ईयोब ३२:१-२२

  • अलीहू नावाचा तरुण चर्चेत सामील होतो (१-२२)

    • ईयोबवर आणि त्याच्या मित्रांवर भडकतो (२, ३)

    • मोठ्यांना मान देऊन, बोलण्याआधी वाट पाहतो (६, ७)

    • फक्‍त वयामुळे शहाणपण येत नाही ()

    • अलीहू बोलायला आतुर (१८-२०)

३२  त्या तीन माणसांनी ईयोबला पुढे काहीच उत्तर दिलं नाही, कारण ईयोबला आपण नीतिमान असल्याची पूर्ण खातरी होती.*+ २  पण रामच्या घराण्यातल्या बरखेल बूजीचा+ मुलगा अलीहू याला खूप राग आला. देवाऐवजी ईयोब स्वतःला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे तो ईयोबवर संतापला.+ ३  तसंच, ईयोबच्या तीन मित्रांनी त्याला योग्य उत्तर देण्याऐवजी, देवाला दुष्ट म्हटल्यामुळे तो त्यांच्यावरही चिडला.+ ४  पण ते वयाने मोठे असल्यामुळे, ईयोबला उत्तर देण्याची आपल्याला कधी संधी मिळते, याची तो वाट पाहत होता.+ ५  त्या तिघांजवळ बोलायला काहीही नाही, हे पाहून अलीहूचा राग भडकला. ६  म्हणून बरखेल बूजीचा मुलगा अलीहू याने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला: “मी लहान* आहेआणि तुम्ही वयाने मोठे आहात.+ तुमच्याबद्दल आदर असल्यामुळे मी गप्प बसलो,+आणि मला जे कळतं ते सांगायचं मी धैर्य केलं नाही.  ७  मी विचार केला, ‘मोठ्या माणसांना* बोलू द्यावं. ज्यांनी जास्त दिवस पाहिलेत त्यांना बुद्धीच्या गोष्टी सांगू द्याव्या.’  ८  पण माणसाला समजबुद्धी ही देवाच्या पवित्र शक्‍तीमुळे;* सर्वशक्‍तिमान देवाच्या श्‍वासामुळेच मिळते.+  ९  फक्‍त वयामुळे* माणसाला शहाणपण* येत नाही,आणि योग्य काय ते फक्‍त म्हाताऱ्‍या माणसांनाच समजतं, असं नाही.+ १०  म्हणून म्हणतो, ‘माझं ऐका,म्हणजे मला जे कळतं ते मीही तुम्हाला सांगीन.’ ११  तुमचं बोलणं संपेपर्यंत मी थांबलो;+तुम्ही उत्तरं शोधत होता आणि वादविवाद करत होता, तेव्हा मी ऐकत होतो.+ १२  तुमचं बोलणं मी लक्ष देऊन ऐकलं,पण ईयोबला खोटं ठरवणं;* किंवा त्याचा तर्क खोडून काढणं एकालाही जमलं नाही. १३  म्हणून, ‘आम्हीच बुद्धिमान आहोत,आणि माणूस नाही, तर देवच ईयोबला ताडन करतोय’ असं म्हणू नका. १४  तो काही माझ्याविरुद्ध बोलला नाही;त्यामुळे मी त्याला तुमच्यासारखी उत्तरं देणार नाही. १५  ही माणसं कावरीबावरी झाली आहेत, काय बोलावं हे त्यांना सुचत नाही;आता त्यांच्याजवळ द्यायला उत्तरच नाही. १६  मी वाट पाहतोय, पण ते काही बोलतच नाहीत;ते नुसतेच गप्प उभे आहेत. १७  म्हणून आता मी उत्तर देईन;मला जे कळतं ते मीही सांगीन. १८  मला खूप काही बोलायचंय;पवित्र शक्‍ती मला बोलायला भाग पाडत आहे. १९  आता मला बोलल्याशिवाय राहवत नाही,*मी गप्प बसलो, तर माझं हृदय फाटेल.*+ २०  मला बोलू द्या; तरच मला चैन पडेल! मी आपलं तोंड उघडून उत्तर देईन. २१  मी कोणाचीही बाजू घेणार नाही;+माणसांची खोटी प्रशंसा करणार नाही,* २२  कारण खोटी प्रशंसा करणं मला जमतच नाही;आणि जर मी केली, तर माझा निर्माणकर्ता लगेच माझा नाश करेल.

तळटीपा

किंवा “कारण ईयोब स्वतःच्या दृष्टीने नीतिमान होता.”
शब्दशः “दिवसांत लहान.”
शब्दशः “दिवसांना.”
किंवा “पुष्कळ दिवस पाहिल्यामुळे.”
किंवा “बुद्धी.”
किंवा “ईयोबची चूक दाखवणं.”
किंवा “माझ्या आतड्या घट्ट बंद केलेल्या द्राक्षारसाच्या बुधलीसारख्या आहेत.”
किंवा “माझ्या आतड्या फुटायला आलेल्या द्राक्षारसाच्या नवीन बुधल्यांसारख्या आहेत.”
किंवा “मानाची पदवी देणार नाही.”