ईयोब २४:१-२५

  • ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२५)

    • “देव एक वेळ का ठरवत नाही?” ()

    • देव दुष्टतेला परवानगी देतो असं म्हणतो (१२)

    • पापी लोकांना अंधार आवडतो (१३-१७)

२४  सर्वशक्‍तिमान देव एक वेळ का ठरवत नाही?+ त्याला जाणणारे त्याचा दिवस* का पाहू शकत नाहीत?  २  लोक सीमेचे दगड हलवतात;+आपल्या कुरणासाठी ते दुसऱ्‍यांची मेंढरं चोरतात.  ३  ते अनाथ मुलांचं* गाढव पळवून नेतात;ते विधवेचा बैल तारण म्हणून जप्त करतात.*+  ४  ते गरिबांना मार्गावरून बाजूला करतात;दीनदुबळ्यांना त्यांच्यापासून लपावं लागतं.+  ५  गोरगरीब जंगलातल्या रानगाढवांसारखे+ अन्‍न शोधत फिरतात;मुलाबाळांसाठी अन्‍न शोधत ते वाळवंटात भटकतात.  ६  त्यांना दुसऱ्‍यांच्या शेतात कापणी करावी लागते*आणि ते दुष्टांच्या मळ्यात उरलेली द्राक्षं गोळा करतात.  ७  ते कपड्यांशिवाय, उघडेच रात्र घालवतात.+ त्यांच्याजवळ थंडीत पांघरायला काहीच नसतं.  ८  पर्वतावरून येणाऱ्‍या पावसाने ते ओलेचिंब होतात;आसरा नसल्यामुळे ते खडकांना बिलगून बसतात.  ९  दुष्ट लोक वडील नसलेल्या मुलाला* आईच्या छातीपासून ओढून नेतात;+गोरगरिबांचे कपडे ते कर्जासाठी तारण म्हणून घेतात.+ १०  त्यामुळे गोरगरिबांना उघडंच फिरावं लागतं;ते धान्याच्या पेंढ्या वाहून नेतात, पण स्वतः उपाशीच राहतात. ११  द्राक्षमळ्याच्या भिंतींमागे ते भर दुपारी राबतात;* द्राक्षकुंडांमध्ये ते द्राक्ष तुडवतात, पण स्वतः तहानलेलेच राहतात.+ १२  शहरातून मरायला टेकलेल्यांचं कण्हणं ऐकू येतं;जखमी झालेले मदतीसाठी आक्रोश करतात,+पण देवाला याची काहीच पर्वा नाही.* १३  दुष्ट प्रकाशाविरुद्ध बंड करतात;+त्यांना त्याचे मार्ग माहीत नाहीत,आणि ते त्याच्या मार्गांवर चालत नाहीत. १४  खुनी पहाटेच उठतो;तो दीनदुबळ्यांची, गरिबांची कत्तल करतो,+आणि रात्री चोरी करतो. १५  व्यभिचारी माणूस संध्याकाळची वाट पाहतो,+‘मला कोणी पाहणार नाही,’ असं म्हणून,+तो आपलं तोंड झाकून घेतो. १६  दुष्ट रात्री घरं फोडतात;* दिवसा ते आपल्या घरांमध्ये लपतात. त्यांना प्रकाश माहीतच नसतो.+ १७  सकाळ त्यांना गडद अंधारासारखी वाटते;भयाण काळोख त्यांना ओळखीचा वाटतो. १८  पण ते पाण्यासोबत वेगाने वाहून जातील.* त्यांचा जमिनीचा वाटा शापित होईल.+ आपल्या द्राक्षमळ्यांकडे ते परत येणार नाहीत. १९  उष्णतेमुळे आणि दुष्काळामुळे जसं बर्फाचं पाणी नाहीसं होतं,तसे पाप करणारे कबरेत* नाहीसे होतात.+ २०  दुष्टाची आई* त्याला विसरेल; किडे त्याला फस्त करतील. कोणालाही त्याची आठवण राहणार नाही.+ त्याला झाडाप्रमाणे तोडून टाकलं जाईल. २१  तो वांझ स्त्रीवर अन्याय करतो,आणि विधवेवर अत्याचार करतो. २२  देव* आपल्या ताकदीने शक्‍तिशाली लोकांचा नाश करेल;त्यांची भरभराट झाली, तरी त्यांना आपल्या जीवाचा भरवसा नसेल. २३  देव* त्यांना निश्‍चिंत आणि निर्धास्त राहू देतो,+पण त्यांच्या सगळ्या कृत्यांवर* त्याची नजर असते.+ २४  ते थोड्या काळासाठी समृद्ध होतात, मग ते नाहीसे होतात.+ त्यांना खाली ओढलं जातं;+आणि कणसांप्रमाणे कापून, इतरांप्रमाणेच गोळा केलं जातं. २५  आता सांगा, मला कोण खोटं ठरवू शकतं? माझे शब्द चुकीचे आहेत, असं कोण म्हणू शकतं?”

तळटीपा

म्हणजे, त्याचा न्यायाचा दिवस.
किंवा “वडील नसलेल्या मुलांचं.”
किंवा “गहाण ठेवून घेतात.”
किंवा कदाचित, “शेतामध्ये चारा गोळा करावा लागतो.”
किंवा “अनाथाला.”
किंवा कदाचित, “टेकड्यांमधल्या भिंतींमागे तेल काढतात.”
किंवा कदाचित, “देव कोणालाच दोषी ठरवत नाही.”
शब्दशः “खणतात.”
शब्दशः “तो पाण्याच्या पृष्ठभागावर वेगवान असतो.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “गर्भाशय.”
शब्दशः “तो.”
शब्दशः “तो.”
शब्दशः “त्यांच्या मार्गांवर.”