इब्री लोकांना पत्र ७:१-२८

  • मलकीसदेक, एक अतिशय खास राजा आणि याजक (१-१०)

  • ख्रिस्ताचं याजकपद श्रेष्ठ (११-२८)

    • ख्रिस्ताला पूर्णपणे तारण करणं शक्य (२५)

 राजांना लढाईत हरवून अब्राहाम परत येत असताना, शालेमचा राजा आणि सर्वोच्च देवाचा याजक असलेला मलकीसदेक त्याला भेटला, आणि त्याने अब्राहामला आशीर्वाद दिला.+ २  अब्राहामने त्याला सर्व गोष्टींतला दहावा भाग दिला.* पहिली गोष्ट म्हणजे, मलकीसदेक या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा,” असा आहे, तसंच, तो शालेमचा राजा म्हणजेच, “शांतीचा राजा” आहे. ३  त्याच्या आईवडिलांबद्दल कोणतीच माहिती नाही किंवा त्याची वंशावळही नाही; तसंच, त्याचा जन्म आणि मृत्यू कधी झाला याबद्दलही माहिती सापडत नाही. तर त्याला देवाच्या मुलासारखं करण्यात आल्यामुळे तो सर्वकाळासाठी याजक राहतो.+ ४  कुटुंबप्रमुख* असलेल्या अब्राहामने ज्याला लुटीतल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींचा दहावा भाग दिला,+ तो माणूस किती महान होता याचा विचार करा. ५  नियमशास्त्राप्रमाणे, लेवीच्या मुलांपैकी+ ज्यांना याजकपद मिळतं त्यांना लोकांकडून, म्हणजेच अब्राहामचेच वंशज असलेल्या त्यांच्या भावांकडून, दशांश गोळा करण्याची आज्ञा दिली जाते.+ ६  पण हा माणूस जो त्यांच्या वंशावळीतला नव्हता, त्याने अब्राहामकडून दशांश घेतला आणि ज्याला अभिवचनं देण्यात आली होती, त्याला त्याने आशीर्वाद दिला.+ ७  जो लहान असतो त्याला आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्‍तीकडून आशीर्वाद मिळतो, यात शंकाच नाही. ८  एकीकडे, ज्यांना दशांश मिळतो, ती मरण पावणारी माणसं आहेत; पण दुसरीकडे ज्या माणसाला दशांश मिळाला, त्याच्याबद्दल अशी साक्ष देण्यात आली आहे, की तो जिवंत राहतो.+ ९  आणि दशांश घेणाऱ्‍या लेवीने स्वतःसुद्धा अब्राहामच्या द्वारे दशांश दिले असं म्हणता येईल, १०  कारण ज्या वेळी मलकीसदेक अब्राहामला भेटला, त्या वेळी लेवी त्याच्या या पूर्वजाचा, म्हणजेच अब्राहामचा भावी वंशज होता.+ ११  तर मग, लेव्यांच्या याजकपणामुळे (कारण लोकांना देण्यात आलेल्या नियमशास्त्राचाच हा एक भाग होता) जर परिपूर्णता मिळणं शक्य असतं,+ तर अहरोनसारखा नसून मलकीसदेकसारखा असलेला दुसरा एक याजक येण्याची काय गरज होती?+ १२  कारण याजकपण बदललं जात असल्यामुळे, नियमांत बदल करणंही गरजेचं आहे.+ १३  कारण ज्या माणसाबद्दल या गोष्टी सांगितल्या आहेत, तो दुसऱ्‍या एका वंशातून आला आणि त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ सेवा केली नाही.+ १४  कारण आपला प्रभू यहूदाच्या वंशातून आला हे तर स्पष्टच आहे.+ पण, त्या वंशातून याजक येण्याबद्दल मोशेने काहीही सांगितलं नाही. १५  आणि जेव्हा मलकीसदेकसारखा+ दुसरा एक याजक+ येतो, तेव्हा ही गोष्ट आणखीनच स्पष्ट होते. १६  तो नियमाप्रमाणे शारीरिक वंशावळीच्या आधारावर याजक झाला नाही, तर अविनाशी जीवनाच्या सामर्थ्याने झाला आहे.+ १७  कारण त्याच्याबद्दल अशी साक्ष देण्यात आली आहे: “तू मलकीसदेकसारखा याजक आहेस आणि तू सर्वकाळासाठी याजक राहशील.”+ १८  तर मग, पूर्वीची आज्ञा कमजोर आणि निरुपयोगी ठरल्यामुळे ती रद्द करण्यात आली.+ १९  कारण नियमशास्त्राने कोणत्याही गोष्टीला परिपूर्ण केलं नाही,+ पण जेव्हा जास्त चांगली अशी आशा+ देण्यात आली, तेव्हा परिपूर्णता शक्य झाली, आणि त्याच आशेद्वारे आपण देवाच्या जवळ येत आहोत.+ २०  ही आशा शपथ घेतल्याशिवाय देण्यात आली नाही. २१  (कारण, काही माणसं शपथेशिवाय याजक बनली आहेत हे खरं असलं, तरी या याजकाला मात्र देवाने शपथ घेऊन याजक नेमलं आणि त्याच्याबद्दल असं म्हटलं: “यहोवाने* शपथ घेतली आहे आणि तो आपलं मन बदलणार नाही,* ‘तू सर्वकाळासाठी याजक राहशील.’ ”)+ २२  त्यामुळे, येशू हा एका आणखी चांगल्या कराराची हमी देणारा* झाला आहे.+ २३  शिवाय, पूर्वी एकापाठोपाठ एक बऱ्‍याच जणांना याजक बनावं लागायचं.+ कारण मृत्यूमुळे त्यांना याजक म्हणून कायम सेवा करत राहणं शक्य नव्हतं. २४  पण हा याजक सदासर्वकाळ जिवंत असल्यामुळे,+ त्याच्या याजकपदाला वारसदारांची गरज नाही. २५  आणि म्हणूनच, त्याच्याद्वारे देवाजवळ येणाऱ्‍यांचं पूर्णपणे तारण करणंही* त्याला शक्य आहे. कारण त्यांच्याकरता याचना करण्यासाठी तो सर्वदा जिवंत आहे.+ २६  आपल्यासाठी असा एक महायाजक असणं योग्यच आहे, जो एकनिष्ठ, निर्दोष, निष्कलंक,+ पापी लोकांपेक्षा वेगळा आणि स्वर्गाहून उंच केलेला असा आहे.+ २७  दुसऱ्‍या महायाजकांप्रमाणे त्याला आधी स्वतःच्या पापांसाठी आणि मग लोकांच्या पापांसाठी,+ रोजच्या रोज बलिदानं अर्पण करायची गरज नाही.+ कारण त्याने स्वतःला अर्पण केलं, तेव्हा त्याने एकदाच सर्वकाळासाठी असं केलं.+ २८  कारण नियमशास्त्र तर अशा माणसांना महायाजक म्हणून नेमतं, ज्यांच्यामध्ये दुर्बलता आहेत.+ पण, नियमशास्त्रानंतर शपथ घेऊन दिलेल्या वचनाद्वारे+ एका मुलाला नेमण्यात आलं आणि त्याला सर्वकाळासाठी परिपूर्ण करण्यात आलं आहे.+

तळटीपा

शब्दशः “वाटून दिला.”
किंवा “कुलप्रमुख.”
अति. क५ पाहा.
किंवा “त्याला खेद होणार नाही.”
किंवा “जामीन म्हणून दिलेला.”
किंवा “वाचवणंही.”