अनुवाद २९:१-२९
२९ होरेब इथे यहोवाने इस्राएली लोकांसोबत जो करार केला, त्यासोबतच त्याने मवाब देशातही त्यांच्याशी हा करार करण्याची आज्ञा मोशेला दिली.+ हे सर्व त्या कराराचे शब्द आहेत.
२ मग मोशेने सर्व इस्राएली लोकांना एकत्र बोलावून म्हटलं: “यहोवाने इजिप्त देशात तुमच्यासमोर फारोसोबत, त्याच्या सर्व सेवकांसोबत आणि त्याच्या संपूर्ण देशासोबत काय केलं, हे सगळं तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे.+
३ त्याने आणलेले मोठे न्यायदंड* आणि अद्भुत चिन्हं व चमत्कार+ तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेत.
४ पण आजपर्यंत यहोवाने तुम्हाला समजू शकणारं मन, पाहू शकणारे डोळे आणि ऐकू शकणारे कान दिलेले नाहीत.+
५ ‘मी ४० वर्षं जेव्हा तुम्हाला ओसाड रानातून नेत होतो,+ तेव्हा तुमच्या अंगावरचे कपडे जुने झाले नाहीत किंवा तुमच्या पायातले जोडेही फाटले नाहीत.+
६ तुम्ही भाकर खाल्ली नाही किंवा द्राक्षारस व इतर कोणतंही मद्य प्यायला नाहीत. पण मी तुमचा देव यहोवा आहे, ही गोष्ट तुम्हाला कळावी म्हणून मी तुमची काळजी घेत राहिलो.’
७ शेवटी तुम्ही या ठिकाणी पोहोचलात आणि हेशबोनचा राजा सीहोन+ आणि बाशानचा राजा ओग+ आपल्याशी युद्ध करायला आले, पण आपण त्यांना हरवलं.+
८ मग आपण त्यांच्या देशाचा ताबा घेतला आणि तो वारसा म्हणून रऊबेन, गाद आणि मनश्शेचा अर्धा वंश यांना दिला.+
९ म्हणून या कराराचे शब्द काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल.+
१० आज तुम्ही सर्व जण यहोवासमोर उभे आहात; म्हणजे तुमच्या वंशांचे प्रमुख, तुमचे वडीलजन, तुमचे अधिकारी, इस्राएलचा प्रत्येक पुरुष,
११ तुमची मुलं, तुमच्या बायका+ आणि लाकडं गोळा करणाऱ्यापासून ते पाणी काढणाऱ्यापर्यंत तुमच्या छावणीत तुमच्यासोबत राहणारा प्रत्येक विदेशी.+
१२ तुमचा देव यहोवा आज शपथ घेऊन तुमच्याशी जो करार करत आहे, त्याचे भागीदार होण्यासाठी तुम्ही इथे हजर आहात. तुमचा देव यहोवा आज तुमच्याशी हा करार करून,+
१३ तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे आणि तुमच्या वाडवडिलांना म्हणजे अब्राहाम,+ इसहाक+ आणि याकोब+ यांना शपथ घेऊन सांगितल्याप्रमाणे, आज तो तुम्हाला आपले लोक ठरवणार आहे+ आणि तुमचा देव होणार आहे.+
१४ आज मी शपथ घेऊन फक्त तुमच्याशी हा करार करत नाही,
१५ तर आपला देव यहोवा याच्यासमोर जे आपल्यासोबत उभे आहेत आणि जे आज आपल्यासोबत इथे नाहीत, त्यांच्याशीही मी हा करार करत आहे.
१६ (कारण आपण इजिप्त देशात कसे राहत होतो आणि तिथून निघाल्यावर आपण वेगवेगळ्या राष्ट्रांतून कसा प्रवास केला, हे तुम्हाला चांगलं माहीत आहे.+
१७ आणि त्या राष्ट्रांतल्या किळसवाण्या गोष्टी आणि लाकडाच्या, दगडाच्या, आणि सोन्याचांदीच्या त्यांच्या घृणास्पद मूर्तीही*+ तुम्ही पाहिल्या आहेत.)
