१ पेत्र ४:१-१९

  • ख्रिस्ताप्रमाणेच देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगा (१-६)

  • सर्व गोष्टींचा शेवट जवळ (७-११)

  • ख्रिस्ती म्हणून दुःख सोसणे (१२-१९)

 ख्रिस्ताने शरीरात दुःख सोसले, त्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच्यासारखीच मनोवृत्ती* ठेवण्यास तयार असा, कारण जो शरीरात दुःख सोसतो त्याने पाप करण्याचे सोडून दिले आहे, २  यासाठी की त्याने आपल्या उरलेल्या आयुष्यात माणसांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगावे. ३  कारण जगाच्या लोकांच्या इच्छेनुसार वागण्यात आतापर्यंत तुम्ही जो वेळ घालवला तो पुरे झाला. कारण तेव्हा तुम्ही निर्लज्ज वर्तन* करत होता, अनियंत्रित वासनांच्या आहारी गेला होता, तसेच प्रमाणाबाहेर पिणे, बेलगाम मौजमस्ती,* दारूबाजी* आणि घृणित मूर्तिपूजा यांसारख्या गोष्टी करत होता. ४  पण, आता तुम्ही त्यांच्यासोबत या अनैतिकतेच्या चिखलात लोळण्याचे सोडून दिले असल्यामुळे, ते गोंधळात पडले आहेत आणि त्यामुळे ते तुमच्याविषयी वाईट बोलतात. ५  पण या लोकांना, जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तयार आहे, त्याला हिशोब द्यावा लागेल. ६  खरेतर याच कारणामुळे आनंदाचा संदेश मेलेल्यांनाही घोषित करण्यात आला, यासाठी की, जरी सर्व माणसांप्रमाणेच त्यांचाही न्याय करण्यात आला, तरी त्यांनी देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जगावे. ७  पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे. म्हणून समंजस* असा आणि प्रार्थना करण्याच्या बाबतीत सतर्क* राहा. ८  पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा, कारण प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकते. ९  कुरकुर न करता एकमेकांचे आदरातिथ्य करा. १०  आपण वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्‍त होणारी देवाची अपार कृपा मिळालेले कारभारी आहोत. त्यामुळे, चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकाला ज्या प्रमाणात कृपादान मिळाले आहे, त्यानुसार त्याने ते इतरांच्या सेवेसाठी उपयोगात आणावे. ११  जर कोणी बोलत असेल, तर त्याने देवाची वचने बोलत असल्याप्रमाणे बोलावे; जर कोणी सेवा करत असेल, तर देव पुरवत असलेल्या सामर्थ्याने सेवा करत असल्याप्रमाणे त्याने ती करावी. यामुळे सर्व गोष्टींत येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा गौरव होईल. गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ त्याचेच आहे. आमेन. १२  प्रिय बांधवांनो, तुमच्यावर येत असलेल्या अग्नीपरीक्षांचे आश्‍चर्य वाटू देऊ नका. तुमच्या बाबतीत काहीतरी विचित्र घडत आहे असा विचार करू नका. १३  उलट, ज्या प्रमाणात तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखांत सहभागी झाला आहात, त्याबद्दल आनंद करा. यामुळे जेव्हा त्याचे गौरव प्रकट होईल, तेव्हाही तुम्ही आनंदी व्हाल आणि अत्यानंद कराल. १४  ख्रिस्ताच्या नावासाठी तुमची निंदा* होत असेल, तर तुम्ही सुखी आहात कारण गौरवाचा आत्मा, अर्थात देवाचा आत्मा तुमच्यावर आहे. १५  पण तुमच्यापैकी कोणालाही खुनी, चोर, अपराधी किंवा इतरांच्या कारभारांत लुडबुड करणारा म्हणून दुःख भोगावे लागू नये. १६  पण ख्रिस्ती म्हणून जर एखाद्याला दुःख सोसावे लागले तर त्याला याविषयी लाज वाटण्याचे कारण नाही, उलट त्याने या नावाने ओळखले जात असताना देवाचा गौरव करत राहावा. १७  देवाच्या घरापासून न्यायाची सुरुवात होण्याची नियुक्‍त वेळ आली आहे. आणि जर त्याची सुरुवात आपल्यापासून होणार आहे, तर मग जे देवाविषयीच्या आनंदाच्या संदेशानुसार चालत नाहीत, त्यांचे काय होईल? १८  “शिवाय, जर नीतिमानाचे तारण* मुश्‍कीलीने होत असेल तर मग जो अधार्मिक आणि पापी आहे, त्याचे काय होईल?” १९  म्हणूनच, देवाच्या इच्छेनुसार दुःखे सोसणाऱ्‍यांनी स्वतःला विश्‍वासू निर्माणकर्त्याच्या हाती सोपवून द्यावे आणि चांगले ते करत राहावे.

तळटीपा

किंवा “त्याच्यासारखाच निर्धार; निश्‍चय.”
ग्रीक, अॅसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “रंगेल पार्ट्‌या.”
किंवा “पिण्याच्या शर्यती लावणे.”
शब्दशः “निरोगी मनाचे.”
किंवा “सावध; जागृत.”
किंवा “अपमान.”
किंवा “वाचवले जाणे.”