ईयोब २२:१-३०

  • अलीफजचं तिसरं भाषण (१-३०)

    • “माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का?” (२, ३)

    • ईयोब लोभी आणि अन्यायी असल्याचा आरोप करतो (६-९)

    • “देवाकडे परत ये, म्हणजे तो तुला पुन्हा समृद्ध करेल” (२३)

२२  तेव्हा अलीफज+ तेमानी याने उत्तर दिलं:  २  “माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का? सखोल समज असलेल्या माणसामुळे देवाला काही फायदा होतो का?+  ३  तू नीतिमान असल्यामुळे, सर्वशक्‍तिमान देवाला काही फरक पडतो का?* तू खरेपणाने चालल्यामुळे त्याला काही लाभ होतो का?+  ४  तो काय तुझी श्रद्धा पाहूनतुला न्यायालयात नेईल आणि शिक्षा देईल?  ५  तुझ्या मोठ्या दुष्टपणामुळे;आणि तुझ्या भरमसाट अपराधांमुळेच तो असं करत नाही का?+  ६  तू अन्यायाने आपल्या भावांकडून त्यांच्या वस्तू तारण म्हणून घेतोस,आणि लोकांकडून त्यांची वस्त्रं हिसकावून, त्यांना उघडं सोडून देतोस.*+  ७  थकलेल्या माणसाला तू घोटभर पाणी देत नाहीस,भुकेल्या माणसाला तू खायला भाकर देत नाहीस.+  ८  ताकदवान असल्यामुळे तू खूप जमीन बळकावलीस,+तिच्यावर फक्‍त तुझ्या मर्जीतले लोक राहतात.  ९  पण तू विधवांना रिकाम्या हाती पाठवलंस,आणि अनाथ मुलांना* चिरडलंस. १०  म्हणूनच तुझ्याभोवती पाश* पसरले आहेत+ आणि भीती अचानक तुझ्यावर झडप घालते; ११  म्हणूनच तुला भयानक अंधारामुळे काही दिसत नाही,आणि तू महापुरात बुडत आहेस. १२  देव उंच आकाशात नाही का? पाहा, सर्व तारे किती उंचावर आहेत. १३  पण तू म्हणतोस, ‘देवाला काय कळतं? गडद अंधारातून तो कसा काय न्याय करेल? १४  जेव्हा तो आकाशाच्या घुमटावर* चालतो,तेव्हा मेघांच्या पडद्यामुळे त्याला काहीच दिसत नाही.’ १५  पूर्वीच्या काळात दुष्ट ज्या मार्गावर चालले,त्याच मार्गावर तूही चालणार का? १६  त्यांना त्यांच्या वेळेआधीच हिरावून घेण्यात आलं,*त्यांचा पाया पुराने* वाहून गेला.+ १७  ते देवाला म्हणाले: ‘आमच्यापासून दूर जा!’ आणि ‘सर्वशक्‍तिमान देव आमचं काय बिघडवू शकतो?’ १८  पण, त्यानेच त्यांची घरं चांगल्या गोष्टींनी भरली. (असे दुष्ट विचार कधीच माझ्या मनात आले नाहीत.) १९  नीतिमान लोक हे पाहून आनंद करतील,आणि निर्दोष त्यांची थट्टा करत म्हणतील: २०  ‘आमच्या विरोधकांचा नाश झालाय,त्यांचं जे काही उरलं असेल, ते आगीत भस्म होईल.’ २१  देवाला जाणून घे, म्हणजे तू शांतीने राहशील;आणि चांगल्या गोष्टी तुझ्या वाट्याला येतील. २२  त्याच्या तोंडून निघालेल्या नियमांचं पालन कर,त्याचे शब्द तुझ्या हृदयात साठवून ठेव.+ २३  सर्वशक्‍तिमान देवाकडे परत ये, म्हणजे तो तुला पुन्हा समृद्ध करेल.+ जर तू आपल्या तंबूमधून अनीती काढून टाकलीस, २४  जर तू आपलं सोनं धुळीत फेकून दिलंस;आणि ओफीरचं* सोनं+ दरीत टाकून दिलंस, २५  तर सर्वशक्‍तिमान देव तुझ्यासाठी सोन्यासारखा;आणि सर्वात मौल्यवान चांदीसारखा होईल. २६  मग सर्वशक्‍तिमान देवामुळे तू आनंदी होशील,आणि मान वर करून देवाकडे बघू शकशील. २७  तू याचना करशील आणि तो तुझं ऐकेल;त्याला केलेले नवस तू फेडशील. २८  तू जे काही हाती घेशील ते यशस्वी होईल,तुझा मार्ग उजळून जाईल. २९  जर तू उद्धटपणे बोललास, तर तुझा अपमान होईल,पण तो नम्र लोकांना वाचवेल. ३०  तो निर्दोष लोकांना सोडवतो;जर तुझे हात शुद्ध असतील, तर तुझी नक्कीच सुटका होईल.”

तळटीपा

किंवा “आनंद होतो का?”
शब्दशः “तू उघड्यानागड्यांची वस्त्रं हिसकावतोस.”
किंवा “वडील नसलेल्या मुलांना.”
शब्दशः “पक्षी पकडण्याचे सापळे.”
किंवा “गोलावर.”
किंवा “अकाली मृत्यू आला.”
शब्दशः “नदी.”
ओफीर हे सर्वात उत्कृष्ट प्रतीचं सोनं मिळण्याचं एक प्रसिद्ध ठिकाण होतं.