ईयोब ४१:१-३४

  • देव अद्‌भुत लिव्याथानचं वर्णन करतो (१-३४)

४१  तू लिव्याथानला*+ गळाने पकडू शकतोस का? त्याची जीभ तू दोरीने बांधू शकतोस का?  २  त्याच्या नाकात तू वेसण* घालू शकतोस का? किंवा त्याच्या जबड्यांमध्ये आकडा* टोचू शकतोस का?  ३  तो तुझ्यापुढे गयावया करेल का? किंवा तुझ्याशी प्रेमाने बोलेल का?  ४  आयुष्यभर तुझा गुलाम बनून राहण्यासाठी,तो तुझ्याशी करार करेल का?  ५  पक्ष्यासोबत खेळावं, तसं तू त्याच्याशी खेळशील का? तुझ्या लहान मुलींना खेळण्यासाठी, त्याला दोरीने बांधशील का?  ६  व्यापारी त्याचा सौदा करतील का? ते त्याला आपसात वाटून घेतील का?  ७  तू त्याच्या कातडीत बरच्या* भोसकशील का?+ किंवा त्याच्या डोक्यात भाले खुपसशील का?  ८  त्याला हात लावून तर पाहा! ती झुंज कायम तुझ्या लक्षात राहील; तू पुन्हा तसं धाडस करणार नाहीस!  ९  त्याला काबीज करण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. त्याला नुसतं पाहिलंस, तरी तुला धडकी भरेल.* १०  त्याला डिवचण्याचं धैर्य कोणीच करू शकत नाही. मग माझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?+ ११  मला कोणी काय दिलंय, की मी त्याची परतफेड करावी?+ आकाशाखाली जे काही आहे, ते सर्व माझंच आहे.+ १२  मी त्याच्या पायांबद्दल, त्याच्या ताकदीबद्दल,आणि त्याच्या बांधेसूद शरीराबद्दल सांगतो. १३  त्याची कातडी कोण काढू शकतं? त्याच्या जबड्यांमध्ये कोण शिरू शकतं? १४  कोण त्याचं तोंड* बळजबरीने उघडू शकतं? त्याचे दात भीतिदायक असतात. १५  त्याच्या पाठीवर खवल्यांच्या रांगा असतात*ती सोबत घट्ट बसवलेली असतात. १६  ती एकमेकांच्या इतकी जवळजवळ असतात,की त्यांच्यातून हवासुद्धा जाऊ शकत नाही. १७  ती एकमेकांना चिकटलेली असतात;ती अशी घट्ट जोडलेली असतात, की त्यांना वेगळं करता येत नाही. १८  तो फुरफुरतो तेव्हा प्रकाश चमकतो,त्याचे डोळे पहाटेच्या किरणांसारखे दिसतात. १९  त्याच्या तोंडातून जणू चमकणाऱ्‍या विजा निघतात;आणि आगीच्या ठिणग्या उडतात. २०  गवताने पेटवलेल्या भट्टीतून निघावा,तसा धूर त्याच्या नाकपुड्यांतून निघतो. २१  त्याच्या श्‍वासाने कोळसे पेटतात,आणि त्याच्या तोंडातून ज्वाला निघते. २२  त्याच्या मानेत प्रचंड ताकद असते;त्याला पाहून सर्व भीतीने कावरेबावरे होतात. २३  त्याच्या कातडीचे थर एकमेकांवर घट्ट बसलेले असतात;धातू ओतून तयार केल्याप्रमाणे, ते अगदी मजबूत आणि भक्कम असतात. २४  त्याचं हृदय दगडासारखं;जात्याच्या तळीसारखं* कठीण असतं. २५  तो उठतो तेव्हा शूरवीरसुद्धा भयभीत होतात;तो हालचाल करतो तेव्हा ते गांगरून जातात. २६  तलवार त्याला हरवू शकत नाही;भाला, बाण किंवा कोणतंही शस्त्र त्याला लागत नाही.+ २७  लोखंड त्याला पेंढ्यासारखं;आणि तांबं कुजलेल्या लाकडासारखं वाटतं. २८  तो बाणाच्या भीतीने पळून जात नाही;गोफणीतले दगड त्याला भुशासारखे वाटतात. २९  सोटा त्याला गवताच्या पेंढीसारखा वाटतो;सळसळत येणाऱ्‍या भाल्याला तो हसतो. ३०  त्याचं पोट धारदार खापरांसारखं असतं;तो ओंडक्यासारखा*+ मातीत लोळत असतो. ३१  तो समुद्रात उतरतो तेव्हा पाण्याला फेस येतो;ते भांड्यातल्या उकळत्या तेलासारखं दिसतं. ३२  तो पुढे जातो तेव्हा त्याच्यामागे पाणी चमकतं. जणू समुद्राचे पांढरे केस! ३३  पृथ्वीवर त्याच्यासारखा प्राणी नाही;देवाने त्याला निर्भय बनवलंय. ३४  तो सर्व गर्विष्ठ प्राण्यांकडे नजर रोखून पाहतो. तो सगळ्या शक्‍तिशाली जंगली पशूंचा राजा आहे.”

तळटीपा

कदाचित मगर.
किंवा “दोर.” शब्दशः “लव्हाळं.”
शब्दशः “काटा.”
भाल्यासारखं शस्त्र. कदाचित याला गळासारखी मागच्या बाजूला वळलेली टोकं असावीत.
किंवा “तू खाली आपटशील.”
शब्दशः “तोंडाचे दरवाजे.”
किंवा कदाचित, “खवल्यांच्या रांगा त्याचं भूषण आहेत.”
किंवा “खालच्या दगडासारखं.”
म्हणजे, मळणीसाठी वापरला जाणारा ओंडका.