२ करिंथकर १३:१-१४

  • पत्राच्या शेवटी दिलेल्या ताकिदी व प्रोत्साहन (१-१४)

    • “तुम्ही विश्‍वासात आहात की नाही याची पारख करत राहा” ()

    • सुधारणा करत राहा; एकमताने विचार करत जा (११)

१३  मी आता तिसऱ्‍यांदा तुमच्याकडे येत आहे. “दोन किंवा तीन जणांच्या साक्षीने* प्रत्येक गोष्ट सिद्ध झाली पाहिजे.” २  मी आता तुमच्यापासून दूर असलो, तरी मी जणू दुसऱ्‍यांदा तुमच्यामध्ये आहे असे समजा. ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्यांना आणि इतर जणांनाही मी अगोदरच ताकीद देतो, की मी पुन्हा कधी तुमच्याकडे आलो, तर त्यांना ताडन दिल्याशिवाय राहणार नाही; ३  हे यासाठी की ख्रिस्त, जो तुमच्या बाबतीत कमजोर नाही, तर तुमच्यामध्ये सामर्थ्यवान आहे तो खरोखरच माझ्याद्वारे बोलत आहे, याचा पुरावा तुम्ही मागत आहात. ४  कारण खरोखर, ख्रिस्त दुर्बल स्थितीत असताना त्याला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यात आला असला, तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे. त्याच्याप्रमाणेच आम्हीसुद्धा दुर्बल स्थितीत असलो, तरी तुमच्यावर कार्य करणाऱ्‍या देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्यासोबत जिवंत असू. ५  तुम्ही विश्‍वासात आहात की नाही याची पारख करत राहा; तुम्ही कशा प्रकारची व्यक्‍ती आहात हे सतत तपासून पाहा. ख्रिस्त तुमच्यासोबत ऐक्यात आहे याची तुम्हाला जाणीव नाही का? कारण तसे असल्यास, तुम्हाला नाकारण्यात आले आहे, असा त्याचा अर्थ होईल. ६  आम्हाला मात्र नाकारण्यात आलेले नाही, हे तुम्ही ओळखाल अशी मी मनापासून आशा करतो. ७  आता देवाला आमची हीच प्रार्थना आहे, की तुम्ही कोणतेही वाईट काम करू नये; अर्थात, आम्ही मान्यता मिळालेले आहोत असे दिसावे म्हणून नाही, तर लोकांनी जरी आम्हाला नाकारले, तरी तुम्ही चांगले काम करावे म्हणून. ८  कारण सत्याच्या विरोधात आम्ही काहीही करू शकत नाही; केवळ सत्याच्या बाजूनेच करू शकतो. ९  आम्ही दुर्बल असतो आणि तुम्ही ताकदवान असता तेव्हा आम्हाला आनंदच होतो. आणि तुम्ही सुधारणा करत राहावी हीच आम्ही प्रार्थना करतो. १०  म्हणूनच तुमच्यापासून दूर असतानाच मी या गोष्टी तुम्हाला लिहीत आहे; म्हणजे, तुमच्याकडे आल्यावर, प्रभूने मला दिलेल्या अधिकाराचा मला कठोरपणे वापर करावा लागू नये; कारण प्रभूने मला हा अधिकार तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही, तर तुमची उन्‍नती करण्यासाठी दिला आहे. ११  बांधवांनो, शेवटी इतकेच सांगतो, की नेहमी आनंदी राहा, स्वतःमध्ये सुधारणा करत राहा, सांत्वन स्वीकारत राहा, एकमताने विचार करत जा व शांतीने राहा; म्हणजे, प्रेमाचा व शांतीचा देव तुमच्यासोबत राहील. १२  एकमेकांना भेटताना बंधुप्रेमाचे चुंबन घ्या. १३  सर्व पवित्र जन तुम्हाला नमस्कार सांगतात. १४  प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा आणि देवाचे प्रेम आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो.

तळटीपा

शब्दशः “तोंडून.”
शब्दार्थसूची पाहा.