आमोस ७:१-१७
७ सर्वोच्च प्रभू यहोवाने मला एक दृष्टान्त दाखवला. पाहा, हिवाळ्यातलं पीक* उगवू लागलं, तेव्हा त्याने टोळधाड आणली. राजासाठी गवत कापून झाल्यावर हे पीक पेरण्यात आलं होतं.
२ टोळांनी देशातली सगळी हिरवळ खाऊन टाकल्यावर, मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, कृपा करून क्षमा कर!+ नाहीतर, याकोब कसा वाचेल?* कारण तो दुबळा आहे!”+
३ म्हणून यहोवाने यावर पुन्हा विचार केला.*+ मग यहोवा म्हणाला, “असं होणार नाही.”
४ तेव्हा, सर्वोच्च प्रभू यहोवाने मला हा दृष्टान्त दाखवला: पाहा, सर्वोच्च प्रभू यहोवा याने आगीने शिक्षा देण्याची आज्ञा दिली. त्या आगीत खोल समुद्रातलं पाणी सुकून गेलं आणि जमिनीचा काही भागही नष्ट झाला.
५ तेव्हा मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, कृपा करून हे थांबव.+ नाहीतर याकोब कसा वाचेल?* कारण तो दुबळा आहे!”+
६ म्हणून यहोवाने यावर पुन्हा विचार केला.*+ मग सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणाला: “हेही होणार नाही.”
७ मग त्याने मला हा दृष्टान्त दाखवला: पाहा! ओळंबा* लावून बांधलेल्या एका भिंतीवर यहोवा उभा होता आणि त्याच्या हातात एक ओळंबा होता.
८ मग यहोवा मला म्हणाला: “आमोस, तुला काय दिसतंय?” मी म्हणालो: “ओळंबा.” तेव्हा यहोवा म्हणाला: “माझ्या लोकांमध्ये, इस्राएली लोकांमध्ये मी एक ओळंबा लावत आहे. मी यापुढे त्यांना क्षमा करणार नाही.+
९ इसहाकची उच्च स्थानं+ उजाड पडतील आणि इस्राएलच्या पवित्र ठिकाणांची नासधूस केली जाईल+ आणि मी यराबामच्या घराण्याचा तलवारीने नाश करीन.”+
१० बेथेलचा याजक अमस्या+ याने इस्राएलचा राजा यराबाम+ याला असा निरोप पाठवला: “आमोस इस्राएलमध्येच राहून तुझ्याविरुद्ध कटकारस्थानं रचत आहे.+ देशातल्या लोकांना त्याचे संदेश ऐकवत नाहीत.+
११ कारण आमोस म्हणतो, ‘यराबाम तलवारीने मरेल आणि इस्राएली लोक नक्कीच आपल्या देशातून बंदिवासात जातील.’”+
१२ मग अमस्या आमोसला म्हणाला: “अरे दृष्टान्त पाहणाऱ्या, जा, यहूदा देशात निघून जा, तिथे संदेश सांग+ आणि आपलं पोट भर.*
१३ पण आता तू बेथेलमध्ये भविष्यवाणी करू नकोस,+ कारण हे एका राजाचं मंदिर आहे.+ ही राजधानी आहे.”
१४ तेव्हा आमोसने अमस्याला असं उत्तर दिलं: “मी मुळात संदेष्टा नव्हतो किंवा संदेष्ट्याचा मुलगाही नव्हतो. मी तर मेंढपाळ होतो+ आणि उंबराच्या झाडांची काळजी घ्यायचो.*
१५ पण मी कळप राखत असताना यहोवाने मला बोलावलं आणि यहोवा मला म्हणाला, ‘जा, माझ्या लोकांना, इस्राएली लोकांना संदेश सांग.’+
१६ म्हणून आता यहोवाचा हा संदेश ऐक: ‘तू म्हणतोस, “इस्राएलविरुद्ध भविष्यवाणी करू नकोस+ आणि इसहाकच्या घराण्याविरुद्ध संदेश सांगू नकोस.”+
१७ म्हणून यहोवा असं म्हणतो: “तुझी बायको शहरात वेश्या बनेल आणि तुझी मुलं व मुली तलवारीने मरतील. तुझा देश मोजायच्या दोरीने मोजून, वाटून टाकला जाईल आणि तू स्वतः एका परक्या देशात मरशील; आणि इस्राएली लोक नक्कीच आपल्या देशातून बंदिवासात जातील.”’”+
तळटीपा
^ म्हणजे, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतलं.
^ शब्दशः “उठेल?”
^ किंवा “यहोवाला पस्तावा झाला.”
^ शब्दशः “उठेल?”
^ किंवा “यहोवाला पस्तावा झाला.”
^ भिंत सरळ रेषेत बांधली जात आहे की नाही हे पाहण्याचं साधन. यात एका दोरीला खाली वजन बांधलेलं असतं.
^ शब्दशः “भाकर खा.”
^ किंवा “उंबरांना टोचा मारणारा होतो.”