ईयोब ३९:१-३०

  • प्राण्यांच्या सृष्टीवरून माणसाचं अज्ञान कळून येतं (१-३०)

३९  पहाडी रानशेळ्या कधी प्रसवतात* हे तुला माहीत आहे का?+ हरिणींना आपल्या पाडसाला* जन्म देताना तू पाहिलं आहेस का?+  २  त्यांचे महिने कधी भरतील हे तू मोजतोस का? त्यांची जन्म देण्याची वेळ तुला माहीत आहे का?  ३  त्या खाली वाकून पिल्लांना जन्म देतातआणि प्रसूतीच्या वेदनांतून मुक्‍त होतात.  ४  त्यांची पिल्लं मोकळ्या रानात वाढतात आणि धष्टपुष्ट होतात;ती निघून जातात आणि त्यांच्याकडे परत येत नाहीत.  ५  रानगाढवाला कोणी मोकळं सोडलं?+ त्याचे दोर कोणी सोडले?  ६  मी वाळवंटाला त्याचं घर केलं आहे;खाऱ्‍या जमिनीवर त्याला राहायला जागा दिली आहे.  ७  शहराची गजबज त्याला नकोशी वाटते. प्राणी हाकणाऱ्‍याचं ओरडणं त्याला ऐकू येत नाही.  ८  ते टेकड्यांवर गवतासाठी भटकत राहतंआणि हिरवी झुडपं शोधत फिरतं.  ९  रानबैल तुझी चाकरी करायला तयार होईल का?+ तुझ्या गोठ्यात* तो रात्र घालवेल का? १०  तू त्याला बांधून आपलं शेत नांगरायला लावू शकतोस का? खोऱ्‍यातली जमीन नांगरायला तो तुझ्यामागे येईल का? ११  त्याच्याजवळ प्रचंड ताकद आहे,म्हणून तू त्याच्याकडून कष्टाची कामं करून घेऊ शकतोस का? १२  तो शेतातून पीक* गोळा करून,तुझ्या खळ्यामध्ये* आणून टाकेल का? १३  शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते,पण तिच्या पंखांची आणि पिसाऱ्‍याची तुलना,करकोच्याच्या पंखांशी होऊ शकते का?+ १४  ती तर आपली अंडी जमिनीवर टाकून जाते,आणि त्यांना मातीतच उबू देते. १५  कुणाचा पाय पडून ती फुटतील;किंवा एखादा प्राणी त्यांना पायाखाली तुडवेल, याचंही तिला भान नसतं. १६  ती आपल्या पिल्लांशी कठोरपणे वागते, जणू ती तिची नाहीतच!+ आपले कष्ट वाया जातील याचीही तिला पर्वा नसते. १७  कारण देवाने तिला बुद्धी दिली नाही;त्याने तिला समजशक्‍तीचं वरदान दिलं नाही. १८  पण जेव्हा ती उठून आपले पंख फडफडवते,तेव्हा ती घोड्यावर आणि त्याच्या स्वारावर हसते. १९  घोड्याला ताकद देणारा तू आहेस का?+ त्याच्या मानेवर सळसळती आयाळ तू पांघरलीस का? २०  तू त्याला टोळासारखी उडी मारायला लावू शकतोस का? त्याच्या नुसत्या फुरफुरण्याने लोकांना दहशत बसते.+ २१  तो खोऱ्‍यात जमिनीवर टापा आपटतो आणि जोराने उसळ्या मारतो;+तो झेप घेऊन लढाईच्या मैदानाकडे धावत सुटतो.*+ २२  तो भीतीवर हसतो; त्याला कशाचंच भय नसतं.+ तलवार पाहून तो मागे फिरत नाही. २३  भात्यातले बाण त्याच्या पाठीवर खणखणतात,स्वाराच्या हातात भाला आणि बरची लकाकत असते. २४  उत्साह अनावर होऊन तो बेफाम वेगाने धावतो;* रणशिंगाचा आवाज ऐकल्यावर तो थांबू शकत नाही.* २५  शिंगाचा नाद ऐकून तो मोठ्याने खिंकाळतो;त्याला दुरूनच लढाईचा वास येतो. युद्धाच्या ललकाऱ्‍या आणि सेनापतींच्या आरोळ्या त्याच्या कानात घुमू लागतात.+ २६  ससाणा आकाशात झेप घेतोआणि दक्षिणेकडे जायला पंख पसरतो, ते काय तुझ्या बुद्धीच्या जोरावर? २७  गरुड भरारी मारतो+ आणि उंच ठिकाणी घरटं बांधतो,+ ते काय तुझ्या आज्ञेने? २८  तो डोंगराच्या कड्यावर रात्र घालवतोआणि पर्वताच्या सुळक्यावर* आपला गड बनवतो. २९  तिथून तो अन्‍न शोधतो;+त्याची नजर दूरपर्यंत जाते. ३०  त्याची पिल्लं रक्‍त पितात;जिथे प्रेतं असतील, तिथे तो असतो.”+

तळटीपा

किंवा “जन्म देतात.”
किंवा “पिल्लाला.”
किंवा “तबेल्यात.”
शब्दशः “बियाणं.”
शब्दशः “शस्त्रांना भेटायला जातो.”
शब्दशः “जमिनीला (पृथ्वीला) गिळून टाकतो.”
किंवा कदाचित, “तो विश्‍वास ठेवत नाही.”
शब्दशः “खडकाच्या दातावर.”