ईयोब २०:१-२९

  • सोफरचं दुसरं भाषण (१-२९)

    • ईयोबने अपमान केलाय असं म्हणतो (२, ३)

    • ईयोब दुष्ट आहे असं सुचवतो ()

    • ईयोबला पाप करायला आवडतं असं म्हणतो (१२, १३)

२०  मग सोफर+ नामाथी उत्तर देत म्हणाला:  २  “माझं मन खूप अस्वस्थ झालंय;बेचैन करणाऱ्‍या विचारांमुळे आता मला उत्तर दिल्याशिवाय राहवत नाही.  ३  तू माझं ताडन करून माझा अपमान केला आहेस,आता माझी समजशक्‍ती मला उत्तर द्यायला भाग पाडत आहे.  ४  तुला तर हे आधीपासून माहीतच असेल,कारण पृथ्वीवर माणसाला* निर्माण करण्यात आल्यापासून असंच घडत आलंय.+  ५  दुष्टाचा जल्लोष फार काळ टिकत नाही;दुर्जनाचा* आनंद क्षणापुरता असतो.+  ६  त्याचा अंहकार जरी आकाशाला भिडला,आणि त्याचं डोकं जरी आभाळापर्यंत पोहोचलं,  ७  तरी स्वतःच्या विष्ठेसारखा* त्याचा कायमचा नाश होईल;त्याच्या ओळखीचे लोक, ‘तो कुठे गेला?’ असं विचारतील.  ८  पण तो त्यांना सापडणार नाही, कारण तो स्वप्नासारखा विरून जाईल,रात्रीच्या दृष्टान्तासारखा तो नाहीसा होईल.  ९  जे त्याला पाहायचे, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही,आणि त्याच्या वस्तीत तो सापडणार नाही.+ १०  त्याची मुलं गरिबांच्या हातापाया पडतील,इतरांकडून बळकावलेली संपत्ती तो आपल्या हातांनी परत करेल.+ ११  त्याच्या अंगात* तारुण्याचा उत्साह सळसळत होता,पण तो* त्याच्यासोबत मातीला मिळेल. १२  जर त्याला दुष्टपणा गोड लागला,आणि त्याने तो जिभेखाली दाबून ठेवला, १३  जर थुंकून टाकण्याऐवजी तो त्याला चघळत राहिला,आणि त्याने तो तोंडातच धरून ठेवला, १४  तर त्याचं अन्‍न पोटात गेल्यावर आंबून जाईल;ते त्याच्या शरीरात नागाच्या विषासारखं* होईल. १५  त्याने धनसंपत्ती गिळून टाकली आहे, पण त्याला ती ओकावी लागेल;देव ती त्याच्या पोटातून बाहेर काढेल. १६  तो नागांचं विष चोखेल;विषारी सापाच्या दंशाने* त्याचा जीव जाईल. १७  पाण्याचे झरे त्याला कधीही दिसणार नाहीत,मधाच्या आणि लोण्याच्या नद्या तो पाहू शकणार नाही. १८  आपल्या मालमत्तेचा उपभोग घेण्याआधीच* त्याला ती परत करावी लागेल;व्यापारातून मिळवलेल्या संपत्तीचा तो आनंद घेऊ शकणार नाही.+ १९  कारण गोरगरिबांवर अत्याचार करून त्याने त्यांना निराधार सोडलंय;दुसऱ्‍याने बांधलेलं घर त्याने बळकावलंय. २०  पण त्याच्या मनाला जराही शांती मिळणार नाही;त्याची संपत्ती त्याला वाचवू शकणार नाही. २१  हिसकावून घेण्यासारखं काहीच न उरल्यामुळे,त्याची श्रीमंती टिकणार नाही. २२  भरभराटीच्या काळात त्याला चिंता सतावू लागतील;सर्व प्रकारची संकटं त्याच्यावर येतील. २३  तो आपलं पोट भरत असताना,देव* त्याच्यावर क्रोधाचा वर्षाव करेल,त्याचा क्रोध त्याच्या आतड्यांपर्यंत जाईल. २४  जेव्हा तो लोखंडाच्या शस्त्रांपासून पळेल,तेव्हा तांब्याच्या धनुष्यातून निघालेले बाण त्याला जखमी करतील. २५  तो आपल्या पाठीत खुपसलेला बाण;आपल्या पित्ताशयात घुसलेला चकाकता बाण ओढून काढेल,भीतीने त्याचा थरकाप उडेल.+ २६  त्याची सगळी संपत्ती अंधारात गडप होईल;कोणी वारा घातला नसतानाही, आग भडकून त्याला भस्म करेल. त्याच्या तंबूत जे उरतील त्यांच्यावर संकट येईल. २७  आकाश त्याचा अपराध उघड करेल;पृथ्वी त्याच्याविरुद्ध उठेल. २८  त्याचं घर पुरात वाहून जाईल;देवाच्या* क्रोधाच्या दिवशी महापूर येईल. २९  दुष्टाला देवाकडून मिळणारा वाटाआणि देवाने त्याच्या नावावर केलेला वारसा हाच आहे.”

तळटीपा

किंवा “मानवजातीला; आदामला.”
किंवा “देवाला सोडून देणाऱ्‍याचा.”
किंवा “घाणीसारखा.”
शब्दशः “हाडांत.”
म्हणजे, त्याचा उत्साह.
किंवा “पित्तासारखं.”
शब्दशः “जिभेने.”
शब्दशः “आणि तो गिळणार नाही.”
शब्दशः “तो.”
शब्दशः “त्याच्या.”