ईयोब १५:१-३५

  • अलीफजचं दुसरं भाषण (१-३५)

    • ईयोबला देवाचं भय नसल्याचा दावा करतो ()

    • ईयोबला गर्विष्ठ म्हणतो (७-९)

    • “देवाला तर आपल्या स्वर्गदूतांवरही भरवसा नाही” (१५)

    • ज्याच्यावर संकट येतं तो दुष्ट असतो (२०-२४)

१५  मग अलीफज+ तेमानी याने उत्तर दिलं:  २  “बुद्धिमान माणूस पोकळ वाद करेल का? किंवा आपलं मन चुकीच्या विचारांनी* भरेल का?  ३  फक्‍त शब्दांचा मार काही कामाचा नाही,आणि नुसतंच बोलून काही उपयोग नाही.  ४  कारण तुझ्यामुळे देवाचं भय नाहीसं झालं आहे,आणि तू इतरांना देवाबद्दल मनन करू देत नाहीस.  ५  तुझा अपराध तुला असं बोलायला लावतो,*तू धूर्त माणसांसारखा बोलतोस.  ६  तुला मी नाही, तर तुझंच तोंड दोषी ठरवतं;तुझे स्वतःचे ओठ तुझ्याविरुद्ध साक्ष देतात+  ७  तू काय जन्माला आलेला पहिला माणूस आहेस? तुझा जन्म पर्वतांच्याही आधी झाला का?  ८  तू देवाच्या गुप्त गोष्टी ऐकतोस की काय? आणि बुद्धी काय फक्‍त तुझ्याजवळच आहे?  ९  तुला असं काय माहीत आहे, जे आम्हाला माहीत नाही?+ आणि तुला असं काय समजतं, जे आम्हाला समजत नाही? १०  आमच्यामध्ये पिकलेल्या केसांचे आणि वयस्क लोक आहेत;+ते तुझ्या वडिलांपेक्षाही वयाने मोठे आहेत. ११  देवाने दिलेलं सांत्वन;आणि प्रेमाने बोललेले शब्द तुझ्यासाठी पुरेसे नाहीत का? १२  तू आपल्याच कल्पनांनी असा का वाहवत जातोस? आणि तुझे डोळे रागाने लाल का होतात? १३  तू देवाचा विरोध करतोसम्हणून तू आपल्या तोंडून असे शब्द काढतोस. १४  शेवटी नाशवंत मानव शुद्ध कसा असू शकतो? किंवा स्त्रीपासून जन्मलेला, नीतिमान कसा असू शकतो?+ १५  बघ, देवाला तर आपल्या स्वर्गदूतांवरही* भरवसा नाही,त्याच्या नजरेत आकाशही शुद्ध नाही.+ १६  मग एका घृणास्पद आणि वाईट माणसाबद्दल काय बोलायचं!+ तो तर दुष्टपणा पाण्यासारखा पितो. १७  मी बोलत आहे, ते तू ऐक! मी जे पाहिलं आहे, ते तुला सांगतो, १८  बुद्धिमान माणसांनी ते आपल्या वाडवडिलांकडून ऐकलंय,+त्यांनी त्या गोष्टी लपवून ठेवल्या नाहीत. १९  त्यांचा देश फक्‍त त्यांनाच देण्यात आला होता,आणि त्यांच्यामध्ये कोणीही परका माणूस गेला नव्हता. २०  दुष्ट, निर्दयी माणसाला आयुष्यभर यातना होत राहतात,त्याच्या आयुष्याची सगळी वर्षं संकटांनी भरलेली असतात. २१  भयानक आवाज त्याच्या कानात घुमत राहतात;+आणि शांतीच्या काळात त्याच्यावर दरोडेखोर हल्ला करतात. २२  अंधारापासून सुटण्याची त्याला आशा वाटत नाही;+त्याला तलवारीसाठी राखून ठेवलेलं असतं. २३  ‘अन्‍न* कुठे मिळेल?’ असं विचारत तो वणवण फिरतो,अंधाराचा दिवस जवळ आहे, हे त्याला चांगलं माहीत असतं. २४  दुःख आणि चिंता त्याला सतावत राहतात;हल्ला करायला सज्ज झालेल्या राजासारख्या, त्या त्याच्यावर मात करतात. २५  कारण तो खुद्द देवाच्या विरोधात हात उगारतो;तो सर्वशक्‍तिमान देवाशी लढण्याचं धाडस करतो. २६  आपली जाडजूड, मजबूत ढाल घेऊन,तो हट्टीपणे देवावर धावून जातो. २७  त्याचं तोंड चरबीमुळे फुगलं आहे,त्याच्या कमरेवर चरबी चढली आहे; २८  नाश होण्याच्या मार्गावर असलेल्या शहरांमध्ये,ओसाड पडतील अशा घरांमध्ये तो राहतो,तिथे फक्‍त दगडांचे ढिगारे उरतील. २९  तो श्रीमंत होणार नाही, त्याची मालमत्ता वाढणार नाही;त्याची संपत्ती देशात पसरणार नाही. ३०  अंधारापासून त्याची सुटका नाही;एका ज्वालेने त्याची फांदी* होरपळून जाईल,देवाच्या* तोंडून निघालेल्या फुंकराने त्याचा अंत होईल.+ ३१  निरुपयोगी गोष्टींवर भरवसा ठेवून त्याने स्वतःला फसवू नये,कारण बदल्यात त्याला निरुपयोगी गोष्टीच मिळतील. ३२  त्याचा दिवस येण्याआधी हे घडेल,त्याच्या फांद्या कधीच फोफावणार नाहीत.+ ३३  द्राक्षवेलासारखी त्याची कच्ची द्राक्षं गळून पडतील,जैतुनाच्या झाडासारखा त्याचा मोहर झडून जाईल. ३४  कारण दुष्टांचा* समुदाय निष्फळ असतो,+लाचखोरांचे तंबू आगीत जळून जातील. ३५  त्यांना विपत्तीचा गर्भ राहतो आणि ते वाईट गोष्टींना जन्म देतात,त्यांच्या पोटी फसवणूक जन्माला येते.”

तळटीपा

शब्दशः “आपलं पोट पूर्वेकडच्या वाऱ्‍याने.”
किंवा “तुझा अपराध तुझ्या तोंडाला शिकवतो.”
शब्दशः “पवित्र जनांवरही.”
शब्दशः “भाकर.”
म्हणजे, संकटातून वाचण्याची आशा.
शब्दशः “त्याच्या.”
किंवा “देवाला सोडून देणाऱ्‍यांचा.”