२ तीमथ्य ३:१-१७

  • शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ (१-७)

  • पौलच्या उदाहरणाचे जवळून अनुकरण (८-१३)

  • शिकलेल्या गोष्टींचे “पालन करत राहा” (१४-१७)

    • संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेले (१६)

 पण, शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ येईल हे लक्षात ठेव. २  कारण, लोक केवळ स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ, निंदा करणारे, आईवडिलांचे न ऐकणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, बेइमान, ३  माया-ममता नसलेले, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले, ४  विश्‍वासघात करणारे, अडेल वृत्तीचे, गर्वाने फुगलेले, देवापेक्षा चैनीची आवड असलेले, ५  देवाची भक्‍ती करण्याचा केवळ दिखावा करून आपल्या जीवनावर तिचा प्रभाव न होऊ देणारे* असे असतील; यांच्यापासून दूर राहा. ६  अशा लोकांमधूनच काही माणसे चलाखीने घरांमध्ये शिरून पापांत बुडालेल्या व निरनिराळ्या वासनांच्या आहारी गेलेल्या कमजोर मनाच्या स्त्रियांना आपले गुलाम बनवतील. ७  या स्त्रिया सतत शिकत असूनही त्यांना सत्याचे अचूक ज्ञान कधीच प्राप्त होत नाही. ८  आता, ज्याप्रमाणे यान्‍नेस व यांब्रेस यांनी मोशेचा विरोध केला होता, त्याचप्रमाणे ही माणसेदेखील सत्याचा विरोध करत राहतात. त्यांची मने पूर्णपणे भ्रष्ट झाली असून ते विश्‍वासाच्या बाबतीत नाकारलेले असे आहेत. ९  तरीसुद्धा ते याहून पुढे जाऊ शकत नाहीत, कारण जसा त्या दोघा पुरुषांचा मूर्खपणा सर्वांना दिसून आला, तसाच यांचाही मूर्खपणा सर्वांना अगदी स्पष्टपणे दिसून येईल. १०  पण, तू मात्र माझी शिकवण, माझे जीवन, माझे ध्येय, माझा विश्‍वास, माझी सहनशीलता, माझे प्रेम व माझा धीर यांचे जवळून अनुकरण केले आहे; ११  तसेच, अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र इथे माझा किती छळ झाला आणि मला किती दुःखे सोसावी लागली, हेही तुला माहीत आहे. ही सर्व संकटे मी धीराने सोसली आणि त्या सर्वांतून प्रभूने मला सोडवले. १२  खरेतर, ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने जीवन जगू इच्छिणाऱ्‍या सर्वांचा छळ केला जाईल. १३  पण, दुष्ट व फसवी माणसे अधिकाधिक वाईट होतील; ते स्वतः बहकतील आणि दुसऱ्‍यांनाही बहकवतील. १४  तू मात्र, ज्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुला खातरी पटवून देण्यात आली त्यांचे पालन करत राहा; कारण, या गोष्टी तू कोणापासून शिकलास हे तुला माहीत आहे; १५  आणि बालपणापासून तुला पवित्र लिखाणांचे ज्ञान आहे, याचीही तुला जाणीव आहे. या गोष्टी, ख्रिस्त येशूवरील विश्‍वासाद्वारे तुला तारणासाठी सुज्ञ बनवू शकतात. १६  संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेले असून ते शिकवण्यासाठी, ताडन देण्यासाठी, सुधारणूक करण्यासाठी,* न्यायनीतीनुसार शिस्त लावण्यासाठी उपयोगी आहे, १७  यासाठी की देवाचा मनुष्य सर्व बाबतींत कुशल आणि प्रत्येक चांगले काम करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असावा.

तळटीपा

शब्दशः “तिची ताकद नाकारणारे.”
किंवा “ताळ्यावर आणण्यासाठी.”