ईयोब १९:१-२९

  • ईयोबचं उत्तर (१-२९)

    • मित्रांचं ताडन नाकारतो (१-६)

    • सगळ्यांनी मला सोडून दिलंय असं म्हणतो (१३-१९)

    • “मला सोडवणारा जिवंत आहे” (२५)

१९  यावर ईयोबने उत्तर दिलं:  २  “तुम्ही कुठपर्यंत माझ्या जिवाला* असं डिवचत राहणार?+ आणि तुमच्या शब्दांनी मला चिरडत राहणार?+  ३  आतापर्यंत दहादा तुम्ही मला फटकारलंय.* माझ्याशी कठोरपणे वागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही?+  ४  मी जर खरोखर चूक केली असेल,तर मी शिक्षा भोगायला तयार आहे.  ५  जर तुम्ही स्वतःला माझ्यापेक्षा श्रेष्ठ समजत असाल;माझा झालेला अपमान योग्यच आहे, असा दावा करत असाल,  ६  तर लक्षात ठेवा, देवानेच मला फसवलंय,त्यानेच मला त्याच्या जाळ्यात पकडलंय.  ७  ‘अन्याय! अन्याय!’ असं ओरडूनही कोणी ऐकत नाही;+मी मदतीसाठी हाक मारत राहतो, पण मला न्याय मिळत नाही.+  ८  त्याने माझा मार्ग भिंतीने अडवलाय, मला पुढे जाता येत नाही;माझ्या मार्गांवर त्याने काळोख पसरवलाय.+  ९  त्याने माझं वैभव हिरावून घेतलंय,माझ्या डोक्यावरचा मुकुट त्याने काढून घेतलाय. १०  मी कोलमडून पडेपर्यंत, तो चारही बाजूंनी माझ्यावर घाव घालतो;तो माझी आशा एखाद्या झाडासारखी उपटून टाकतो. ११  त्याचा क्रोध माझ्यावर भडकतो,तो मला आपला शत्रू समजतो.+ १२  त्याचं सगळं सैन्य येऊन मला वेढा घालतं;ते माझ्या तंबूभोवती छावणी करतात. १३  माझ्या भावांनासुद्धा त्याने माझ्यापासून दूर केलंय,मला ओळखणाऱ्‍यांनी माझ्याकडे पाठ फिरवली आहे.+ १४  माझ्या जिवलग मित्रांनी* मला सोडून दिलंय. माझे जवळचे सोबती मला विसरून गेले आहेत.+ १५  घरातले पाहुणे+ आणि माझ्या दासी मला परकं समजतात;त्यांच्या दृष्टीने मी परदेशी आहे. १६  मी माझ्या दासाला हाक मारतो, तरी तो उत्तर देत नाही. मी गयावया करत राहतो, तरी तो ऐकत नाही. १७  माझ्या बायकोला माझ्या श्‍वासाचीही किळस येते,+माझ्या भावांना मी दुर्गंधीसारखा झालोय! १८  लहान मुलंही मला तुच्छ समजतात,मी उठलो, की ते माझी टिंगल करतात. १९  माझे सगळे जवळचे मित्र माझा द्वेष करतात.+ मी ज्यांच्यावर प्रेम केलं, तेच माझ्याविरुद्ध उठले आहेत.+ २०  माझी हाडं दिसू लागली आहेत,+मी मृत्यूच्या तावडीतून अगदी थोडक्यात वाचलोय. २१  दया करा माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा,कारण देवाच्या हाताने मला तडाखा दिलाय.+ २२  देवाप्रमाणेच तुम्हीही का माझा छळ करता?+ का सतत माझ्यावर तुटून पडता?*+ २३  जर माझे शब्द लिहून ठेवण्यात आले असते;पुस्तकात नोंदवून ठेवण्यात आले असते, तर किती बरं झालं असतं! २४  लोखंडाच्या लेखणीने कोरून आणि शिसं ओतून,ते दगडावर कायमचे लिहिण्यात आले असते, तर किती बरं झालं असतं! २५  कारण मला सोडवणारा*+ जिवंत आहे, हे मला माहीत आहे;तो नंतर येईल आणि पृथ्वीवर* उभा राहील. २६  माझ्या त्वचेचा असा नाश झाल्यावरहीमी जिवंतपणी देवाला पाहीन. २७  मी स्वतः त्याला पाहीन;इतरांच्या नाही, तर स्वतःच्या डोळ्यांनी पाहीन.+ पण सध्या माझ्या जिवाची घालमेल होत आहे.* २८  कारण तुम्ही म्हणता, ‘आम्ही कुठे याला छळतोय?’+ तुमच्या मते, मुळात दोष माझाच आहे. २९  पण तलवारीचा धाक असू द्या,+कारण अपराधांसाठी तलवारीने शिक्षा मिळते;सर्वांवर एक न्यायाधीश आहे,+ हे लक्षात ठेवा.”

तळटीपा

किंवा “मला.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “अपमान केलाय.”
किंवा “नातेवाइकांनी.”
शब्दशः “का माझ्या मांसाने तृप्त होत नाही?”
किंवा “माझं तारण करणारा.”
शब्दशः “धुळीवर.”
किंवा “माझे गुरदे निकामी झाले आहेत.”