ईयोब २३:१-१७

  • ईयोबचं उत्तर (१-१७)

    • देवासमोर आपला वाद नेण्याची इच्छा व्यक्‍त करतो (१-७)

    • देव सापडत नाही असं म्हणतो (८, ९)

    • “मी कधीही उजवीडावीकडे वळलो नाही” (११)

२३  मग ईयोबने उत्तर दिलं:  २  “उसासे टाकून मी गळून गेलोय,पण आजही मी गप्प बसणार नाही, मी तक्रार करत राहीन.+  ३  देव कुठे सापडेल हे मला माहीत असतं, तर किती बरं झालं असतं!+ म्हणजे तो जिथे राहतो, तिथे मी गेलो असतो.+  ४  मी त्याच्यासमोर माझी बाजू मांडली असती,आणि बरेच तर्क* केले असते.  ५  मग तो काय उत्तर देतो, हे मला कळलं असतं;त्याने सांगितलेल्या गोष्टी मी लक्ष देऊन ऐकल्या असत्या.  ६  माझ्याशी वाद घालताना त्याने त्याची अफाट शक्‍ती दाखवली असती का? नाही, मला खातरी आहे, त्याने माझं ऐकून घेतलं असतं.+  ७  मग त्याच्यासमोर प्रामाणिक माणूस आपला वाद सोडवू शकला असता,आणि माझ्या न्यायाधीशाने मला कायमचं निर्दोष ठरवलं असतं.  ८  पण मी पूर्वेकडे गेलो, तर तो तिथे नसतो,आणि मी पश्‍चिमेला गेलो, तरी तो मला सापडत नाही;  ९  तो उत्तरेकडे आपलं काम करत असला, तर मी त्याला पाहू शकत नाही;आणि तो दक्षिणेकडे वळला, तरी तो मला दिसत नाही. १०  पण मी कोणत्या वाटेने जातोय, हे त्याला माहीत आहे.+ त्याने मला पारखल्यावर मी शुद्ध सोन्यासारखा निघेन.+ ११  मी नेहमी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो;मी कधीही उजवीडावीकडे वळलो नाही.+ १२  त्याच्या तोंडातून निघालेली आज्ञा मी कधीच मोडली नाही. माझ्याकडून केलेल्या अपेक्षेपलीकडे,* मी त्याच्या शब्दांचं पालन केलं.+ १३  त्याने जर निश्‍चय केला, तर त्याला कोण अडवू शकतं?+ त्याने जर काही ठरवलं, तर ते केल्याशिवाय तो राहत नाही.+ १४  माझ्या बाबतीत त्याने जे काही ठरवलंय,* ते तो नक्कीच करेल;अशा बऱ्‍याच गोष्टी त्याने ठरवल्या आहेत. १५  म्हणून मला त्याची भीती वाटते;मी जितका त्याच्याबद्दल विचार करतो, तितकंच माझं भय वाढत जातं. १६  सर्वशक्‍तिमान देवाने मला भयभीत केलंय,माझ्या काळजाचं पाणी पाणी झालंय! १७  अंधाराने मला घेरलंय आणि काळोखाने मला झाकून टाकलंय,पण तरी मी शांत राहणार नाही.

तळटीपा

किंवा “युक्‍तिवाद.”
किंवा “मला सांगण्यात आलं होतं त्याच्यापलीकडे.”
किंवा “सांगितलंय.”