इब्री लोकांना पत्र १२:१-२९

  • आपला विश्‍वास परिपूर्ण करणारा येशू (१-३)

    • साक्षीदारांचा मोठा ढग ()

  • यहोवाकडून मिळणारी शिक्षा तुच्छ लेखू नका (४-११)

  • आपल्या पायांसाठी सरळ मार्ग तयार करा (१२-१७)

  • स्वर्गीय यरुशलेमच्या जवळ येणं (१८-२९)

१२  तर मग, आपण साक्षीदारांच्या इतक्या मोठ्या ढगाने वेढलेले असल्यामुळे, आपण प्रत्येक ओझं आणि सहज अडकवणारं पाप काढून टाकू या+ आणि आपल्यासमोर असलेल्या शर्यतीत धीराने धावू या.+ २  आणि आपल्या विश्‍वासाचा मुख्य प्रतिनिधी असलेल्या आणि आपला विश्‍वास परिपूर्ण करणाऱ्‍या येशूवर आपण आपली नजर केंद्रित करू या.+ कारण, जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी त्याने लज्जेची पर्वा न करता वधस्तंभ* सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.+ ३  खरंच, ज्याने पापी लोकांचं इतकं अपमानास्पद बोलणं सहन केलं त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या,+ म्हणजे तुम्ही थकून जाऊन हार मानणार नाही;+ त्याच्या विरोधात बोलून त्या लोकांनी स्वतःवरच दोष ओढवून घेतला. ४  पापाशी संघर्ष करताना तुमचं रक्‍त सांडेपर्यंत तुम्हाला कधीही प्रतिकार करावा लागला नाही. ५  आणि देवाने तुम्हाला आपली मुलं या नात्याने दिलेला हा सल्ला तुम्ही पूर्णपणे विसरून गेला आहात: “माझ्या मुला, यहोवाने* दिलेली शिक्षा तुच्छ लेखू नकोस, किंवा त्याने तुझी चूक सुधारली तर खचून जाऊ नकोस. ६  कारण, यहोवा* ज्याच्यावर प्रेम करतो त्याला तो सुधारतो; खरंतर, ज्या कोणाला तो आपला मुलगा म्हणून स्वीकारतो त्याला तो फटके मारतो.”*+ ७  आपल्याला सुधारण्याचा* हा एक मार्ग आहे असं समजून तुम्ही हे सहन करा. देव तुम्हाला आपली मुलं समजून तुमच्याशी व्यवहार करतो.+ कारण असा कोणता मुलगा आहे, ज्याला त्याचे वडील शिक्षा करत नाहीत?+ ८  पण, जर तुम्हा सर्वांना अशी शिक्षा मिळाली नसेल, तर मुळात तुम्ही खरी मुलं नाहीत, तर अनौरस* मुलं आहात. ९  शिवाय, शारीरिक दृष्टीने जे आपले वडील आहेत तेसुद्धा आपल्याला शिक्षा करायचे आणि आपण त्यांचा आदर करायचो. तर मग, आपण जिवंत राहावं, म्हणून पवित्र शक्‍तीद्वारे* आपल्या जीवनाला मार्गदर्शन देणाऱ्‍या पित्याच्या आपण आणखी किती अधीन राहिलं पाहिजे!+ १०  कारण, त्यांनी फक्‍त काही काळासाठी, त्यांना योग्य वाटलं त्याप्रमाणे आपल्याला शिक्षा केली. पण, तो तर आपल्या भल्यासाठी आपल्याला शिक्षा करतो. हे यासाठी, की आपण त्याच्यासारखं पवित्र बनावं.+ ११  हे खरं आहे, की कोणत्याही शिक्षेमुळे सुरुवातीला आनंद होत नाही, उलट वाईटच वाटतं.* पण, ज्यांना या शिक्षेमुळे वळण लागतं त्यांच्यासाठी ती पुढे नीतिमत्त्वाचं शांतिदायक फळ उत्पन्‍न करते. १२  त्यामुळे, गळून गेलेले हात आणि कमजोर झालेले गुडघे बळकट करा.+ १३  आणि आपल्या पायांसाठी सरळ मार्ग तयार करत राहा.+ हे यासाठी, की लंगड्या पायाचा सांधा निखळू नये, तर तो बरा व्हावा. १४  सर्वांबरोबर शांतीने राहायचा+ आणि पावित्र्य* टिकवून ठेवायचा+ प्रयत्न करत राहा. कारण पवित्र असल्याशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही. १५  देवाची अपार कृपा मिळवण्यासाठी कोणीही चुकणार नाही याकडे विशेष लक्ष द्या; म्हणजे, नुकसान करणारं कोणतंही विषारी मूळ उत्पन्‍न होऊन बरेच जण दूषित होणार नाहीत.