इब्री लोकांना पत्र ४:१-१६
४ देवाच्या विसाव्यात जाण्याचं अभिवचन अजूनही आहे. त्यामुळे, आपल्यापैकी कोणीही त्यासाठी लायक नसल्यासारखं दिसू नये, म्हणून आपण सांभाळू या.*+
२ कारण आनंदाचा संदेश जसा आपल्या वाडवडिलांना घोषित करण्यात आला होता, तसाच आपल्यालाही घोषित करण्यात आला आहे.+ पण वचन ऐकूनही त्यांना त्यापासून काही फायदा झाला नाही. कारण ज्यांनी ते ऐकलं, त्यांच्यासारखा विश्वास त्यांनी बाळगला नाही.
३ आपण विश्वास ठेवल्यामुळे त्याच्या विसाव्यात जातो. पण त्यांच्याबद्दल त्याने असं म्हटलं: “म्हणून मी माझ्या रागात अशी शपथ घेतली, ‘ते माझ्या विसाव्यात येऊ शकणार नाहीत.’ ”+ जगाच्या स्थापनेपासून त्याची कार्यं पूर्ण झाली असूनही त्याने असं म्हटलं.+
४ कारण सातव्या दिवसाबद्दल त्याने एका ठिकाणी असं म्हटलं आहे: “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कार्यांतून विसावा घेतला.”+
५ आणि पुन्हा इथे तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्यात येऊ शकणार नाहीत.”+
६ तेव्हा, काहींचं त्याच्या विसाव्यात जाणं अजून बाकी आहे आणि ज्यांना आनंदाचा संदेश आधी घोषित करण्यात आला, ते आज्ञा मोडल्यामुळे त्यात जाऊ शकले नाहीत.+
७ त्यामुळे, बऱ्याच काळानंतर दावीदच्या स्तोत्रात “आज” असं म्हणून तो पुन्हा एक दिवस निश्चित करतो; जसं की वर म्हणण्यात आलं आहे: “आज तुम्ही त्याचे हे शब्द ऐकले तर बरं होईल. आपलं हृदय कठोर करू नका.”+
८ कारण जर यहोशवाने+ त्यांना विसाव्याच्या ठिकाणी नेलं असतं, तर देवाने नंतर आणखी एका दिवसाबद्दल सांगितलं नसतं.
९ याचा अर्थ, देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा अजून बाकी आहे.+
१० कारण, देवाने ज्याप्रमाणे आपल्या कार्यांतून विसावा घेतला, त्याचप्रमाणे जो माणूस देवाच्या विसाव्यात गेला आहे, त्यानेसुद्धा स्वतःच्या कार्यांतून विसावा घेतला आहे.+
११ त्यांच्याप्रमाणेच आज्ञा मोडण्याची सवय लागून कोणीही पापात पडू नये, म्हणून आपण देवाच्या विसाव्यात जाण्याचा होईल तितका प्रयत्न करू या.+
१२ कारण देवाचं वचन जिवंत आणि प्रभावशाली आहे.+ ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा जास्त धारदार आहे.+ ते माणसाचं बाहेरचं रूप* आणि त्याचं आतलं व्यक्तिमत्त्व* यांमधला फरक उघड करतं. तसंच ते सांधे आणि मज्जा यांना आरपार छेदून जातं, आणि हृदयातले विचार आणि हेतू यांची पारख करू शकतं.
१३ सृष्टीत अशी एकही गोष्ट नाही जी देवाच्या नजरेपासून लपलेली आहे.+ उलट, आपण ज्याला हिशोब देणार आहोत, त्याच्या डोळ्यांपुढे सर्व गोष्टी उघड्या आणि स्पष्ट आहेत.+
१४ म्हणून, स्वर्गात गेलेला देवाचा मुलगा, येशू+ हा आपला श्रेष्ठ महायाजक असल्यामुळे, आपण त्याच्यावर असलेला विश्वास जसा जाहीरपणे प्रकट केला होता, तसाच पुढेही करत राहू या.+
१५ कारण, आपला महायाजक असा नाही, जो आपल्या दुर्बलतांबद्दल सहानुभूती दाखवू शकणार नाही.+ तर त्यालाही आपल्याप्रमाणेच सर्व बाबतींत पारखण्यात आलं, पण तरी तो निष्पाप राहिला.+
१६ म्हणूनच, आपण अपार कृपेच्या राजासनापुढे धैर्याने जाऊ या.+ म्हणजे आपल्याला मदतीची गरज असेल, तेव्हा दया आणि अपार कृपा मिळेल.
तळटीपा
^ शब्दशः “भीती बाळगावी.”
^ ग्रीक सायखी. शब्दार्थसूचीत “जीव” पाहा.
^ ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.