ईयोब ३:१-२६

  • ईयोब आपल्या जन्माबद्दल दुःख व्यक्‍त करतो (१-२६)

    • त्याच्यावर संकट का आलं, असं विचारतो (२०, २१)

 त्यानंतर ईयोबने बोलायला सुरुवात केली आणि आपल्या जन्माच्या दिवसाला तो शाप देऊ लागला.*+ २  ईयोब म्हणाला:  ३  “माझा जन्म झाला तो दिवस नाहीसा होवो,+‘पुरुष गर्भ राहिला आहे!’ असं म्हणण्यात आलं ती रात्र नष्ट होवो.  ४  तो दिवस अंधारात बुडो. स्वर्गातल्या देवाला त्याचं स्मरण न राहो;त्या दिवसावर प्रकाशाचा एकही किरण न पडो.  ५  दाट काळोख* त्यावर हक्क सांगो. घनदाट ढगाचं सावट त्यावर येवो. त्याचा प्रकाश भयानक अंधारात गडप होवो.  ६  काळाकुट्ट अंधार त्या रात्रीला काबीज करो;+वर्षाच्या दिवसांत तो दिवस आनंदी न होवो,कोणत्याही महिन्यात त्याला मोजलं न जावो.  ७  खरंच! ती रात्र निष्फळ ठरो;तिच्यात आनंदाचा स्वर ऐकू न येवो.  ८  दिवसाला शाप देणारे;लिव्याथानला*+ जागं करू शकणारे तिला शाप देवो.  ९  तिच्या पहाटेच्या चांदण्या अंधकारमय होवोत. ती व्यर्थच उजेडाची वाट पाहत राहो,सूर्योदयाची किरणं तिला न दिसोत. १०  कारण तिने माझ्या आईच्या उदराची* दारं बंद केली नाहीत;+तिने मला दुःखापासून लपवलं नाही. ११  मी जन्मताच का मेलो नाही? आईच्या पोटातून निघताच माझा जीव का गेला नाही?+ १२  माझ्या आईने मला मांडीवर का घेतलं? तिने मला दूध का पाजलं? १३  नाहीतर, आज मी शांतपणे पडलो असतो;+मी गाढ झोपेत निश्‍चिंत पडलो असतो.+ १४  ज्यांनी बांधलेल्या इमारती आज ओसाड पडल्या आहेत,*अशा राजांसोबत आणि त्यांच्या मंत्र्यांसोबत मी असतो. १५  किंवा, ज्यांच्याजवळ भरपूर सोनं होतं,ज्यांचे महाल चांदीने भरले होते, अशा राजकुमारांसोबत मी असतो. १६  मी अकाली पडलेल्या गुप्त गर्भासारखा;कधीच प्रकाश न पाहिलेल्या बाळासारखा का झालो नाही? १७  तिथे तर दुष्टांनाही त्रासातून सुटका मिळते;तिथे थकलेल्यांना विश्रांती मिळते.+ १८  तिथे सगळेच कैदी निश्‍चिंत असतात;त्यांना कोणीही बळजबरीने कामाला लावत नाही; १९  तिथे लहानमोठे सगळे सारखेच असतात,+तिथे गुलामाला आपल्या मालकापासून स्वातंत्र्य मिळतं. २०  देव दुःखी माणसाला प्रकाश का दाखवतो? दुःखाने व्याकूळ असलेल्यांना जीवन का देतो?+ २१  जे मृत्यूची वाट पाहतात त्यांना मृत्यू का येत नाही?+ ते गुप्त खजिन्यासारखा त्याचा शोध घेतात, २२  मृत्यू येतो तेव्हा त्यांना आनंद होतो,ते मोठा आनंद साजरा करतात. २३  ज्याला देवाने स्वतः कुंपण घालून कोंडलं आहे,अशा वाट हरवलेल्या माणसाला तो प्रकाश का दाखवतो?+ २४  कारण उसासेच माझं अन्‍न झाले आहेत,+माझा आक्रोश+ पाण्यासारखा वाहतो. २५  ज्याची मला भीती होती तेच माझ्या बाबतीत घडलं,ज्या संकटाचं मला भय होतं तेच माझ्यावर कोसळलं. २६  मला जराही शांती, स्वस्थता किंवा विश्राम मिळाला नाही,आणि तरीही माझ्या वाट्याला दुःखं येतच राहतात.”

तळटीपा

शब्दशः “त्याच्या दिवसाला शाप देऊ लागला.”
किंवा “अंधाराची आणि मृत्यूची सावली.”
हा शब्द मगरीला किंवा पाण्यात राहणाऱ्‍या दुसऱ्‍या एखाद्या मोठ्या, शक्‍तिशाली प्राण्याला सूचित करतो असं समजलं जातं.
किंवा “गर्भाशयाची.”
किंवा कदाचित, “ज्यांनी स्वतःसाठी ओसाड इमारती बांधल्या आहेत.”