अनुवाद ९:१-२९
९ इस्राएली लोकांनो, ऐका. आज तुम्ही यार्देन नदी ओलांडून+ तुमच्यापेक्षा मोठी आणि शक्तिशाली राष्ट्रं काबीज करण्यासाठी जात आहात;+ त्यांतली शहरं मोठमोठी आणि त्यांच्याभोवती असलेल्या भिंती आकाशापर्यंत पोहोचल्या आहेत,*+
२ तिथे राहणारे अनाकी लोक उंच धिप्पाड आहेत.+ त्यांच्याबद्दल तुम्हाला माहीतच आहे आणि तुम्ही हे ऐकलं आहे, की ‘अनाकच्या मुलांसमोर कोण उभं राहू शकतं?’
३ म्हणून आता हे लक्षात ठेवा, की तुमचा देव यहोवा तुमच्या पुढे जाईल.+ तो भस्म करणारा अग्नी आहे+ आणि तो त्यांचा सर्वनाश करेल. तो तुमच्या डोळ्यांदेखत त्यांचा पराभव करेल. यामुळे, यहोवाने तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे तुम्ही त्यांना हाकलून लावाल आणि काही काळातच त्यांचा नाश कराल.+
४ जेव्हा तुमचा देव यहोवा त्यांना तुमच्यासमोरून हाकलून लावेल, तेव्हा आपल्या मनात असा विचार करू नका, की ‘आम्ही नीतिमान असल्यामुळे यहोवाने आम्हाला या देशाचा ताबा घेण्यासाठी इथे आणलं.’+ तुम्ही नीतिमान असल्यामुळे नाही, तर ही राष्ट्रं दुष्ट असल्यामुळे+ यहोवा त्यांना तुमच्यासमोरून हाकलून लावणार आहे.
५ तुम्ही नीतिमान असल्यामुळे किंवा प्रामाणिक मनाचे असल्यामुळे त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेणार आहात, असं समजू नका. तर, या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव यहोवा त्यांना तुमच्यासमोरून हाकलून लावणार आहे.+ तसंच, तुमच्या वाडवडिलांना, म्हणजेच अब्राहाम,+ इसहाक+ आणि याकोब+ यांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी यहोवा असं करणार आहे.
६ म्हणून हे लक्षात ठेवा, की तुम्ही नीतिमान असल्यामुळे तुमचा देव यहोवा तुम्हाला या चांगल्या देशाचा ताबा देत आहे असं नाही. खरंतर, तुम्ही खूप हट्टी* लोक आहात.+
७ तुम्ही ओसाड रानात आपला देव यहोवा याला कशी चीड आणली, हे कधीही विसरू नका.+ ज्या दिवशी तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला, त्या दिवसापासून या ठिकाणी येईपर्यंत तुम्ही यहोवाविरुद्ध बंड करत आला आहात.+
८ होरेबमध्येही तुम्ही यहोवाला चीड आणली आणि त्या वेळी यहोवाचा क्रोध इतका भडकला, की तो तर तुमचा सर्वनाश करायला निघाला होता.+
९ यहोवाने तुमच्यासोबत केलेल्या कराराच्या दगडी पाट्या घ्यायला जेव्हा मी पर्वतावर गेलो,+ तेव्हा मी तिथे ४० दिवस आणि ४० रात्री,+ अन्नपाण्याशिवाय राहिलो.
१० त्या वेळी यहोवाने त्याच्या स्वतःच्या बोटाने लिहिलेल्या दोन दगडी पाट्या मला दिल्या. इस्राएली लोकांच्या मंडळीला ज्या दिवशी एकत्र जमवण्यात आलं, त्या दिवशी यहोवा तुमच्याशी पर्वतावर आगीतून जे शब्द बोलला होता, ते सर्व शब्द त्या पाट्यांवर होते.+
११ मग ४० दिवस आणि ४० रात्री झाल्यावर यहोवाने मला कराराच्या त्या दोन दगडी पाट्या दिल्या.
