२ करिंथकर ९:१-१५
९ पवित्र जनांसाठी असलेल्या या सेवेच्या बाबतीत खरेतर मी तुम्हाला काहीही लिहिण्याची गरज नाही,
२ कारण मदत देण्यास तुम्ही किती उत्सुक आहात हे मला माहीत आहे; तुमच्याबद्दल मी मासेदोनियातील बांधवांना अभिमानाने सांगत असतो, की अखयातील बांधवांनी तर गेल्या एक वर्षापासूनच मदत तयार ठेवली आहे. तुमच्या आवेशामुळे त्यांच्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.
३ म्हणूनच मी बांधवांना पाठवत आहे; यासाठी की, तुमच्याबद्दल आम्ही अभिमानाने जे सांगितले होते, ते व्यर्थ ठरू नये. तर, मी जसे म्हटले होते त्याप्रमाणे तुम्ही खरोखरच तयार असावे.
४ नाहीतर, मासेदोनियाचे बांधव माझ्यासोबत आले आणि तुम्ही तयार नाही असे दिसून आले, तर तुमच्यावर भरवसा ठेवल्यामुळे आम्हाला—आणि आमच्यासोबत तुम्हालाही—लज्जित व्हावे लागेल.
५ त्यामुळे, या बांधवांना अगोदरच तुमच्याकडे येण्याचे उत्तेजन देणे मला आवश्यक वाटले; म्हणजे, तुम्ही वचन दिल्याप्रमाणे तुमची उदार देणगी त्यांनी तयार ठेवावी; असे केल्यास, तुमची ही देणगी, बळजबरीने घेतलेली नाही, तर उदार मनाने दिलेली देणगी ठरेल.
६ या बाबतीत, जो कोणी हात राखून पेरणी करतो, तो त्याच मानाने कापणी करेल आणि जो कोणी सढळ हाताने पेरणी करतो, तो त्याच मानाने कापणीही करेल.
७ प्रत्येकाने आपल्या मनात जसे ठरवले आहे, तसेच द्यावे; त्याने कुरकुर करत* किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो.
८ शिवाय, तुमच्याकडे नेहमी सर्व गोष्टी पुरेशा प्रमाणात असाव्यात आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीही भरपूर प्रमाणात असाव्यात, म्हणून देव तुमच्यावर आपल्या अपार कृपेचा वर्षाव करण्यास समर्थ आहे.
९ (जसे लिहिण्यातसुद्धा आले आहे: “त्याने मोठ्या प्रमाणात* वाटून दिले आहे; त्याने गरिबांना दिले आहे. त्याचे नीतिमत्त्व सदासर्वकाळ टिकते.”
१० जो पेरणी करणाऱ्याला भरपूर प्रमाणात बी देतो आणि खाणाऱ्याला भरपूर अन्न देतो, तो तुम्हालाही पेरणी करण्यासाठी बी देईल व ते बहुगुणितही करेल आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवेल.)
११ सर्व प्रकारच्या उदारतेसाठी तुम्हाला सर्व गोष्टींत समृद्ध केले जात आहे, आणि यामुळे आम्ही देवाला आभार व्यक्त करतो;
१२ कारण ही जनसेवा केवळ पवित्र जनांच्या गरजा चांगल्या प्रकारे भागवण्यासाठी नाही, तर देवाला अधिकाधिक आभार व्यक्त केले जावेत यासाठीही आहे.
१३ मदत पुरवण्याच्या या सेवेवरून तुम्ही कशा प्रकारचे लोक आहात हे दाखवून देता; तसेच, तुम्ही जाहीरपणे कबूल केल्याप्रमाणे ख्रिस्ताविषयी असलेल्या आनंदाच्या संदेशानुसार वागता आणि पवित्र जनांना व एकंदरीत सर्वांनाच उदारता दाखवता, त्यामुळे ते देवाचा गौरव करतात.
१४ तुमच्यावर देवाच्या अपार कृपेचा भरभरून वर्षाव होत असल्यामुळे, तुमच्यासाठी देवाकडे याचना करताना ते तुमच्याबद्दल प्रेम व्यक्त करतात.
१५ देवाने दिलेल्या अवर्णनीय मोफत देणगीबद्दल त्याचे आभार!