२ करिंथकर ११:१-३३

  • पौल आणि अतिश्रेष्ठ प्रेषित (१-१५)

  • प्रेषित या नात्याने पौलने सोसलेली संकटे (१६-३३)

११  तुम्ही माझा थोडासा मूर्खपणा सहन करावा अशी माझी इच्छा आहे. खरेतर, तुम्ही तो सहन करतच आहात! २  देव जसा तुमच्याविषयी ईर्ष्यावान* आहे तशीच ईर्ष्या मीही तुमच्याविषयी बाळगतो. कारण तुम्हाला, एक पवित्र* कुमारी म्हणून एका पतीला अर्थात ख्रिस्ताला सादर करता यावे म्हणून मी स्वतः त्याच्याशी तुमची मागणी केली. ३  पण, ज्याप्रमाणे सापाने धूर्तपणे हव्वेला भुरळ घातली त्याप्रमाणे तुमची मनेही भ्रष्ट होऊन तुम्ही ख्रिस्तासाठी असलेला तुमचा प्रामाणिकपणा व पवित्रता* गमावून बसाल, अशी मला भीती वाटते. ४  कारण कोणी येऊन, आम्ही घोषित केलेल्या येशूऐवजी दुसऱ्‍याच येशूविषयी घोषणा करतो; किंवा तुम्हाला मिळालेल्या आत्म्याऐवजी दुसराच आत्मा घेऊन कोणी तुमच्याकडे येतो; किंवा तुम्ही स्वीकारलेल्या आनंदाच्या संदेशाऐवजी दुसराच संदेश घेऊन कोणी तुमच्याकडे येतो, तेव्हा तुम्ही त्याला सहजासहजी मान्य करता. ५  कारण, तुमच्या त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याच बाबतीत कमी पडलो, असे मला तरी वाटत नाही. ६  बोलण्यात जरी मी तरबेज नसलो, तरी ज्ञानाच्या बाबतीत मात्र नक्कीच तसा नाही; आणि ही गोष्ट आम्ही सर्व प्रकारे व सर्व बाबतींत तुम्हाला दाखवून दिली आहे. ७  तुम्हाला मोठेपणा मिळावा म्हणून मी जर कमीपणा घेतला आणि कोणताही मोबदला न घेता तुम्हाला देवाविषयीचा संदेश आनंदाने घोषित केला, तर काही पाप केले का? ८  तुमची सेवा करण्यासाठी मी इतर मंडळ्यांकडून गरजेच्या वस्तू* घेऊन त्यांचे नुकसान केले.* ९  पण, तुमच्यामध्ये असताना मला गरज पडली, तरी मी कोणावर भार टाकला नाही; कारण मासेदोनियाहून आलेल्या बांधवांनी उदारपणे माझ्या सर्व गरजा भागवल्या. खरेच, तुमच्यावर कोणत्याही प्रकारे भार न टाकण्याची मी काळजी घेतली आणि पुढेही घेईन. १०  ख्रिस्ताचे सत्य माझ्यामध्ये असल्याचे जितके खरे आहे, तितकीच ही गोष्टही खरी आहे, की अखयाच्या प्रदेशांत अशी बढाई मारण्याचे मी सोडणार नाही. ११  मी तुमच्यावर भार का टाकला नाही? तुमच्यावर माझे प्रेम नाही म्हणून? तुमच्यावर माझे किती प्रेम आहे, हे देवाला माहीत आहे. १२  स्वतःला प्रेषित म्हणवणारे काही जण बढाई मारून आमच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच, मी जे काही करत आहे, ते पुढेही करत राहीन, अशा हेतूने की, त्यांना आमच्याशी बरोबरी करण्याचे कोणतेही निमित्त* मिळू नये. १३  कारण अशी माणसे खोटे प्रेषित, फसवणारे कामगार आहेत आणि स्वतःचे खरे रूप लपवून ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचा आव आणतात. १४  आणि यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही, कारण सैतान स्वतःसुद्धा एका तेजस्वी देवदूताचे रूप घेतो. १५  त्यामुळे, त्याच्या सेवकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे रूप घेतले, तर त्यात विशेष असे काहीच नाही. पण, त्यांचा शेवट त्यांच्या कार्यांनुसार होईल. १६  मी पुन्हा एकदा तेच म्हणतो: मी मूर्ख आहे असे कोणी