ईयोब ४०:१-२४

  • यहोवा आणखी प्रश्‍न विचारतो (१-२४)

    • आपल्याकडे उत्तर नाही हे ईयोब कबूल करतो (३-५)

    • “तू माझ्या न्यायीपणावर शंका घेतोस का?” ()

    • देव शक्‍तिशाली बेहेमोथचं वर्णन करतो (१५-२४)

४०  यहोवा ईयोबला पुढे म्हणाला:  २  “दोष लावणाऱ्‍याने सर्वशक्‍तिमान देवाशी वाद घालावा का?+ ज्याला देवाची चूक दाखवायची असेल, त्याने उत्तर द्यावं.”+  ३  तेव्हा ईयोब यहोवाला म्हणाला:  ४  “माझी काहीच लायकी नाही.+ मी तुला काय उत्तर देणार? मी आपला हात तोंडावर ठेवतो.+  ५  मी एकदा बोललो, पण पुन्हा उत्तर देणार नाही;मी दुसऱ्‍यांदाही बोललो, पण आता मी काही बोलणार नाही.”  ६  मग यहोवाने वादळातून ईयोबला उत्तर दिलं:+  ७  “चल, आता मर्दासारखी कंबर कस;मी प्रश्‍न विचारतो आणि तू मला उत्तर दे.+  ८  तू माझ्या न्यायीपणावर शंका घेतोस का?* स्वतःला निर्दोष ठरवण्यासाठी, तू मला दोषी ठरवतोस का?+  ९  तुझा हात देवाइतका ताकदवान आहे का?+ तू त्याच्यासारखी गर्जना करू शकतोस का?+ १०  तुझं तेज आणि ऐश्‍वर्य दाखव;तुझा महिमा आणि वैभव प्रकट कर. ११  तुझ्या क्रोधाची आग भडकू दे;प्रत्येक गर्विष्ठ माणसाकडे बघ आणि त्याला धूळ चार. १२  प्रत्येक गर्विष्ठ माणसाकडे बघ आणि त्याला नमव,दुष्टाला जागच्या जागी चिरडून टाक. १३  त्या सर्वांना मातीला मिळव;त्यांना* बांधून काळोख्या जागी टाक. १४  मग, तुझा उजवा हात तुला वाचवू शकतो,हे मीही मान्य करीन.* १५  हा बेहेमोथ* बघ; तुझ्याप्रमाणेच मी त्यालाही बनवलं. तो बैलासारखा गवत खातो. १६  त्याच्या पायात किती ताकद आहे! बघ, त्याच्या पोटाचे स्नायू किती बळकट आहेत! १७  त्याची शेपटी देवदार वृक्षासारखी कडक आहे;त्याच्या मांड्यांचे स्नायू किती पीळदार आहेत! १८  त्याची हाडं तांब्याच्या नळ्यांसारखी आहेत;त्याचे पाय लोखंडाच्या गजांसारखे आहेत. १९  शक्‍तिशाली प्राण्यांमध्ये देवाने त्याला सर्वातआधी निर्माण केलं;त्याच्यापुढे तलवार घेऊन फक्‍त त्याचा निर्माणकर्ता जाऊ शकतो. २०  जिथे सर्व जंगली प्राणी बागडतात,त्या पर्वतांवरून त्याला अन्‍न मिळतं. २१  तो कमळाच्या वेलींखाली पडून असतो;दलदलीतल्या लव्हाळ्यांखाली* राहतो. २२  कमळाच्या वेली त्याला सावली देतातआणि दऱ्‍याखोऱ्‍यांतली झाडं त्याच्या अवतीभवती असतात. २३  नदीला पूर आला तरी तो घाबरत नाही. यार्देनच्या+ जोरदार प्रवाहाला तो धीटपणे तोंड देतो. २४  तो सावध असताना कोणी त्याला पकडू शकतं का? किंवा त्याच्या नाकात आकडा* घालून त्याला धरू शकतं का?

तळटीपा

किंवा “माझा न्याय रद्द करतोस का?”
शब्दशः “त्यांची तोंडं.”
किंवा “याबद्दल मीही तुला शाबासकी देईन.”
कदाचित पाणघोडा.
शब्दार्थसूचीत “पपायरस गवत” पाहा.
शब्दशः “पाश.”