१२ यहोवा मला म्हणाला, ‘ऊठ, इथून लवकर खाली जा, कारण ज्यांना तू इजिप्त देशातून बाहेर आणलंस, ते तुझे लोक दुष्टपणे वागले आहेत.+ मी त्यांना ज्या मार्गाने चालण्याची आज्ञा दिली होती, त्यापासून ते लगेच भरकटले आहेत. त्यांनी स्वतःसाठी धातूची प्रतिमा* बनवली आहे.’+
१३ मग यहोवा मला म्हणाला, ‘मी पाहिलंय, की हे लोक हट्टी* आहेत.+
१४ म्हणून आता मला अडवू नकोस; मी त्यांचा सर्वनाश करतो आणि आकाशाखालून त्यांचं नाव कायमचं पुसून टाकतो आणि तुझ्यापासूनच, त्यांच्यापेक्षा मोठं आणि शक्तिशाली राष्ट्र बनवतो.’+
१५ तेव्हा मी तिथून निघालो आणि पर्वतावरून खाली आलो. त्या वेळी पर्वत जळत होता+ आणि माझ्या दोन्ही हातात कराराच्या दोन दगडी पाट्या होत्या.+
१६ मग मी पाहिलं, की तुम्ही आपला देव यहोवा याच्याविरुद्ध पाप केलं आहे! तुम्ही स्वतःसाठी धातूपासून एक वासरू बनवलं होतं. यहोवाने ज्या मार्गाने चालण्याची तुम्हाला आज्ञा दिली होती, त्यापासून तुम्ही लगेच भरकटला होता.+
१७ हे पाहून मी त्या दोन्ही पाट्या खाली फेकून दिल्या आणि तुमच्या डोळ्यांदेखत त्या फोडून टाकल्या.+
१८ मग मी पुन्हा आधीसारखाच यहोवासमोर पालथा पडलो आणि ४० दिवस आणि ४० रात्री असं करत राहिलो. मी काहीच खाल्लं नाही किंवा पाणीही प्यायलो नाही,+ कारण तुम्ही पाप केलं होतं, आणि यहोवाच्या नजरेत जे वाईट होतं ते करून त्याला चीड आणली होती.
१९ यहोवा तुमच्यावर किती संतापला आहे हे पाहून मी खूप घाबरलो,+ कारण तो तुमचा सर्वनाश करायला निघाला होता. पण त्या वेळीही यहोवाने माझं ऐकलं.+
२० यहोवा अहरोनवर इतका रागावला होता, की तो त्याला मारून टाकणार होता.+ पण त्या वेळीही मी अहरोनसाठी याचना केली.
२१ मग जे वासरू बनवून तुम्ही पाप केलं होतं,+ ते घेऊन मी आगीत जाळून टाकलं; मी त्याचा चुरा केला आणि तो कुटून त्याची धुळीसारखी बारीक पूड केली. मग मी ती पूड पर्वतावरून वाहत असलेल्या ओढ्यात फेकून दिली.+
२२ नंतर, तुम्ही तबेरा,+ मस्सा+ आणि किब्रोथ-हत्तव्वा+ इथेही यहोवाला चीड आणली.
२३ मग, कादेश-बर्ण्या+ इथून यहोवाने तुम्हाला पाठवलं आणि तो म्हणाला, ‘जा आणि जो देश मी तुम्हाला देणार आहे त्याचा ताबा घ्या.’ पण तुम्ही पुन्हा एकदा तुमचा देव यहोवा याच्या आज्ञेविरुद्ध बंड केलं.+ तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही+ आणि त्याची आज्ञा पाळली नाही.
२४ जेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो, तेव्हापासून तुम्ही यहोवाविरुद्ध बंड करत आला आहात.
२५ म्हणून मी यहोवासमोर पालथा पडलो आणि ४० दिवस आणि ४० रात्री असं करत राहिलो.+ यहोवा तुमचा सर्वनाश करेल असं म्हणाला होता, म्हणून मी त्याच्यासमोर असा पालथा पडलो.
२६ मी यहोवाला याचना करू लागलो आणि म्हणालो, ‘हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तुझ्या लोकांचा नाश करू नकोस. ते तुझे स्वतःचे लोक* आहेत.+ तू त्यांना मोठ्या पराक्रमाने आणि आपल्या शक्तिशाली हाताने इजिप्तमधून बाहेर आणलंस.+
२७ अब्राहाम, इसहाक आणि याकोब+ या तुझ्या सेवकांना आठव. या लोकांच्या अडेल वृत्तीकडे, त्यांच्या पापाकडे आणि दुष्टपणाकडे लक्ष देऊ नकोस.+
२८ नाहीतर, ज्या देशातून तू आम्हाला बाहेर आणलंस, तिथले लोक कदाचित म्हणतील: “यहोवा आपल्या लोकांना वचन दिलेल्या देशात नेऊ शकला नाही, आणि तो त्यांचा द्वेष करतो, म्हणून त्याने त्यांना मारून टाकण्यासाठी ओसाड रानात आणलं.”+
२९ कारण ते तुझे स्वतःचे लोक* आहेत,+ आणि त्यांना तू तुझ्या महान सामर्थ्याने इजिप्तमधून बाहेर आणलं होतंस.’+
तळटीपा
^ म्हणजे, त्यांच्या भिंती खूप उंच आहेत.
^ शब्दशः “कठोर मानेचे.”
^ किंवा “ओतीव मूर्ती.”
^ शब्दशः “कठोर मानेचे.”
^ किंवा “वारशाचे लोक; स्वतःची संपत्ती.”
^ किंवा “वारशाचे लोक; स्वतःची संपत्ती.”