२ तीमथ्य २:१-२६

  • शिकलेल्या गोष्टी पात्रता असलेल्या पुरुषांच्या स्वाधीन कर (१-७)

  • आनंदाच्या संदेशासाठी संकटे सोसणे (८-१३)

  • देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग कर (१४-१९)

  • तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ (२०-२२)

  • विरोधकांशी कशा प्रकारे व्यवहार करावा? (२३-२६)

 त्यामुळे माझ्या मुला, ख्रिस्त येशूद्वारे मिळणाऱ्‍या अपार कृपेतून सामर्थ्य मिळवत राहा; २  आणि ज्या गोष्टी तू माझ्याकडून ऐकल्या आणि ज्यांना पुष्कळ साक्षीदारांनीही दुजोरा दिला त्या गोष्टी विश्‍वासू पुरुषांच्या स्वाधीन कर; म्हणजे, इतरांना शिकवण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेशी पात्रता असेल. ३  ख्रिस्त येशूचा एकनिष्ठ सैनिक या नात्याने संकटे सोसण्यास तयार राहा. ४  कोणताही सैनिक जगाच्या व्यवहारांत* स्वतःला गुरफटून घेत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात भरती केले त्याला खूश करता यावे. ५  तसेच, खेळांत भाग घेणाराही जर खेळाच्या नियमांनुसार खेळला नाही, तर त्याला मुकुट दिला जात नाही. ६  पिकाचा पहिला वाटा कष्ट करणाऱ्‍या शेतकऱ्‍यालाच मिळाला पाहिजे. ७  मी जे काही सांगत आहे त्यावर सतत विचार कर; प्रभू तुला सर्व गोष्टींविषयीची समज देईल. ८  येशू ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आले आणि तो दावीदचा वंशज* होता ही गोष्ट आठवणीत ठेव; याविषयीच मी आनंदाचा संदेश घोषित करतो. ९  आणि त्यासाठीच मी एका अपराध्याप्रमाणे दुःख सोसत आहे व कैदेत आहे. पण, देवाचे वचन मात्र बंधनात नाही. १०  म्हणूनच, निवडलेल्या जनांसाठी मी सर्वकाही सोसत आहे, यासाठी की त्यांनाही सर्वकाळाच्या गौरवासोबत ख्रिस्त येशूद्वारे तारण मिळावे.* ११  ही गोष्ट भरवशालायक आहे: आपण जर त्याच्यासोबत मरण पावलो, तर त्याच्यासोबत जिवंतही होऊ; १२  आपण जर सहन करत राहिलो, तर त्याच्यासोबत राज्यही करू; आपण जर त्याला नाकारले, तर तोही आपल्याला नाकारेल; १३  आपण अविश्‍वासूपणे वागलो, तरी तो विश्‍वासू राहतो, कारण त्याच्या स्वभावाच्या विरोधात वागणे त्याला शक्य नाही. १४  देवासमोर त्यांना या गोष्टींची आठवण करून देत जा आणि शब्दांवरून भांडण न करण्याची सूचना देत राहा;* कारण त्याने काहीच फायदा होत नाही, उलट ऐकणाऱ्‍यांचे नुकसानच होते.* १५  देवाच्या पसंतीस उतरलेला, लाज वाटण्याचे कोणतेही कारण नसलेला आणि सत्याच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग करणारा कामकरी बनण्याचा आटोकाट प्रयत्न कर. १६  पण, पवित्र गोष्टींचा अनादर करणाऱ्‍या पोकळ संभाषणांपासून दूर राहा, कारण त्यांमुळे लोक आणखी मोठ्या प्रमाणात अधार्मिक बनतील, १७  आणि त्यांची शिकवण, शरीराला सडवत जाणाऱ्‍या जखमेप्रमाणे* पसरेल. हुमनाय व फिलेत हे अशांपैकीच आहेत. १८  ही माणसे सत्यापासून भरकटली आहेत, कारण पुनरुत्थान* आधीच झाले आहे असे ते म्हणतात, आणि ते काही जणांचा विश्‍वास नष्ट करत आहेत. १९  असे असले तरी, देवाचा भक्कम पाया मात्र स्थिर राहतो आणि त्यावर असा शिक्का आहे: “जे आपले आहेत त्यांना यहोवा* ओळखतो,” आणि “जो कोणी यहोवाचे* नाव घेऊन त्याला हाक मारतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.” २०  आता, एका मोठ्या घरामध्ये केवळ सोन्याचांदीचीच नाही, तर लाकडाची व मातीचीही भांडी असतात; तसेच, काही भांडी आदरणीय कामासाठी, तर काही हलक्या दर्जाच्या कामासाठी असतात. २१  जो स्वतःला या दुसऱ्‍या प्रकारच्या भांड्यांपासून दूर ठेवतो, तो आदरणीय कामासाठी असलेल्या भांड्यासारखा अर्थात पवित्र केलेल्या, आपल्या मालकासाठी उपयोगी असलेल्या व प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेल्या भांड्यासारखा बनेल. २२  म्हणून, तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि त्याऐवजी शुद्ध मनाने प्रभूला हाक मारणाऱ्‍यांसोबत न्याय, विश्‍वास, प्रेम व शांती हे गुण उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न कर. २३  तसेच, मूर्खपणाच्या आणि व्यर्थ वादविवादांपासून दूर राहा, कारण यांमुळे भांडणे होतात. २४  प्रभूच्या दासाला भांडण करण्याची गरज नाही, तर तो सर्वांशी सौम्यतेने* वागणारा, शिकवण्याची योग्यता असलेला, तसेच इतरांनी त्याचे वाईट केले, तरी स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असा असावा; २५  याशिवाय, ज्यांची योग्य मनोवृत्ती नाही अशांना त्याने सौम्यतेने शिकवावे. कदाचित देव त्यांना सत्याचे अचूक ज्ञान मिळवण्यासाठी पश्‍चात्ताप* करण्याची संधी देईल. २६  आणि कदाचित ते भानावर येतील आणि सैतानाने* आपल्याला त्याच्या इच्छेनुसार वागण्यासाठी जिवंत धरले आहे, याची जाणीव होऊन ते त्याच्या पाशातून सुटतील.

तळटीपा

किंवा कदाचित, “दररोजच्या कारभारांत.”
शब्दशः “दावीदचे बीज.”
किंवा “वाचवले जावे.”
शब्दशः “चांगली साक्ष दे.”
किंवा “ऐकणाऱ्‍यांचा नाशच होतो.”
किंवा “गँगरीन.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “विचारशीलपणे.”
किंवा “मनाचे परिवर्तन.”
शब्दशः “दियाबलाने.” म्हणजे, निंदा करणारा.