समजू नये. आणि समजतही असाल, तर जसे एका मूर्ख माणसाला स्वीकारता तसेच मलाही स्वीकारा, म्हणजे मलासुद्धा थोडी बढाई मारता येईल. १७  या क्षणी, मी बढाई मारून आत्मविश्‍वासाने जे काही बोलत आहे, ते प्रभूच्या उदाहरणाला अनुसरून नाही, तर एका मूर्ख माणसाप्रमाणे बोलतो. १८  पुष्कळ लोक या जगातल्या* गोष्टींविषयी बढाई मारत आहेत, त्यामुळे मीसुद्धा बढाई मारीन. १९  तुम्ही इतके “समजदार” आहात, की मूर्ख माणसांचे आनंदाने सहन करता. २०  खरेतर, जो कोणी तुम्हाला गुलाम बनवतो, तुमची मालमत्ता हडपतो, तुम्हाला लुबाडतो, तुमच्यावर वर्चस्व गाजवतो आणि तुमच्या तोंडात मारतो त्याचे तुम्ही सहन करता. २१  असे बोलणे आमच्यासाठी अपमानाचे आहे, कारण काहींच्या मते आम्ही इतके दुबळे आहोत, की आम्हाला आमचा अधिकार नीट चालवता येत नाही. पण, जर इतर जण बढाई मारू शकतात, तर मीही मारेन; मग, कोणाला मी मूर्ख वाटलो तरी चालेल. २२  ते इब्री आहेत का? मीही आहे. ते इस्राएली आहेत का? मीही आहे. ते अब्राहामचे वंशज* आहेत का? मीसुद्धा आहे. २३  ते ख्रिस्ताचे सेवक आहेत का? एका मूर्ख माणसाप्रमाणे मी उत्तर देतो, की मी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे: मी त्यांच्यापेक्षा अधिक मेहनत केली आहे, कितीतरी वेळा तुरुंगवास भोगला आहे, असंख्य वेळा मारहाण सहन केली आहे आणि कित्येकदा मरतामरता वाचलो आहे. २४  पाच वेळा यहुद्यांकडून मला एकोणचाळीस फटके बसले, २५  तीन वेळा मला छड्यांचा मार बसला, एकदा दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, एक संपूर्ण रात्र व दिवस मी उघड्या समुद्रावर घालवला; २६  मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, लुटारूंकडून संकटे, माझ्या देशबांधवांकडून तसेच विदेश्‍यांकडून आलेली संकटे, शहरातील व ओसाड प्रदेशातील संकटे, समुद्रावरील संकटे आणि खोट्या बांधवांनी आणलेली संकटे, हे सर्व मी सोसले. २७  मी कठोर मेहनत केली, कित्येक रात्री जागून काढल्या, तहान व भूक सहन केली, कित्येकदा उपाशी राहिलो, थंडीचा कडाका सोसला आणि अपुऱ्‍या कपड्यांवर भागवले.* २८  बाहेरच्या या सगळ्या गोष्टींसोबतच, सर्व मंडळ्यांची चिंतादेखील दररोज* माझ्या मनाला पोखरत असते. २९  एखादा कमजोर झाल्यास मलाही कमजोर झाल्यासारखे वाटत नाही का? एखादा अडखळला तर माझाही जीव जळत नाही का? ३०  बढाई मारायचीच असेल, तर मी अशा गोष्टींची बढाई मारेन ज्यांतून माझा दुबळेपणा दिसून येतो. ३१  आपल्या प्रभू येशूचा देव व पिता, ज्याची सदासर्वकाळ स्तुती केली जाईल, त्याला माहीत आहे की मी खोटे बोलत नाही. ३२  दिमिष्कमध्ये असताना अरीतास राजाच्या राज्यपालाने मला अटक करण्यासाठी दिमिष्कच्या शहरावर पहारा ठेवला होता; ३३  पण, मला एका टोपलीत* बसवून शहराच्या वेशीवरील खिडकीतून खाली उतरवण्यात आले आणि अशा रीतीने मी त्याच्या तावडीतून सुटलो.

तळटीपा

शब्दशः “आवेशी.”
किंवा “शुद्ध.”
किंवा “शुद्धता.”
किंवा “मदत.”
शब्दशः “त्यांना लुटले.”
किंवा “आधार.”
अर्थात, मानवी.
शब्दशः “बीज.”
शब्दशः “आणि उघडा होतो.”
किंवा “माझ्यावर असलेला रोजचा दबाव.”
किंवा “वेताच्या टोपलीत.”