अनुवाद २०:१-२०
२० तुम्ही आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाल, तेव्हा जर त्यांचे घोडे, रथ आणि सैनिक तुमच्यापेक्षा जास्त असतील, तर घाबरू नका. कारण ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणलं, तो तुमचा देव यहोवा तुमच्यासोबत आहे.+
२ तुम्ही लढाईसाठी निघाल, त्याआधी याजकाने लोकांसमोर जाऊन त्यांच्याशी बोलावं.+
३ त्याने त्यांना असं म्हणावं, ‘इस्राएली लोकांनो, ऐका. तुम्ही आता आपल्या शत्रूंशी लढणार आहात. तेव्हा तुमचं मन खचू देऊ नका. आपल्या शत्रूंमुळे घाबरून जाऊ नका किंवा भिऊ नका आणि त्यांना पाहून भीतीने थरथरू नका.
४ कारण तुमचा देव यहोवा तुमच्यासोबत चालत आहे आणि तो तुमच्या वतीने तुमच्या शत्रूंविरुद्ध लढेल आणि तुम्हाला वाचवेल.’+
५ सैन्याच्या अधिकाऱ्यांनीही लोकांना म्हणावं, ‘ज्याने नवीन घर बांधलं आहे, पण अजून त्याचं उद्घाटन केलं नाही, असा कोणी आहे का? असेल, तर त्याने आपल्या घरी परत जावं. कारण लढाईत तो मेला, तर दुसरा कोणीतरी त्याच्या घराचं उद्घाटन करेल.
६ आणि ज्याने द्राक्षमळा लावला आहे, पण अजून त्याचं फळ खाल्लं नाही, असा कोणी आहे का? असेल, तर त्याने आपल्या घरी परत जावं. कारण, लढाईत तो मेला तर दुसराच कोणीतरी त्याचं फळ खाईल.
७ तसंच, ज्याचं लग्न ठरलं आहे पण अजून झालं नाही, असा कोणी आहे का? असेल, तर त्याने आपल्या घरी परत जावं.+ कारण, जर तो लढाईत मेला तर दुसरा कोणीतरी त्याच्या होणाऱ्या बायकोशी लग्न करेल.’
८ सैन्याच्या अधिकाऱ्यांनी लोकांना असंही विचारावं, ‘तुमच्यात कोणी भित्रा आणि कमजोर मनाचा आहे का?+ असेल, तर त्याने आपल्या घरी परत जावं, नाहीतर जसं त्याचं मन खचलं आहे, तसंच तो आपल्या भावांचंही मन खचवेल.’*+
९ लोकांशी बोलून झाल्यावर अधिकाऱ्यांनी लोकांचं नेतृत्व करण्यासाठी सेनापती नियुक्त करावेत.
१० युद्धासाठी एखाद्या शहराजवळ आल्यावर, आधी शांतीचा करार करण्यासाठी अटी घोषित करा.+
११ त्या शहराच्या लोकांनी तुमच्या अटी मान्य केल्या आणि तुमच्यासाठी आपली फाटकं उघडली, तर शहरातले सर्व लोक सक्तीची मजुरी करण्यासाठी तुमचे दास होऊन तुमची सेवा करतील.+
१२ पण जर ते शांतीचा करार करायला तयार झाले नाहीत आणि त्याऐवजी त्यांनी तुमच्याशी युद्ध पुकारलं, तर तुम्ही त्या शहराला वेढा घाला.
१३ तुमचा देव यहोवा ते शहर नक्कीच तुमच्या हाती देईल आणि तुम्ही त्यातल्या प्रत्येक पुरुषाला तलवारीने ठार मारा.
१४ पण, स्त्रिया, मुलं, गुरंढोरं आणि शहरात जे काही असेल, म्हणजे त्यातली सगळी लूट तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता.+ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला दिलेली शत्रूंची सगळी संपत्ती तुम्ही स्वतःसाठी घ्या.+
१५ जी शहरं तुमच्या आसपासच्या राष्ट्रांतल्या शहरांपैकी नसून, खूप दूर आहेत, त्या शहरांच्या बाबतीत तुम्ही असं करा.
१६ पण या राष्ट्रांतली जी शहरं तुमचा देव यहोवा तुम्हाला वारसा म्हणून देणार आहे, त्यांतल्या एकाही माणसाला* तुम्ही जिवंत सोडू नका.+
१७ त्याऐवजी, तुमचा देव यहोवा याने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही त्या राष्ट्रांचा, म्हणजेच, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी+ लोकांचा पूर्णपणे नाश करा;
१८ नाहीतर, त्यांनी त्यांच्या देवांसाठी केलेले सर्व घृणास्पद रितीरिवाज ते तुम्हाला पाळायला शिकवतील आणि तुमचा देव यहोवा याच्याविरुद्ध पाप करायला लावतील.+
१९ एखादं शहर काबीज करण्यासाठी तुम्ही त्याला वेढा घालून बरेच दिवस त्याच्याविरुद्ध लढत राहिलात, तर तुम्ही तिथली झाडं तोडू नका. तुम्ही त्या झाडांची फळं खाऊ शकता, पण ती झाडं कापू नका.+ रानातल्या झाडांवर हल्ला करायला ती काय माणसं आहेत का?
२० तुमच्या माहितीप्रमाणे जी फळझाडं नाहीत, फक्त तीच तुम्ही तोडू शकता. ती तोडून, तुमच्याविरुद्ध युद्ध करणाऱ्या शहरावर विजय मिळवेपर्यंत, त्याला वेढा घालण्यासाठी तुम्ही ती वापरू शकता.
तळटीपा
^ किंवा “त्याच्यामुळे त्याच्यासारखंच त्याच्या भावांच्याही हृदयाचं पाणी पाणी होईल.”
^ किंवा “श्वास घेणाऱ्या एकालाही.”