२ थेस्सलनीकाकर १:१-१२
१ पौल, सिल्वान* व तीमथ्य यांच्याकडून, देव जो पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यासोबत ऐक्यात असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला:
२ देव जो पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांची अपार कृपा व शांती तुम्हाला मिळो.
३ बांधवांनो, तुमच्यासाठी नेहमी देवाचे आभार मानणे हे आमचे कर्तव्य आहे. असे करणे योग्यच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचे एकमेकांवरील प्रेमही वाढत आहे.
४ त्यामुळे, देवाच्या मंडळ्यांमध्ये आम्ही स्वतः तुमच्याविषयी मोठ्या अभिमानाने बोलत असतो; कारण, बराच छळ व संकटे सोसत असतानाही तुमचा धीर व विश्वास टिकून आहे.
५ हा देवाच्या नीतिमान न्यायाचा पुरावा आहे आणि याद्वारे तुम्हाला देवाच्या राज्यासाठी योग्य मानले जाईल, ज्यासाठी सध्या तुम्ही दुःख सहन करत आहात.
६ कारण खरोखर, देव नीतिमान असल्यामुळे तुमच्यावर संकटे आणणाऱ्यांची परतफेड तो संकटाने करेल.
७ सध्या तुम्हाला संकटे सोसावी लागत असली, तरी जेव्हा प्रभू येशू स्वर्गातून आपल्या सामर्थ्यशाली देवदूतांसोबत अग्नीच्या ज्वालेत प्रकट होईल, तेव्हा आमच्यासोबत तुम्हालाही सुटका मिळेल.
८ त्या वेळी, देवाला न ओळखणाऱ्यांचा व आपल्या प्रभू येशूविषयीचा आनंदाचा संदेश न मानणाऱ्यांचा तो सूड घेईल.
९ या लोकांना सर्वकाळाच्या नाशाची शिक्षा ठोठावण्याद्वारे प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर केले जाईल.
१० हे तेव्हा घडेल जेव्हा तो आपल्या पवित्र जनांसोबत गौरवला जाण्याकरता येईल आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांमध्ये त्याची प्रशंसा होईल; आणि खरोखर, आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्हीही विश्वास ठेवला आहे.
११ त्यामुळे, आम्ही तुमच्यासाठी नेहमी अशी प्रार्थना करतो, की देवाने तुम्हाला त्याच्याकडून असलेल्या बोलावण्याला योग्य ठरवावे आणि त्याच्या सर्व सदिच्छा आणि विश्वासाचे प्रत्येक कार्य त्याने आपल्या सामर्थ्याने पूर्ण करावे.
१२ या उद्देशाने, की आपला देव आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्या अपार कृपेनुसार, आपल्या प्रभू येशूचे नाव तुमच्यामध्ये गौरवले जावे आणि तुम्हीदेखील त्याच्यासोबत ऐक्यात गौरवले जावे.
तळटीपा
^ ज्याला सीला असेही म्हणतात.