१८ सावध राहा! तुमच्यामध्ये असा कोणीही पुरुष, स्त्री, कुटुंब किंवा वंश असू नये, ज्याचं मन आपला देव यहोवा याच्यापासून वळून त्या राष्ट्रांतल्या देवांची उपासना करू लागेल.+ कारण असा माणूस, कडू आणि विषारी फळ उत्पन्न करणाऱ्या झाडाच्या मुळासारखा आहे.+
१९ पण जर कोणी या शपथेचे शब्द ऐकून, ‘मी हट्टीपणे माझ्या मनाला वाटेल तसं वागलो, तरी माझं काही बिघडणार नाही,’ असं आपल्या मनात गर्विष्ठपणे म्हणाला, तर त्याच्या मार्गातल्या प्रत्येक गोष्टीचा विनाश होईल.
२० आणि यहोवा त्याला क्षमा करायला तयार होणार नाही.+ याउलट यहोवाचा क्रोध त्या माणसावर भडकेल आणि या पुस्तकात लिहिलेले सगळे शाप नक्की त्याच्यावर येतील,+ आणि यहोवा त्याचं नाव आकाशाखालून पुसून टाकेल.
२१ नियमशास्त्राच्या या पुस्तकात लिहिलेल्या करारातल्या सगळ्या शापांप्रमाणे, त्या माणसावर संकट आणण्यासाठी, यहोवा त्याला इस्राएलच्या सर्व वंशांमधून वेगळं करेल.
२२ तुमची पुढची पिढी आणि दूर देशातून आलेला विदेशी या देशावर आलेल्या पीडा, म्हणजेच यहोवाने या देशावर आणलेली संकटं पाहील.
२३ यहोवाने आपल्या रागात आणि क्रोधात नाश केलेल्या सदोम आणि गमोरा,+ तसंच, अदमा आणि सबोईम+ या शहरांसारखी परिस्थिती त्यांना दिसेल. सगळा देश गंधक, मीठ आणि अग्नी यांमुळे जळून गेलेला असेल. कुठे पेरणी नाही, कुठे काही उगवलेलं नाही किंवा हिरवळसुद्धा नाही, असं त्यांना दिसेल.
२४ तेव्हा ते आणि सर्व राष्ट्रांचे लोक म्हणतील, ‘या देशासोबत यहोवाने असं का केलं?+ त्याचा राग इतका का भडकला?’
२५ मग ते म्हणतील, ‘कारण त्यांच्या वाडवडिलांचा देव यहोवा याने इजिप्त देशातून त्यांना बाहेर आणताना त्यांच्यासोबत केलेला करार त्यांनी मोडला.+
२६ आणि त्यांना ओळख नसलेल्या देवांची आणि ज्यांची उपासना करण्याची त्याने त्यांना मनाई केली होती, अशा देवांकडे जाऊन त्यांनी त्यांना नमन केलं आणि त्यांची उपासना केली.+
२७ तेव्हा यहोवाचा क्रोध या देशावर भडकला आणि त्यामुळे या पुस्तकात लिहिलेले सगळे शाप त्याने त्यांच्यावर आणले.+
२८ म्हणून यहोवाने रागाने आणि क्रोधाने संतापून त्यांना त्यांच्या देशातून उपटून+ दुसऱ्या देशात हद्दपार केलं. आणि आज ते तिथेच आहेत.’+
२९ यहोवाला सर्व गुप्त गोष्टी माहीत आहेत,+ आणि आपण या नियमशास्त्रातल्या सर्व आज्ञा पाळाव्यात, म्हणून तो या गोष्टी पिढ्या न् पिढ्या आपल्याला आणि आपल्या वंशजांना प्रकट करतो.+
तळटीपा
^ किंवा “न्यायचौकश्या.”
^ इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.