१ पेत्र २:१-२५

  • देवाच्या वचनासाठी तीव्र लालसा उत्पन्‍न करा (१-३)

  • जिवंत दगडांपासून आध्यात्मिक मंदिराचे बांधकाम (४-१०)

  • जगात परकीय म्हणून राहणे (११, १२)

  • योग्य अधीनता (१३-२५)

    • ख्रिस्त, आपल्यासाठी आदर्श (२१)

 त्यामुळे सर्व प्रकारचा दुष्टपणा, कपट, ढोंग, हेवा आणि लोकांच्या मागे त्यांची निंदा करण्याचे सोडून द्या. २  नवीन जन्मलेल्या मुलांसारखे, देवाच्या वचनाच्या शुद्ध* दुधासाठी तीव्र लालसा* उत्पन्‍न करा, जेणेकरून तुमची वाढ होत राहील व तुमचे तारण होईल.* ३  कारण, प्रभू किती प्रेमळ आहे हे तुम्ही स्वतः अनुभवले* आहे. ४  माणसांनी नाकारलेला पण देवाचा निवडलेला, जिवंत व मौल्यवान दगड असलेल्या प्रभूकडे येत असताना, ५  तुम्ही स्वतःदेखील पवित्र याजकवर्ग होण्यासाठी जिवंत दगड या नात्याने एका आध्यात्मिक मंदिराच्या बांधकामासाठी रचले जात आहात; या उद्देशाने, की तुम्ही येशू ख्रिस्ताद्वारे देवाला मान्य अशी आध्यात्मिक बलिदाने अर्पण करावीत. ६  कारण शास्त्रात म्हटले आहे: “पाहा! मी सीयोनमध्ये एक निवडलेला दगड, इमारतीच्या पायात एक मौल्यवान, कोपऱ्‍याचा दगड बसवत आहे; आणि त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍याची कधीच निराशा* होणार नाही.” ७  म्हणून, तुमच्यासाठी तो मौल्यवान आहे कारण तुम्ही विश्‍वास ठेवता; पण, जे विश्‍वास ठेवत नाहीत अशांबद्दल शास्त्र म्हणते, की “बांधकाम करणाऱ्‍यांनी जो दगड नाकारला तोच कोपऱ्‍याचा मुख्य दगड* बनला आहे,” ८  आणि त्यांच्यासाठी तो “ठेच लागण्याचा दगड आणि अडखळणाचा खडक” बनला आहे. ते वचनाचे पालन करत नाहीत म्हणून ते अडखळतात. त्यांचा हा अंत ठरलेला आहे. ९  तुम्ही मात्र, एक निवडलेला वंश, राजे असलेले याजक, एक पवित्र राष्ट्र आणि देवाची खास प्रजा आहात; यासाठी की, ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्‌भुत प्रकाशात आणले त्याच्या महान गुणांची* तुम्ही सबंध जगात घोषणा करावी. १०  कारण एके काळी तुम्ही देवाचे लोक नव्हता, पण आता तुम्ही त्याचे लोक आहात; एके काळी तुमच्यावर दया दाखवण्यात आली नव्हती, पण आता मात्र दाखवण्यात आली आहे. ११  प्रिय बांधवांनो, तुम्ही परकीय व तात्पुरते रहिवासी असल्यामुळे मी आर्जव करतो, की तुमच्याशी लढत राहणाऱ्‍या शारीरिक वासनांपासून दूर राहा. १२  जगातील लोकांमध्ये आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ते तुम्हाला वाईट म्हणून तुमच्यावर दोष लावत असले, तरी तुमची चांगली कार्ये स्वतः पाहिल्यामुळे देव परीक्षा घ्यायला येईल त्या दिवशी ते देवाचा गौरव करतील. १३  मानवाने स्थापित केलेल्या प्रत्येक अधिकाराच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन असा; १४  तसेच, राजाने नेमलेल्या राज्यपालांच्या अधीन असा, कारण वाईट कामे करणाऱ्‍यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामे करणाऱ्‍यांची प्रशंसा करण्यासाठी त्यांना नेमले जाते. १५  खुद्द देवाची अशी इच्छा आहे, की तुम्ही चांगली कामे करून, अविचारीपणे बोलणाऱ्‍या मूर्ख माणसांची तोंडे बंद करावीत.* १६  स्वतंत्र लोकांसारखे जीवन जगा; पण, वाईट कामांवर पांघरूण घालण्यासाठी* आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग करू नका, तर देवाचे दास व्हा. १७  सर्व प्रकारच्या लोकांचा आदर करा, संपूर्ण बंधुसमाजावर* प्रेम करा, देवाची भीती बाळगा आणि राजाचा आदर करा. १८  सेवकांनी योग्य भय बाळगून आपल्या मालकांच्या अधीन असावे; जे चांगले व समजूतदार आहेत त्यांच्याच नाही, तर ज्यांना संतुष्ट करणे कठीण असते अशांच्याही अधीन असावे. १९  कारण देवासमोर शुद्ध विवेक बाळगण्यासाठी जर कोणी त्रास* व अन्याय सहन करत असेल, तर देवाच्या नजरेत ही एक चांगली गोष्ट आहे. २०  कारण पाप केल्याबद्दल जर तुम्हाला मारहाण झाली आणि तुम्ही ती निमूटपणे सहन केली, तर त्यात कोणता मोठेपणा? पण, जर चांगले केल्याबद्दल तुम्ही दुःख सोसले, तर देवाच्या नजरेत ही एक चांगली गोष्ट आहे. २१  खरेतर, याच मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला बोलावण्यात आले होते, कारण ख्रिस्तानेसुद्धा दुःख सोसले आणि असे करण्याद्वारे त्याने तुमच्याकरता एक आदर्श घालून दिला, यासाठी की तुम्ही त्याच्या पावलांचे जवळून अनुकरण करावे. २२  त्याने कोणतेही पाप केले नाही आणि कपटीपणाच्या गोष्टी त्याच्या तोंडून कधीही निघाल्या नाहीत. २३  त्याचा अपमान* केला जात असताना, त्याने उलटून अपमान* केला नाही. दुःख भोगत असताना, त्याने धमकावले नाही; उलट, त्याने नीतीने न्याय करणाऱ्‍याच्या हाती स्वतःला सोपवून दिले. २४  त्याने वधस्तंभावर* तुमचीआमची पापे स्वतःच्या शरीरावर घेतली, यासाठी की आपण पापांसाठी मरावे आणि नीतिमत्त्वासाठी जगावे. आणि “त्याच्या जखमांनी तुम्हाला आरोग्य मिळाले.” २५  कारण तुम्ही भरकटलेल्या मेंढरांसारखे होता, पण आता तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे व तुमच्या जिवाची* देखरेख करणाऱ्‍याकडे परतला आहात.

तळटीपा

किंवा “निरशा.”
किंवा “इच्छा.”
किंवा “तुम्हाला वाचवले जाईल.”
शब्दशः “चाखून पाहिले.”
शब्दशः “लज्जित.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “सद्‌गुणांची,” अर्थात, त्याचे प्रशंसनीय गुण व कार्ये.
शब्दशः “माणसांच्या मुसक्या बांधाव्यात.”
किंवा “वाईट कामांसाठी सबब म्हणून.”
शब्दशः “बंधुत्वावर.”
किंवा “दुःख; यातना.”
किंवा “निंदा.”
किंवा “निंदा.”
किंवा “झाडावर.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जीवनाच्या.”