ईयोब १६:१-२२

  • ईयोबचं उत्तर (१-२२)

    • “तुमचं सांत्वन मला त्रासदायक वाटतं!” ()

    • देवाने मला आपलं निशाण बनवलंय असं म्हणतो (१२)

१६  मग ईयोबने उत्तर दिलं:  २  “मी पूर्वीही अशा भरपूर गोष्टी ऐकल्या आहेत. तुमचं सांत्वन मला त्रासदायक वाटतं!+  ३  तुमच्या या पोकळ शब्दांना* अंत आहे का? तुम्ही कशामुळे माझ्याशी असं बोलत आहात?  ४  मीसुद्धा तुमच्यासारखाच बोलू शकतो. तुम्ही माझ्या जागी असता,तर मीही डोकं हलवून,+तुमच्याविरुद्ध लांबलचक भाषणं देऊ शकलो असतो.  ५  पण नाही, त्याऐवजी मी माझ्या शब्दांनी तुम्हाला धीर दिला असता,म्हणजे माझ्या ओठांच्या सांत्वनाने तुमचं दुःख हलकं झालं असतं.+  ६  मी बोललो, तरी माझा त्रास कमी होत नाही,+आणि मी बोलायचा थांबलो, तरी माझ्या वेदना कुठे कमी होतात?  ७  आता तर त्याने मला अगदी हैराण करून सोडलंय;+त्याने माझं घरदार* उद्ध्‌वस्त केलंय.  ८  तू मला ताब्यात घेतलं आहेस; माझी अवस्थाच साक्ष देते,माझं अशक्‍त शरीर माझ्याविरुद्ध साक्ष देतं.  ९  त्याच्या क्रोधामुळे माझ्या चिंधड्या झाल्या आहेत;त्याच्या मनात माझ्याबद्दल वैर आहे.+ तो माझ्यावर दातओठ खातो. माझा शत्रू क्रूर नजरेने माझ्याकडे पाहतो.+ १०  लोक आपले जबडे उघडून मला गिळायला पाहतात.+ ते माझ्या थोबाडीत मारून माझा अपमान करतात. ते जमाव करून माझ्याविरुद्ध येतात.+ ११  देव मला पोरांच्या हाती देतो,तो मला दुष्टांच्या ताब्यात देतो.+ १२  मी सुखात होतो, पण त्याने माझा चुराडा केला;+त्याने माझं मानगूट धरून मला चिरडून टाकलं;त्याने मला निशाण बनवलंय. १३  त्याच्या तिरंदाजांनी मला घेरलंय.+ तो दयामाया न दाखवता माझ्या शरीरात खोलवर घाव करतो;+तो माझं पित्त जमिनीवर ओततो. १४  जागोजागी पडलेल्या भिंतीसारखी त्याने माझी अवस्था केली आहे;तो योद्ध्यासारखा माझ्यावर धावून येतो. १५  मी गोणपाट शिवून माझं अंग झाकलं आहे,+मी माझा सन्मान* धुळीत गाडला आहे.+ १६  रडून रडून माझं तोंड लाल झालं आहे,+माझ्या पापण्यांवर अंधाराची छाया* पडली आहे; १७  खरंतर, मी कधीच कोणाचं काही नुकसान केलं नाही,आणि माझी प्रार्थना शुद्ध आहे. १८  हे पृथ्वी, माझं रक्‍त झाकू नकोस!+ माझ्या आक्रोशाला विश्रांतीचं ठिकाण न मिळो! १९  या क्षणी माझा साक्षीदार;माझ्या बाजूने साक्ष देणारा स्वर्गात आहे. २०  माझे साथीदार माझी थट्टा करतात,+पण माझे डोळे देवासमोर अश्रू गाळतात.*+ २१  दोन माणसांत न्याय केला जातो,तसा कोणीतरी माझ्यात आणि देवात न्याय करावा.+ २२  कारण आता थोडीच वर्षं उरली आहेत,मग मी निघून जाईन आणि कधीही परत येणार नाही.+

तळटीपा

किंवा “दमदाटीला.”
किंवा “माझ्यासोबत जमणाऱ्‍यांना.”
किंवा “शक्‍ती.” शब्दशः “शिंग.”
किंवा “मृत्यूची सावली.”
किंवा कदाचित, “जागरण झालेल्या डोळ्यांनी पाहतात.”