ईयोब ४:१-२१

  • अलीफजचं पहिलं भाषण (१-२१)

    • ईयोबच्या खरेपणाची थट्टा करतो (७, ८)

    • अदृश्‍य व्यक्‍तीचा संदेश सांगतो (१२-१७)

    • देवाचा आपल्या सेवकांवर भरवसा नाही (१८)

 मग अलीफज+ तेमानी याने उत्तर दिलं:  २  “कोणी तुला काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर तू वैतागणार तर नाहीस? कारण आता मला बोलल्याशिवाय राहवत नाही.  ३  हे खरंय की तू बऱ्‍याच जणांना शिकवलंस आणि तू दुर्बळांना धीर द्यायचास;  ४  अडखळणाऱ्‍यांना तुझ्या शब्दांनी दिलासा मिळायचा,आणि पडायच्या मार्गावर असलेल्यांना* तू सावरायचास.  ५  पण तीच वेळ तुझ्यावर आली तेव्हा तू खचून गेलास;* संकट तुझ्यावर येताच तू घाबरून गेलास.  ६  देवावरच्या श्रद्धेमुळे तुला हिंमत मिळत नाही का? तुझ्या खरेपणामुळे+ तुला आशा मिळत नाही का?  ७  विचार कर, निर्दोष माणसाचा कधी नाश झाला आहे का? किंवा सरळ मार्गाने चालणारे कधी नाहीसे झालेत का?  ८  मी तर हेच पाहिलंय, की जे वाइटाची नांगरणी* करतात आणि जे त्रासाची पेरणी करतात, ते त्याचीच कापणी करतील.  ९  देवाच्या श्‍वासाने त्यांचा नाश होईल,आणि त्याच्या क्रोधाच्या फुंकराने त्यांचा शेवट होईल. १०  सिंह डरकाळी फोडतो, आणि तरुण सिंह गुरगुरतो,पण ताकदवान सिंहांचेही* दात तुटतात. ११  शिकार न मिळाल्यामुळे सिंह मरून जातो,आणि त्याच्या छाव्यांची पांगापांग होते. १२  एकदा कोणीतरी एकांतात मला एक गोष्ट सांगितली,त्या गोष्टीची कुजबुज माझ्या कानावर आली. १३  रात्री लोक गाढ झोपेत असताना,मला दृष्टान्त दिसले आणि माझ्या विचारांनी मला बेचैन केलं. १४  मी भीतीने थरथर कापू लागलो,आणि माझी सगळी हाडं लटपटू लागली. १५  काहीतरी* माझ्या चेहऱ्‍यावरून गेलं;माझ्या अंगावर काटा उभा राहिला. १६  मग ते एकाजागी थांबलं,ते काय होतं हे मला ओळखता आलं नाही;फक्‍त एक आकृती मला दिसत होती. सगळीकडे शुकशुकाट होता. मग मला एक आवाज ऐकू आला: १७  ‘नाशवंत माणूस देवापेक्षा नीतिमान असू शकतो का? तो आपल्या निर्माणकर्त्यापेक्षा शुद्ध असू शकतो का?’ १८  बघ, देवाचा त्याच्या सेवकांवर भरवसा नाही,तो तर त्याच्या स्वर्गदूतांच्याही चुका काढतो. १९  मग मातीच्या घरात राहणाऱ्‍यांबद्दल काय बोलायचं! त्यांचा पाया तर धुळीत आहे+ आणि ते किड्यांसारखे* सहज चिरडले जातात. २०  सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पूर्णपणे चिरडले जातात. ते कायमचे नाहीसे होतात, तरी कोणाच्या लक्षात येत नाही. २१  ते दोरी काढून घेतलेल्या तंबूसारखे नाहीत का? मरेपर्यंत त्यांना शहाणपण* येत नाही.

तळटीपा

शब्दशः “ज्यांचे गुडघे लटपटत आहे अशांना.”
शब्दशः “तू दमून जातोस.”
किंवा “योजना.”
किंवा “आयाळ असलेल्या तरुण सिंहांचेही.”
किंवा “एक अदृश्‍य व्यक्‍ती.”
शब्दशः “पतंग.” फुलपाखरासारखा एक किडा.
किंवा “बुद्धी.”