२ करिंथकर ८:१-२४
८ आता बांधवांनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या अपार कृपेबद्दल तुम्हाला माहीत असावे अशी आमची इच्छा आहे.
२ अत्यंत खडतर काळात ते अनेक दुःखे सोसत होते. पण, स्वतः कमालीच्या दारिद्रयात असूनही त्यांनी अगदी स्वखुशीने दान देऊन मोठी* उदारता दाखवली.
३ कारण त्यांनी केवळ आपल्या ऐपतीप्रमाणे नाही, तर आपल्या ऐपतीपेक्षाही जास्त दान दिले आणि या गोष्टीची मी स्वतः साक्ष देतो.
४ ते स्वतःहून पुढे आले आणि आपल्याला दान देण्याचा बहुमान मिळावा व पवित्र जनांची सेवा करण्यात आपल्यालाही हातभार लावता यावा, अशी ते आम्हाला वारंवार विनंती करत राहिले.
५ आम्ही अपेक्षाही केली नव्हती इतके त्यांनी केले; देवाच्या इच्छेनुसार त्यांनी स्वतःला आधी प्रभूच्या सेवेसाठी आणि मग आमच्या सेवेसाठी वाहून घेतले.
६ त्यामुळे आम्ही तीतला असे प्रोत्साहन दिले, की तुम्ही प्रेमाने दिलेले दान गोळा करण्याचे जे काम त्याने सुरू केले होते, ते त्याने पूर्णही करावे.
७ तुम्ही जसे सर्व बाबतींत, म्हणजेच विश्वासात, बोलण्याच्या क्षमतेत, ज्ञानात, उत्साहात आणि आम्ही तुम्हाला दाखवलेले प्रेम इतरांना दाखवण्यात समृद्ध आहात, तसेच तुम्ही दान देण्याच्या बाबतीतही उदार असावे.
८ अर्थात, असे करण्याचा मी तुम्हाला हुकूम देत नाही, तर इतर जण किती आनंदाने दान देत आहेत हे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि तुमचे प्रेम किती खरे आहे हे पारखण्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे.
९ कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अपार कृपेची तुम्हाला जाणीव आहे; तो श्रीमंत असूनही तुमच्यासाठी गरीब झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्यामुळे तुम्ही श्रीमंत व्हावे.
१० याविषयी मी तुम्हाला आपले मत सांगतो: हे काम करणे तुमच्या हिताचेच आहे, कारण तुम्ही ते सुरू करून आता एक वर्ष उलटले आहे आणि ते करण्याची तुम्ही इच्छाही दाखवली होती.
११ तर तुम्ही जे काम सुरू केले होते ते आता पूर्णही करा; म्हणजे, ज्या उत्सुकतेने तुम्ही ते करायला सुरुवात केली होती, त्याच उत्सुकतेने आपल्या ऐपतीनुसार तुम्ही ते पूर्ण करावे.
१२ कारण एखाद्याला दान देण्याची जर खरोखर उत्सुकता असेल, तर त्याचे दान मान्य केले जाईल. त्याच्याकडे जे नाही त्याची अपेक्षा केली जात नाही, तर त्याच्याकडे जे आहे त्यानुसार तो जे काही देईल ते मान्य केले जाईल.
१३ कारण इतरांचा भार हलका करून तुमच्यावर जास्त भार टाकण्याची माझी इच्छा नाही;
१४ तर माझी अशी इच्छा आहे, की या वेळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागवली जावी आणि त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागवली जाऊन समानता घडून यावी.
१५ जसे लिहिण्यातसुद्धा आले आहे: “ज्याच्याजवळ जास्त होतं, त्याला खूप जास्त झालं नाही आणि ज्याच्याजवळ कमी होतं, त्याला फार कमी पडलं नाही.”
१६ आता, आम्हाला तुमच्याबद्दल वाटते तशीच कळकळ तीतच्या मनात उत्पन्न केल्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो;
१७ कारण, तो केवळ आमच्या सांगण्यावरून तुमच्याकडे येण्यास तयार झाला नाही, तर तो मोठ्या उत्सुकतेने स्वतःहून तुमच्याकडे येत आहे.
१८ पण, त्याच्यासोबत आम्ही अशा एका बांधवाला पाठवत आहोत, ज्याने आनंदाच्या संदेशासंबंधी केलेल्या कार्याबद्दल सर्व मंडळ्यांमध्ये त्याची प्रशंसा होत आहे.
१९ इतकेच नाही, तर तुम्ही आनंदाने दिलेली ही देणगी घेऊन जाण्यासाठी मंडळयांनी त्याला आमच्यासोबत जाण्यासाठी नेमले आहे; ही देणगी वाटण्याचे काम आम्ही प्रभूच्या गौरवासाठी करतो आणि यावरून इतरांना मदत करण्याची आमची उत्सुकता दिसून येईल.
२० ही उदार देणगी पोचवण्याच्या कामात कोणीही आम्हाला दोष लावू नये म्हणून आम्ही काळजी घेतो.
२१ कारण, ‘आम्ही केवळ यहोवाच्याच* नाही, तर माणसांच्या नजरेतही सर्व गोष्टी अगदी प्रामाणिकपणे करू इच्छितो.’
२२ याशिवाय, त्यांच्यासोबत आम्ही आमच्या अशा एका बांधवालाही पाठवत आहोत ज्याची आम्ही बऱ्याचदा पारख केली आहे आणि तो पुष्कळ बाबतींत मेहनती असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. शिवाय, तुमच्यावर त्याचा खूप भरवसा असल्यामुळे तो आणखी जास्त मेहनत करेल.
२३ तीतविषयी कोणी विचारले, तर तो माझा साथीदार* आणि तुमच्या भल्यासाठी कार्य करणारा माझा सहकर्मी आहे; किंवा मग, आमच्या बांधवांविषयी कोणी विचारले, तर ते मंडळ्यांचे प्रेषित आणि ख्रिस्ताचा गौरव आहेत.
२४ तेव्हा, त्यांच्यावर मनापासून प्रेम करा आणि तुमच्याविषयी आम्हाला अभिमान का वाटतो, ते दाखवून द्या.