अनुवाद २६:१-१९

  • पहिल्या पिकाचं अर्पण करणं (१-११)

  • आणखी एक दशांश (१२-१५)

  • इस्राएल, यहोवाची खास प्रजा (१६-१९)

२६  तुमचा देव यहोवा तुम्हाला वारसा म्हणून देत असलेल्या देशात शेवटी जेव्हा तुम्ही पोहोचाल आणि त्याचा ताबा घेऊन तिथे राहू लागाल, २  तेव्हा तुमचा देव यहोवा तुम्हाला देत असलेल्या देशात, तुम्ही आपल्या जमिनीच्या सगळ्या उत्पन्‍नाच्या* पहिल्या पिकांपैकी काही घेऊन एका टोपलीत भरा, आणि तुमचा देव यहोवा याने आपल्या नावाच्या गौरवासाठी निवडलेल्या ठिकाणी ते घेऊन जा.+ ३  त्या दिवसांत सेवा करत असलेल्या याजकाकडे जाऊन तुम्ही त्याला असं म्हणा, ‘आज मी तुझा देव यहोवा याच्यापुढे येऊन जाहीर करतो, की यहोवाने जो देश आम्हाला देण्याचं वचन आमच्या वाडवडिलांना दिलं होतं, त्या देशात मी आलो आहे.’+ ४  तेव्हा याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल आणि तुमचा देव यहोवा याच्या वेदीसमोर ठेवेल. ५  मग तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यासमोर असं घोषित करा, ‘माझा पूर्वज एक भटकणारा* अरामी माणूस होता.+ तो आपल्या लहानशा कुटुंबासोबत खाली इजिप्तला जाऊन तिथे विदेशी म्हणून राहिला.+ पण तिथे त्यांची संख्या खूप वाढली आणि त्यांच्यापासून एक मोठं आणि शक्‍तिशाली राष्ट्र बनलं.+ ६  नंतर, इजिप्तच्या लोकांनी आमच्यावर जुलूम आणि अत्याचार केले आणि आम्हाला गुलाम बनवून आमच्याकडून कष्टाचं काम करून घेतलं.+ ७  म्हणून आम्ही आमच्या पूर्वजांचा देव यहोवा याच्याकडे याचना करू लागलो. तेव्हा यहोवाने आमची विनंती ऐकली आणि आमचं दुःख, कष्ट आणि आमचा होणारा छळ पाहिला.+ ८  शेवटी, यहोवाने आपल्या महान सामर्थ्याने, भीतिदायक कार्यं करून आणि चिन्ह व चमत्कार दाखवून+ आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणलं.+ ९  मग त्याने आम्हाला या ठिकाणी आणलं, आणि दूध आणि मध वाहत असलेला हा देश दिला.+ १०  आता यहोवाने मला दिलेल्या जमिनीच्या उत्पन्‍नातलं पहिलं फळ मी आणलं आहे.’+ मग तुम्ही ते यहोवासमोर ठेवून, तुमचा देव यहोवा याला वाकून नमन करा. ११  त्यानंतर तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आणि तुमच्या घराण्याला ज्या सर्व चांगल्या गोष्टी दिल्या, त्यांबद्दल आनंद साजरा करा. तुम्ही, तसंच तुमच्यात राहणारे लेवी आणि विदेशी असे सर्व जण आनंद साजरा करा.+ १२  तिसऱ्‍या वर्षी, म्हणजे दहावा भाग* देण्याच्या वर्षी तुम्ही आपल्या उत्पन्‍नातला संपूर्ण दहावा भाग वेगळा केल्यावर,+ तो लेवी, विदेशी, अनाथ मुलं* आणि विधवा यांना द्या, म्हणजे ते तुमच्या शहरांमध्ये* पोटभर अन्‍न खाऊन तृप्त होतील.+ १३  मग तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यासमोर असं म्हणा, ‘मी माझ्या घरातून पवित्र भाग काढला आहे आणि तू आज्ञा दिल्याप्रमाणे तो लेवी, विदेशी, अनाथ मुलं आणि विधवा+ यांना दिला आहे. मी तुझ्या आज्ञा मोडल्या नाहीत किंवा त्यांकडे दुर्लक्षही केलं नाही. १४  मी शोक करत असताना त्यातून काही खाल्लं नाही किंवा अशुद्ध असताना त्यातून काही काढलं नाही. तसंच, मी मेलेल्यांसाठी त्यातलं काही दिलं नाही. हे माझ्या देवा यहोवा, मी तुझ्या आज्ञा पाळल्या आहेत आणि तू जे काही सांगितलं ते सर्व मी केलं आहे. १५  म्हणून आता तुझ्या राहण्याच्या पवित्र ठिकाणातून, म्हणजे स्वर्गातून खाली बघ आणि आमच्या वाडवडिलांना तू वचन दिल्याप्रमाणे,+ तुझ्या इस्राएली लोकांना आणि तू आम्हाला दिलेल्या दूध आणि मध वाहत असलेल्या+ या देशाला आशीर्वाद दे.’+ १६  आज तुमचा देव यहोवा तुम्हाला हे नियम आणि न्याय-निर्णय पाळण्याची आज्ञा देत आहे. तुम्ही ते आपल्या पूर्ण मनाने+ आणि पूर्ण जिवाने* पाळा. १७  आज यहोवाने असं जाहीर केलं आहे, की जर तुम्ही त्याच्या मार्गांवर चालला, त्याचे नियम,+ आज्ञा+ आणि न्याय-निर्णय+ पाळले, आणि त्याचं ऐकलं तर तो तुमचा देव होईल. १८  आणि आज तुम्हीही यहोवासमोर असं जाहीर केलं आहे, की त्याने तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे तुम्ही त्याचे लोक, त्याची खास प्रजा*+ व्हाल आणि त्याच्या सर्व आज्ञा पाळाल. १९  त्याने बनवलेल्या इतर सर्व राष्ट्रांपेक्षा तो तुम्हाला श्रेष्ठ करेल+ आणि जर तुम्ही तुमचा देव यहोवा याचे पवित्र लोक असल्याचं दाखवून दिलं, तर त्याने वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हाला स्तुती, प्रसिद्धी आणि गौरव देईल.”+

तळटीपा

शब्दशः “फळ.”
किंवा कदाचित, “नाश होण्याच्या मार्गावर असलेला.”
शब्दशः “फाटकांच्या आत.”
किंवा “वडील नसलेली मुलं.”
किंवा “दशांश.”
किंवा “मौल्यवान संपत्ती.”