२ थेस्सलनीकाकर २:१-१७

  • अनीतिमान पुरुष (१-१२)

  • स्थिर राहण्यासाठी प्रोत्साहन (१३-१७)

 पण बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती व त्याच्याजवळ आपले एकत्र केले जाणे यांसंबंधी आम्हाला इतकेच सांगायचे आहे, की २  यहोवाचा* दिवस आला आहे असे सुचवणाऱ्‍या कोणत्याही प्रेरित संदेशामुळे,* तोंडी सांगितलेल्या संदेशामुळे किंवा आमच्याकडून आहे असे भासणाऱ्‍या पत्रामुळे लगेच गोंधळून जाऊ नका किंवा घाबरू नका. ३  कोणीही तुम्हाला बहकवू नये* म्हणून सांभाळा; कारण जोपर्यंत धर्मत्याग होत नाही आणि अनीतिमान पुरुष, अर्थात नाशाचा पुत्र प्रकट होत नाही तोपर्यंत तो दिवस येणार नाही. ४  हा नाशाचा पुत्र विरोधी असून देव समजल्या जाणाऱ्‍या प्रत्येकापेक्षा व पूज्य समजल्या जाणाऱ्‍या प्रत्येक वस्तूपेक्षा स्वतःला वरचढ करतो; आणि अशा रीतीने देवाच्या मंदिरात बसून आपण जणू एक देव असल्याचे सगळ्यांना दाखवतो. ५  मी तुमच्यामध्ये असताना तुम्हाला या गोष्टी सांगायचो, हे तुम्हाला आठवत नाही का? ६  आणि त्याने नियुक्‍त वेळी प्रकट व्हावे म्हणून त्याला कोणी रोखून धरले आहे, हे तुम्हाला माहीत आहे. ७  हे खरे आहे, की या अनीतीच्या रहस्याचे कार्य आधीच सुरू झाले आहे; पण, जोपर्यंत रोखून धरणारा मार्गातून निघणार नाही, तोपर्यंतच हे कार्य चालू राहील. ८  मग मात्र तो अनीतिमान मनुष्य प्रकट होईल, ज्याला प्रभू येशू आपल्या तोंडाच्या श्‍वासाने* नाहीसे करेल व आपली उपस्थिती प्रकट करून नष्ट करेल. ९  पण, अनीतिमान मनुष्याची उपस्थिती सैतानाच्या प्रभावामुळे असून तो प्रत्येक शक्‍तिशाली कार्य, खोटी चिन्हे, चमत्कार, १०  आणि सर्व प्रकारच्या अनीतीची व फसवणुकीची कामे करेल. आणि जे नाशाकडे वाटचाल करत आहेत त्यांची यांमुळे फसवणूक होईल. हीच त्यांची शिक्षा आहे, कारण तारण मिळावे म्हणून त्यांनी सत्यावर प्रेम केले नाही. ११  आणि त्यांनी असत्यावर विश्‍वास ठेवावा म्हणून देव एका फसव्या प्रभावामुळे त्यांची दिशाभूल होऊ देतो. १२  यासाठी की त्या सर्वांचा न्याय केला जावा, कारण त्यांनी सत्यावर विश्‍वास ठेवला नाही, तर अनीतीमध्ये आनंद मानला. १३  पण देवाला प्रिय असलेल्या माझ्या बांधवांनो, तुमच्यासाठी नेहमी देवाचे आभार मानणे हे आमचे कर्तव्य आहे, कारण देवाने आपल्या आत्म्याने तुम्हाला पवित्र करण्याद्वारे व सत्यावरील तुमच्या विश्‍वासाद्वारे सुरुवातीपासूनच तारणासाठी तुमची निवड केली. १४  आम्ही घोषित करत असलेल्या आनंदाच्या संदेशाद्वारे त्याने तुम्हाला बोलावले, यासाठी की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे तुम्हालाही गौरवले जावे. १५  तर मग बांधवांनो, स्थिर उभे राहा आणि ज्या गोष्टी* तुम्ही आमच्याकडून शिकून घेतल्या, मग त्या तोंडी दिलेल्या संदेशाद्वारे असोत किंवा पत्राद्वारे असोत, त्यांना जडून राहा. १६  शिवाय, स्वतः आपला प्रभू येशू ख्रिस्त आणि ज्याने आपल्यावर प्रेम केले व अपार कृपेद्वारे आपल्याला सर्वकाळाचे सांत्वन आणि एक चांगली आशा दिली, तो देव जो आपला पिता आहे, १७  त्याने तुमच्या मनाला सांत्वन द्यावे आणि तुम्हाला स्थिर* करावे, म्हणजे तुमचे वागणे व बोलणे नेहमी चांगले असेल.

तळटीपा

शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आत्म्यामुळे.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “मोहात पाडू नये.”
किंवा “आत्म्याने.”
शब्दशः “परंपरा.”
किंवा “बळकट.”