+ १६  तुमच्यामध्ये अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारा किंवा एसावसारखा पवित्र गोष्टींची कदर नसलेला कोणीही असणार नाही, याची काळजी घ्या. त्याने फक्‍त एक वेळच्या जेवणाच्या बदल्यात प्रथमपुत्र असल्याचा आपला हक्क विकून टाकला.+ १७  कारण तुम्हाला माहीत आहे, की नंतर जेव्हा त्याने वारसदाराच्या हक्काने आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला नाकारण्यात आलं. त्याने त्याचं* मन बदलण्यासाठी अश्रू गाळले आणि खूप गयावया केली+ तरीसुद्धा काहीच उपयोग झाला नाही. १८  कारण तुम्ही, स्पर्श करता येण्यासारख्या+ आणि आगीने पेटलेल्या पर्वताजवळ;+ किंवा दाट ढग, घोर अंधार आणि वादळ यांजवळ आलेला नाहीत;+ १९  किंवा मग, तुम्ही कर्ण्याचा नाद+ आणि कोणाच्या बोलण्याचा आवाज ऐकत नाहीत;+ तो ऐकताच, आता आणखी ऐकायला नको अशी लोकांनी विनंती केली होती.+ २०  कारण, “एखाद्या जनावराने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा,”+ या आज्ञेमुळे ते खूप घाबरले. २१  शिवाय, ते दृश्‍य इतकं भयानक होतं, की “मी भीतीने थरथर कापत आहे,” असं मोशेने म्हटलं.+ २२  पण तुम्ही तर, सीयोन पर्वत,+ जिवंत देवाचं शहर, म्हणजे स्वर्गीय यरुशलेम,+ लाखो स्वर्गदूतांची महासभा+ यांजवळ आला आहात; २३  आणि प्रथमपुत्रांची मंडळी, ज्यांची नावं स्वर्गात लिहिण्यात आली आहेत आणि सर्वांचा न्यायाधीश असलेला देव+ आणि ज्यांना परिपूर्ण करण्यात आलं आहे,+ ते पवित्र शक्‍तीने उत्पन्‍न झालेले+ नीतिमान जन यांच्याजवळ तुम्ही आला आहात. २४  तसंच, एका नव्या कराराचा+ मध्यस्थ, येशू+ आणि त्याने आपल्यावर शिंपडलेलं रक्‍त, जे हाबेलच्या रक्‍तापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे बोलतं,+ यांजवळ तुम्ही आला आहात. २५  जो तुमच्याशी बोलत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न करण्याची खबरदारी घ्या.* कारण, ज्याने पृथ्वीवर देवाचा इशारा दिला त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणारे जर शिक्षेपासून वाचू शकले नाहीत, तर जो स्वर्गातून बोलतो त्याच्याकडे पाठ फिरवली तर आपण शिक्षेपासून कसं वाचू?+ २६  त्या वेळी, त्याच्या आवाजाने पृथ्वी हादरली होती,+ पण आता त्याने असं वचन दिलं आहे: “मी पुन्हा एकदा पृथ्वीलाच नाही, तर आकाशालाही हालवीन.”+ २७  “पुन्हा एकदा” असं जे म्हटलं आहे त्यावरून दिसून येतं, की हालवता येणाऱ्‍या गोष्टी, म्हणजे घडवण्यात आलेल्या गोष्टी नाहीशा केल्या जातील. हे यासाठी, की ज्या हालवल्या जाऊ शकत नाहीत अशा गोष्टी टिकून राहाव्यात. २८  आपल्याला एक असं राज्य मिळणार आहे जे कधीच हालवलं जाऊ शकत नाही. म्हणूनच, आपण नेहमी देवाच्या अपार कृपेचा लाभ घेऊ या. यामुळे आपल्याला देवाची भीती आणि आदर बाळगून, तो स्वीकारेल अशा पद्धतीने त्याची पवित्र सेवा करता येईल. २९  कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे.+

तळटीपा

अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “शिक्षा देतो.”
किंवा “वळण लावण्याचा.”
किंवा “विवाहबाह्‍य संबंधातून झालेली.”
किंवा “दुःखच होतं.”
किंवा “शुद्धता.”
म्हणजे, आपल्या वडिलांचं मन.
किंवा “त्याचं ऐकायला नकार देऊ नका; त्याला निमित्तं सांगू नका.”