२ तीमथ्य १:१-१८

  • नमस्कार (१, २)

  • तीमथ्यच्या विश्‍वासाबद्दल पौल देवाचे आभार मानतो (३-५)

  • देवाकडून मिळालेले कृपादान ज्वलंत ठेव (६-११)

  • हितकारक वचनांना जडून राहा (१२-१४)

  • पौलचे शत्रू व मित्र (१५-१८)

 ख्रिस्त येशूद्वारे मिळणाऱ्‍या जीवनाच्या अभिवचनाची घोषणा करण्यासाठी, जो देवाच्या इच्छेनुसार ख्रिस्त येशूचा प्रेषित आहे त्या पौलकडून, २  माझा प्रिय मुलगा, तीमथ्य याला: देव जो पिता आणि आपला प्रभू ख्रिस्त येशू यांच्याकडून तुला अपार कृपा, दया व शांती मिळो. ३  माझ्या वाडवडिलांप्रमाणेच मी ज्या देवाची शुद्ध विवेकाने पवित्र सेवा करत आहे, त्याचे मी आभार मानतो आणि रात्रंदिवस त्याला याचना करताना न चुकता तुझी आठवण करतो. ४  तुझे अश्रू मला आठवतात तेव्हा तुला भेटण्याची मला फार ओढ लागते, यासाठी की तुला भेटून माझे मन आनंदाने भरून जावे. ५  मला तुझा निष्कपट* विश्‍वास आठवतो, जो आधी तुझी आजी लोईस आणि आई युनीके यांच्यामध्ये होता; आणि माझी खातरी आहे, की तोच विश्‍वास तुझ्यामध्येही आहे. ६  म्हणूनच मी तुला याची आठवण करून देतो, की मी तुझ्यावर हात ठेवले तेव्हा देवाचे जे कृपादान तुला मिळाले होते ते ज्वलंत ठेव. ७  कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नाही, तर सामर्थ्याचा, प्रेमाचा आणि समंजसपणाचा* आत्मा दिला आहे. ८  त्यामुळे, आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्याची किंवा मी जो त्याच्यासाठी कैदेत आहे, त्या माझीदेखील लाज बाळगू नकोस, तर देवाच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवून आनंदाच्या संदेशासाठी दुःख सोसण्यास तयार राहा. ९  देवाने आपल्याला वाचवले* व पवित्र जन होण्याकरता बोलावले. अर्थात, आपल्या कार्यांमुळे नाही, तर त्याने केलेल्या संकल्पामुळे आणि त्याच्या अपार कृपेमुळे त्याने आपल्याला बोलावले. ख्रिस्त येशूद्वारे फार पूर्वीच आपल्यावर ही अपार कृपा करण्यात आली होती. १०  पण, आता आपला तारणकर्ता, ख्रिस्त येशू प्रकट झाल्यामुळे ती आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवण्यात आली आहे. त्याने मृत्यूला निकामी केले आहे आणि आनंदाच्या संदेशाद्वारे जीवनावर व अविनाशीपणावर प्रकाश टाकला आहे. ११  या आनंदाच्या संदेशासाठीच मला घोषणा करणारा, प्रेषित आणि शिक्षक म्हणून नेमण्यात आले होते. १२  याच कारणामुळे मी या गोष्टी सोसत आहे, पण मला त्याची लाज वाटत नाही. कारण ज्याच्यावर मी विश्‍वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो, आणि मी त्याच्या स्वाधीन केलेला ठेवा तो त्या दिवसापर्यंत जपून ठेवेल, याची मला खातरी आहे. १३  ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे उत्पन्‍न होणारा विश्‍वास आणि प्रेम दाखवण्यासोबतच, माझ्याकडून ऐकलेल्या हितकारक* वचनांच्या आदर्शाला* जडून राहा. १४  आपल्यामध्ये राहणाऱ्‍या पवित्र आत्म्याद्वारे* हा अमूल्य ठेवा जतन कर. १५  आशिया प्रांतातील सर्व लोकांनी मला सोडून दिले आहे, हे तुला माहीतच आहे. फुगल आणि हर्मगनेस हेही त्यांच्यापैकी आहेत. १६  अनेसिफरच्या घराण्यावर प्रभूने दया दाखवावी, अशी मी प्रार्थना करतो कारण त्याने कित्येकदा मला प्रोत्साहन दिले आणि माझ्या बेड्यांची त्याला लाज वाटली नाही. १७  उलट, तो रोममध्ये असताना त्याने मला शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि शेवटी मला शोधून काढले. १८  प्रभू यहोवा* त्या दिवशी त्याला दया दाखवो. इफिसमध्ये त्याने माझ्यासाठी कायकाय केले, हे तुला चांगले माहीत आहे.

तळटीपा

किंवा “प्रामाणिक.”
शब्दशः “मनाच्या निरोगीपणाचा.”
किंवा “आपले तारण केले.”
किंवा “उपयोगी.”
किंवा “रूपरेषेला.”
किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीद्वारे.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.