ईयोब १४:१-२२
१४ स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या माणसाचं आयुष्य,फक्त काही काळाचं+ आणि दुःखाने भरलेलं असतं.+
२ तो कळीसारखा उमलून कोमेजून जातो,*+सावलीसारखा तो पाहता पाहता नाहीसा होतो.+
३ हो, तू त्याच्यावर आपली नजर रोखली आहेस,तू त्याला* न्यायालयात नेतोस.+
४ जो अशुद्ध आहे, त्याच्यापासून शुद्ध माणूस उत्पन्न होऊ शकतो का?+
हे शक्यच नाही!
५ त्याचे दिवस ठरलेले आहेत.
त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या हातात आहे.
तू आखलेल्या सीमेपलीकडे तो जाऊ शकत नाही.+
६ त्याच्यापासून आपली नजर हटव, म्हणजे तो विश्रांती घेईल.
मजुराप्रमाणे आपलं दिवसभराचं काम पूर्ण करून तो सुखी राहील.+
७ कारण झाडासाठीही आशा असते.
ते कापून टाकलं तरी त्याला पुन्हा पालवी फुटते,आणि त्याच्या फांद्या वाढत जातात.
८ त्याचं मूळ जमिनीत जुनाट झालंआणि त्याचं खोड मातीत सुकून गेलं,
९ तरी पाण्याचा गंध येताच त्याला अंकुर फुटेल;आणि नवीन रोपासारख्या त्याला फांद्या येतील.
१० पण माणूस मेल्यावर तो असाहाय्यपणे पडून राहतो;मनुष्याचा मृत्यू झाल्यावर, त्याचं काय उरतं?*+
११ समुद्रातलं पाणी नाहीसं होतं,आणि नदीचं पाणी आटून ती कोरडी पडते.
१२ तसंच, मृत्यूनंतर माणूस पुन्हा उठत नाही.+
आकाश नाहीसं होईपर्यंत, तो उठणार नाही,त्याच्या झोपेतून तो जागा होणार नाही.+
१३ कृपा करून, मला कबरेत* लपव,+तुझा राग शांत होईपर्यंत मला नजरेआड ठेव;माझ्यासाठी एक निश्चित वेळ ठरवून माझी आठवण कर!+
१४ माणसाचा मृत्यू झाल्यावर तो पुन्हा जगू शकेल का?+
माझ्या गुलामीचे* दिवस संपेपर्यंत;माझ्या सुटकेची वेळ येईपर्यंत, मी वाट पाहत राहीन.+
१५ तू हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन.+
मला पुन्हा पाहण्यासाठी तू आतुर होशील,*कारण तू मला आपल्या हातांनी निर्माण केलंस.
१६ पण आता तू माझ्या प्रत्येक पावलावर नजर ठेवतोस;तू फक्त माझ्या पापावर लक्ष ठेवतोस.
१७ तू माझा अपराध थैलीत बांधून ठेवतोस,तू माझ्या चुका सांभाळून ठेवतोस.
१८ जसा पर्वत कोसळून त्याची माती होते,आणि जसा खडक आपल्या जागेवरून निखळून पडतो,
१९ जसे पाण्याच्या प्रवाहाने खडक झिजतात,आणि जसे पाण्याचे लोंढे मातीला वाहून नेतात,तशी तू नाशवंत मानवाची आशा नष्ट केली आहेस.
२० त्याचा नाश होईपर्यंत तू त्याला चिरडत राहतोस,+त्याचं स्वरूप बदलून तू त्याला पाठवून देतोस.
२१ त्याच्या मुलांचा सन्मान होतो, पण त्याला याची जाणीव नसते;त्यांची दुर्दशा होते, पण त्याला ते समजत नाही.+
२२ शरीरात प्राण असेपर्यंतच त्याला दुःख जाणवतं;तो जिवंत असेपर्यंतच शोक करतो.”
तळटीपा
^ किंवा कदाचित, “त्याला कापून टाकलं जातं.”
^ शब्दशः “मला.”
^ शब्दशः “तो कुठे असतो?”
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “सक्तीच्या मजुरीचे.”
^ किंवा “तू तळमळशील.”