त्याचा कशा प्रकारे गौरव केला जाईल, याबद्दल आत्म्याने त्यांना आधीच साक्ष दिली होती.
१२ ते स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी सेवा करत आहेत, ही गोष्ट त्यांना प्रकट करण्यात आली होती; आणि स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याद्वारे ज्यांनी आता तुम्हाला आनंदाचा संदेश सांगितला आहे, त्यांनी याविषयीचेच वचन तुम्हाला घोषित केले. खरेतर, या गोष्टींचे परीक्षण करण्यासाठी* देवदूतही उत्सुक आहेत.
१३ म्हणून, तुम्ही उत्साहाने काम करण्यासाठी आपले मन सज्ज करा आणि पूर्णपणे सावध असा. येशू ख्रिस्त प्रकट होण्याच्या वेळी जी अपार कृपा तुम्हाला मिळणार आहे, तिच्यावर आशा ठेवा.
१४ आज्ञाधारक मुलांप्रमाणे व्हा आणि पूर्वी अज्ञानात असताना ज्या इच्छा तुम्ही बाळगत होता, त्यांनुसार वागण्याचे सोडून द्या.
१५ तर, ज्या पवित्र देवाने तुम्हाला बोलावले आहे, त्याच्यासारखे तुम्हीदेखील आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा,
१६ कारण असे लिहिले आहे: “तुम्ही पवित्र असले पाहिजे, कारण मी पवित्र आहे.”
१७ जो भेदभाव न करता, ज्याच्या त्याच्या कामानुसार प्रत्येकाचा न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारत असाल, तर मग तात्पुरते रहिवासी म्हणून या जगात राहत असताना त्याची भीती बाळगून चाला.
१८ कारण तुम्हाला हे माहीत आहे, की तुमच्या वाडवडिलांपासून* चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ जीवनशैलीतून, सोने किंवा चांदी यांसारख्या नाशवंत गोष्टींनी तुमची सुटका करण्यात आलेली नाही;*
१९ तर एका निष्कलंक व निर्दोष कोकऱ्याच्या, म्हणजेच ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने तुमची सुटका करण्यात आली आहे.
२० देवाने आपल्या पूर्वज्ञानानुसार त्याला जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडले होते हे खरे आहे, पण तुमच्यासाठी त्याला काळाच्या शेवटी प्रकट करण्यात आले.
२१ त्याच्याद्वारेच तुम्ही देवावर विश्वास ठेवणारे झाला. देवाने त्याला मेलेल्यांतून उठवून गौरवले, यासाठी की तुम्ही देवावर विश्वास व आशा ठेवावी.
२२ तुम्ही सत्याचे पालन करण्याद्वारे स्वतःला शुद्ध केले आहे आणि यामुळे तुम्ही निष्कपट मनाने बंधुप्रेम दाखवता. म्हणून, आता एकमेकांवर शुद्ध मनाने जिवापाड प्रेम करत राहा.
२३ कारण तुम्हाला नाश होणाऱ्या बीजाद्वारे नाही, तर अविनाशी बीजाद्वारे,* अर्थात जिवंत व अनंत देवाच्या वचनाद्वारे नवा जन्म देण्यात आला आहे.
२४ कारण, “माणूस हा गवतासारखा आणि त्याचे वैभव एखाद्या रानफुलासारखे आहे; गवत कोमेजून जाते आणि फूल गळून पडते,
२५ पण यहोवाचे* वचन सर्वकाळ टिकते.” हे “वचन” म्हणजेच तुम्हाला सांगण्यात आलेला आनंदाचा संदेश आहे.
तळटीपा
^ किंवा “क्रियाशील शक्तीद्वारे.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “शुद्ध केलेले.”
^ किंवा “तुमचा जीव वाचवला जाईल.”
^ शब्दशः “गोष्टींत डोकावून पाहण्यासाठी.”
^ किंवा “परंपरेनुसार.”
^ शब्दशः “तुम्हाला खंडणी देऊन सोडवण्यात आलेले नाही.”
^ अर्थात, प्रजोत्पादन किंवा फळ उत्पन्न करू शकणारे बीज.
^ शब्दार्थसूची पाहा.