१ पेत्र ३:१-२२
३ त्याच प्रकारे पत्नींनो, तुम्हीसुद्धा आपल्या पतींच्या अधीन राहा, म्हणजे जरी एखादा पती वचनाचे पालन करणारा नसला, तरी त्याने एकाही शब्दाशिवाय केवळ आपल्या पत्नीच्या वागणुकीमुळे,
२ अर्थात, तिचे शुद्ध आचरण आणि ती मनापासून दाखवत असलेला आदर पाहून विश्वासात यावे.
३ बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींनी, म्हणजेच खास प्रकारच्या केशरचना करून,* तसेच सोन्याचे दागिने किंवा महागडे कपडे घालून आपले सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करू नका.
४ तर आपल्या अंतःकरणातील गुप्त व्यक्तीला शांत वृत्ती व सौम्यता यांसारख्या गुणांनी सजवा. हे सौंदर्य कधीही नष्ट होत नाही आणि ते देवाच्या नजरेत फार मौल्यवान आहे.
५ कारण जुन्या काळात देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रिया, आपल्या पतींच्या अधीन राहून स्वतःला अशाच प्रकारे सजवत होत्या.
६ जसे की, सारा ही अब्राहामच्या आज्ञेत राहिली आणि ती त्याला प्रभू म्हणायची. तुम्हीसुद्धा चांगले करत राहिला आणि भीतीला बळी पडला नाहीत, तर तुम्हीही तिच्या मुली बनू शकता.
७ त्याच प्रकारे, पतींनो आपल्या पत्नींसोबत विचारशीलपणे राहा.* त्या स्त्रिया असल्यामुळे, अधिक नाजूक भांड्यांसारख्या आहेत हे ओळखून त्यांना मान द्या, नाहीतर तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाहीत; कारण, तुमच्यासोबत त्यासुद्धा देवाच्या अपार कृपेने मिळणार असलेल्या जीवनाच्या वारसदार आहेत.
८ शेवटी, तुमच्या सर्वांच्या विचारांत एकता* असावी, तसेच एकमेकांशी वागताना सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा व नम्रता दाखवा.
९ कोणी तुमचे नुकसान केल्यास त्याचे नुकसान करू नका किंवा कोणी तुमचा अपमान केल्यास त्याचा अपमान करू नका. उलट, आशीर्वाद देऊन* त्याची परतफेड करा कारण तुम्हाला याच मार्गावर चालण्यासाठी बोलावण्यात आले होते, यासाठी की तुम्हाला वारशात आशीर्वाद मिळावेत.
१० कारण “ज्या कोणाला जीवनात सुख आणि दीर्घायुष्य हवे आहे, त्याने आपली जीभ वाईट गोष्टी बोलण्यापासून आणि आपले तोंड कपटीपणाच्या गोष्टी करण्यापासून आवरावे.
११ त्याने वाईट गोष्टींपासून वळून चांगले ते करावे; त्याने शांती टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करावा.
१२ कारण यहोवाचे* डोळे नीतिमानांकडे लागलेले असतात आणि तो त्यांच्या याचनेकडे कान लावतो, पण वाईट गोष्टी करणाऱ्याकडे यहोवा* पाठ फिरवतो.”
१३ खरे पाहता, तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आवेशी असल्यास कोण तुमचे नुकसान करेल?
१४ पण न्यायनीतीने वागल्यामुळे जरी तुम्हाला दुःख सोसावे लागले, तरी तुम्ही सुखी आहात. त्यांना ज्या गोष्टींची भीती वाटते त्यांची भीती तुम्ही बाळगू नका* आणि अस्वस्थ होऊ नका.
१५ तर ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात प्रभू म्हणून पवित्र माना. तुम्ही बाळगत असलेल्या आशेबद्दल जो कोणी प्रश्न विचारतो, त्याला उत्तर देण्यासाठी नेहमी तयार असा, पण सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून असे करा.
१६ चांगला विवेक टिकवून ठेवा, म्हणजे तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारे वाईट बोलले जात असल्यास, ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने तुमची चांगली वागणूक पाहून तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांना लाजिरवाणे वाटेल.
१७ कारण जर चांगले करत असल्यामुळे तुम्हाला दुःख सोसावे लागले, आणि जर या गोष्टीला अनुमती देण्याची देवाची इच्छा असेल, तर वाईट केल्यामुळे दुःख सोसण्यापेक्षा, चांगले करून दुःख सोसणे बरे आहे.
१८ कारण ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल, सर्वकाळासाठी एकदाच मरण सोसले. तो नीतिमान असूनही अनीतिमान लोकांसाठी मरण पावला, यासाठी की तुम्ही देवाकडे यावे. त्याला शरीरात ठार मारण्यात आले, पण आत्म्यात जिवंत करण्यात आले.
१९ आणि या स्थितीत त्याने जाऊन कैदेत असलेल्या दुरात्म्यांना प्रचार केला.
२० हे तेच दुरात्मे होते, ज्यांनी पूर्वी नोहाच्या काळात देवाची आज्ञा मोडली होती. त्या वेळी, देव सहनशीलपणे वाट पाहत असताना* जहाजाचे* बांधकाम सुरू होते आणि त्या जहाजात मोजकेच लोक, अर्थात आठ जण* पाण्यातून सुखरूप बचावले.
२१ ही घटना आज येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे* तुम्हाला वाचवणाऱ्या बाप्तिस्म्याचे* चिन्ह आहे. (बाप्तिस्मा म्हणजे शरीराचा मळ दूर करणे नाही, तर देवाला एका शुद्ध विवेकाची विनंती करणे आहे.)
२२ ख्रिस्त, देवाच्या उजव्या हाताला आहे, कारण तो स्वर्गात गेला आणि देवदूत, अधिकार आणि सत्ता यांना त्याच्या अधीन करण्यात आले.
तळटीपा
^ शब्दशः “खास प्रकारे केस गुंफून.”
^ किंवा “ज्ञानानुसार; त्यांना समजून घेऊन.”
^ किंवा “सहमती.”
^ किंवा “त्याचे भले करून.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा कदाचित, “त्यांच्या धमक्यांना भिऊ नका.”
^ शब्दशः “देवाची सहनशीलता वाट पाहत होती.”
^ मत्तय २४:३८ तळटीप पाहा.
^ शब्दशः “जीव.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.