ईयोब ३१:१-४०

  • ईयोब आपल्या खरेपणाचं समर्थन करतो (१-४०)

    • “डोळ्यांसोबत करार” ()

    • देवाने तोलून पाहावं असं म्हणतो ()

    • व्यभिचारी नाही (९-१२)

    • पैशाचा लोभी नाही (२४, २५)

    • मूर्तिपूजक नाही (२६-२८)

३१  मी आपल्या डोळ्यांसोबत करार केला आहे.+ मग एखाद्या तरुणीकडे मी वाईट नजरेने कसा पाहू?+  २  असं केलं, तर स्वर्गातल्या देवाकडून मला काय वाटा मिळेल? आणि उंचावर राहणाऱ्‍या सर्वशक्‍तिमान देवाकडून मला काय वारसा मिळेल?  ३  दुष्टावर विपत्ती येणार नाही का? वाईट कृत्यं करणारा संकटात सापडणार नाही का?+  ४  देवाची नजर माझ्या मार्गांवर आहे;+तो माझी सर्व पावलं मोजतो.  ५  मी कधी खोट्या मार्गाने* चाललोय का? किंवा फसवणूक करण्यासाठी माझे पाय कधी धावले का?+  ६  देवाने मला अचूक तराजूने तोलावं;+म्हणजे त्याला माझा खरेपणा कळेल.+  ७  जर माझी पावलं भरकटली असतील,+किंवा माझ्या डोळ्यांनी माझ्या मनाला मोहात पाडलं असेल,+किंवा माझे हात अशुद्ध झाले असतील,  ८  तर मी पेरलेलं पीक दुसऱ्‍याने खावं+आणि जे मी लावलं, ते उपटून टाकलं जावं.*  ९  जर माझं मन दुसऱ्‍या स्त्रीमुळे भुलवलं गेलं असेल+ आणि मी माझ्या शेजाऱ्‍याच्या दाराजवळ टपून बसलो असेन,+ १०  तर माझ्या बायकोने दुसऱ्‍या पुरुषाचं दळण दळावं,आणि इतर माणसांनी तिच्यासोबत संबंध ठेवावेत.+ ११  कारण ते माझ्याकडून घडलेलं लाजिरवाणं कृत्य असेल,आणि त्या अपराधासाठी मला न्यायाधीशांकडून शिक्षा मिळावी.+ १२  ती उद्ध्‌वस्त करणारी आग असेल;+ती माझ्या सर्व उत्पन्‍नाचा अगदी मुळापासून नाश करेल. १३  माझ्या दासदासींनी माझ्याविरुद्ध तक्रार केल्यावर,*जर मी त्यांना न्याय दिला नसेल, १४  तर जेव्हा देव माझा न्याय करेल,* तेव्हा मी काय करीन? तो हिशोब मागेल, तेव्हा मी काय उत्तर देईन?+ १५  ज्याने गर्भाशयात माझी रचना केली, त्यानेच त्यांचीही रचना केली नाही का?+ त्या एकाच देवाने आम्हाला जन्माआधी* घडवलं नाही का?+ १६  जर मी गरिबांची इच्छा पूर्ण केली नसेल,+किंवा जर माझ्यामुळे विधवांचे डोळे पाणावले असतील;*+ १७  जर मी अनाथांना माझ्या घासातला घास दिला नसेलआणि माझं अन्‍न एकट्यानेच खाल्लं असेल;+ १८  (कारण मी तर माझ्या तरुणपणापासून, अनाथाला* पित्यासारखं सांभाळलं आहे,आणि लहानपणापासून* विधवांना* मदत केली आहे.) १९  जर मी एखाद्याला कपड्यांशिवाय थंडीने मरताना पाहिलं असेल,किंवा गरिबाकडे पांघरायला काही नाही, असं पाहिलं असेल;+ २०  जर माझ्या मेंढरांच्या लोकरीची ऊब घेत,त्याने मला आशीर्वाद दिला नसेल;+ २१  शहराच्या फाटकाजवळ,+ माझ्या मदतीची गरज असलेल्या* अनाथावर,जर मी हात उगारला असेल;+ २२  तर माझा हात खांद्यापासून निखळू दे,आणि माझा हात कोपरापासून तुटू दे. २३  कारण देवाकडून येणाऱ्‍या संकटाचं मला भय होतं;त्याच्या गौरवापुढे मी उभा राहू शकलो नसतो. २४  जर मी सोन्यावर भरवसा ठेवला असेल,आणि ‘तूच मला संरक्षण देशील!’ असं शुद्ध सोन्याला म्हटलं असेल;+ २५  माझ्याजवळ असलेली अमाप संपत्ती आणि मी मिळवलेल्या मौल्यवान वस्तू यांतच जर मी आनंदी राहिलो असेन;+ २६  जर सूर्याचं* तेज पाहून,किंवा आकाशात चंद्राचं वैभव पाहून;+ २७  माझं मन गुप्तपणे मोहित झालं असेलआणि मी माझ्या हाताचं चुंबन घेऊन त्यांची उपासना केली असेल;+ २८  तर माझ्या या अपराधाची मला न्यायाधीशांकडून शिक्षा मिळावी,कारण हे स्वर्गातल्या देवाला नाकारण्यासारखं आहे. २९  माझ्या शत्रूचा नाश झाल्यामुळे मला कधी आनंद झालाय का?+ किंवा त्याचं वाईट झाल्यावर मी कधी खूश झालोय का? ३०  त्याचा जीव जावा, असा शाप देऊन,मी कधीही आपल्या तोंडाने पाप केलं नाही.+ ३१  माझ्या तंबूतली माणसं असं म्हणाली नाहीत का,‘त्याच्या अन्‍नाने* तृप्त न झालेला माणूस शोधून सापडणार नाही’?+ ३२  प्रवाशांसाठी माझ्या घराची दारं नेहमी उघडी असायची;कोणत्याही परदेशी* माणसाला उघड्यावर रात्र घालवावी लागली नाही.+ ३३  मी कधी इतर माणसांसारखे माझे अपराध झाकायचा प्रयत्न केलाय का?+ माझ्या चुका मी कधी अंगरख्यात लपवल्या आहेत का? ३४  लोक काय म्हणतील या भीतीने,आणि शेजाऱ्‍यांच्या धाकाने,मी कधी घाबरून घरात गुपचूप बसलोय का? ३५  कोणी माझं ऐकून घेतलं, तर किती बरं होईल!+ माझा प्रत्येक शब्द खरा आहे, असं मी शपथ घेऊन सांगीन.* सर्वशक्‍तिमान देवाने मला उत्तर द्यावं!+ माझ्या विरोधकाने त्याचे आरोप लिहून दिले, तर किती बरं होईल! ३६  मी ते माझ्या खांद्यावर घेऊन फिरेन,आणि माझ्या डोक्यावर मुकुटासारखे घालीन. ३७  मी त्याला माझ्या प्रत्येक पावलाचा हिशोब देईन;एखाद्या राजकुमारासारखा मी धैर्याने त्याच्यासमोर जाईन. ३८  जर माझ्या जमिनीने माझ्याविरुद्ध तक्रार केली असेल आणि नांगराने ओढलेल्या रेघा एकत्र मिळून रडल्या असतील; ३९  जर मी मोबदला न देता तिचा उपज खाल्ला असेल,+किंवा मी तिच्या मालकांना* त्रास दिला असेल;+ ४०  तर माझ्या जमिनीतून गव्हाच्या ऐवजी काटे उगवावेतआणि जवाच्या ऐवजी उग्र वासाची झुडपं उगवावीत.” ईयोबचे शब्द इथे संपतात.

तळटीपा

किंवा कदाचित, “कपटी माणसांसोबत.”
किंवा “माझ्या वंशजांचा समूळ नाश व्हावा.”
किंवा “न्यायालयात दाद मागितल्यावर.”
शब्दशः “उठेल.”
शब्दशः “गर्भाशयात.”
शब्दशः “माझ्यामुळे विधवेचे डोळे कमजोर झाले असतील.”
शब्दशः “माझ्या आईच्या गर्भाशयापासून.”
शब्दशः “तिला.”
शब्दशः “त्याला.”
किंवा कदाचित, “शहराच्या फाटकामध्ये मला पाठिंबा आहे, असं पाहून.”
शब्दशः “प्रकाश.”
शब्दशः “मांसाने.”
किंवा “परक्या.”
किंवा “ही घ्या माझी सही.”
किंवा “मालकांच्या जिवाला.”