ईयोब २१:१-३४

  • ईयोबचं उत्तर (१-३४)

    • दुष्टांची भरभराट का होते (७-१३)

    • सांत्वन करणाऱ्‍यांचा खोटेपणा उघड करतो (२७-३४)

२१  तेव्हा ईयोबने उत्तर दिलं:  २  “मी बोलतोय ते लक्ष देऊन ऐका;इतकं केलंत तरी माझं सांत्वन होईल.  ३  धीर धरा आणि माझं ऐकून घ्या;मग माझी वाटेल तेवढी चेष्टा करा.+  ४  मी माणसाकडे तक्रार करतोय का? तसं असतं, तर मी केव्हाच धीर सोडला असता.  ५  चकित होऊन माझ्याकडे बघाआणि आपल्या तोंडावर आपला हात ठेवा.  ६  आठवण आली, की मी बेचैन होतो,माझ्या सगळ्या अंगाचा थरकाप उडतो.  ७  दुष्ट लोक म्हातारे होईपर्यंत का जिवंत राहतात?+ ते श्रीमंत* का होतात?+  ८  त्यांची मुलंबाळं नेहमी त्यांच्या डोळ्यांसमोर असतात. त्यांना आपली नातवंडं-पतवंडं पाहायला मिळतात.  ९  त्यांची घरं सुरक्षित असतात, त्यांना कसलीही भीती नसते,+देव त्यांना शिक्षा करत नाही. १०  त्यांचे बैल निष्फळ होत नाहीत;त्यांच्या गायींचे गर्भपात होत नाहीत, त्या वासरांना जन्म देतात. ११  त्यांचे मुलगे कळपासारखे मैदानात खेळतात. त्यांची मुलंबाळं आनंदाने बागडतात. १२  ते डफ आणि वीणा* घेऊन गातातआणि बासरीच्या सुरांनी त्यांना आनंद होतो.+ १३  ते समाधानाने आयुष्य घालवतातआणि शांतीने* कबरेत* जातात. १४  पण ते देवाला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा! आम्हाला तुझे मार्ग जाणून घ्यायची अजिबात इच्छा नाही.+ १५  सर्वशक्‍तिमान देव कोण आहे, की आम्ही त्याची उपासना करावी?+ त्याला जाणून आम्हाला काय मिळणार?’+ १६  पण त्यांची समृद्धी त्यांच्या हातात नाही, हे मला माहीत आहे.+ मी त्या दुष्टांसारखा विचार करत नाही.+ १७  दुष्टांचा दिवा विझून गेला;+त्यांच्यावर संकट कोसळलं;किंवा देवाने आपल्या रागात त्यांचा नाश केला, असं किती वेळा होतं? १८  वाऱ्‍याने उडणाऱ्‍या गवताच्या काडीसारखी,सोसाट्याच्या वाऱ्‍यासोबत उडून जाणाऱ्‍या भुशासारखी, कधी त्यांची दशा होते का? १९  माणसाच्या अपराधांची शिक्षा देव त्याच्या मुलांसाठी राखून ठेवतो. पण देवाने त्यालाही शिक्षा द्यावी, म्हणजे त्याला जाणीव होईल.+ २०  त्याने आपल्या डोळ्यांनी आपला नाश पाहावा,आणि सर्वशक्‍तिमान देवाच्या क्रोधाचा घोट त्याने स्वतः प्यावा.+ २१  कारण त्याच्या आयुष्यातले महिने जरी कमी करण्यात आले,+तरी आपल्यानंतर आपल्या घरादाराचं काय होईल, याची त्याला काय पर्वा? २२  देवाला ज्ञान कोण शिकवेल?*+ तो तर मोठ्यातल्या मोठ्या लोकांचाही न्याय करतो!+ २३  एखादा माणूस धडधाकट असताना;अगदी सुखासमाधानात असताना त्याचा मृत्यू होतो;+ २४  त्याच्या मांड्या भरदार असतातआणि त्याची हाडं मजबूत असतात. २५  पण दुसरा एखादा कोणत्याही चांगल्या गोष्टींचा आनंद न घेता,दुःखी आयुष्य जगून मरतो. २६  ते दोघंही मातीला मिळतात,+आणि दोघांनाही किडे खाऊन टाकतात.+ २७  तुम्ही काय विचार करत आहात,आणि मला त्रास देण्यासाठी* कोणत्या योजना करत आहात,+हे मला चांगलं माहीत आहे. २८  कारण तुम्ही म्हणता, ‘प्रतिष्ठित माणसाचं घर कुठे आहे? आणि दुष्ट माणूस राहत होता, तो तंबू कुठे आहे?+ २९  पण तुम्ही कधी प्रवाशांना विचारलं नाही का? त्यांच्या पाहण्यात काय आलंय,* त्याकडे लक्ष द्या. ३०  म्हणजे तुम्हाला कळेल, की संकटाच्या दिवशी दुष्ट माणूस सुखरूप बचावतो,आणि क्रोधाच्या दिवशी त्याची सुटका होते. ३१  त्याच्या वागणुकीबद्दल कोण त्याला जाब विचारेल? आणि कोण त्याला त्याच्या कृत्यांचं फळ देईल? ३२  त्याला दफनभूमीकडे नेलं जाईल,तेव्हा त्याच्या कबरेवर पहारा ठेवला जाईल. ३३  दरीतल्या मातीची ढेकळं त्याला गोड लागतील.+ त्याच्या आधी जसे असंख्य लोक कबरेत गेले,तशीच त्याच्या नंतरही सर्व माणसं जातील.*+ ३४  मग तुम्ही का उगाच मला सांत्वन देताय?+ कपटीपणे उत्तर देऊन तुम्ही माझी फसवणूक करताय!”

तळटीपा

किंवा “शक्‍तिशाली.”
किंवा “एका क्षणात,” म्हणजे कोणत्याही वेदना न होता लगेच त्यांना मृत्यू येतो.
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कोणी काही शिकवू शकतो का?”
किंवा कदाचित, “मला मारहाण करण्यासाठी.”
शब्दशः “त्यांची चिन्हं.”
शब्दशः “आणि तो आपल्यासोबत सबंध मानवजातीला ओढून नेईल.”